संतोष प्रधान

राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. १९९८ मध्ये राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अशीच चुरस निर्माण झाली आणि मतमोजणीच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणली गेली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राम प्रधान यांचा पराभव झाला आणि त्यातूनच सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात वितुष्ट निर्माण होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेची बिजे रोवली गेली.

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
BJP and TMC
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी
Loksabha Election 2024 BJD 33 percent women candidates
भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत

राज्यात तेव्हा शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. तेव्हा शिवसेनेचे ७३, भाजप ६५, काँग्रेस ८०, अपक्ष ४५ आमदार होते. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४२ मतांची आवश्यकता होती. अपक्ष आमदारांच्या मतांना तेव्हा भलतेच महत्त्व प्राप्त झाले होते. प्रमोद महाजन (भाजप), सतीश प्रधान व प्रितीश नंदी (शिवसेना), नजमा हेपतुल्ला व राम प्रधान (काँग्रेस), सुरेश कलमाडी आणि विजय दर्डा हे दोघे अपक्ष रिंगणात होते. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने चुरस होती.

काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून आधीच खदखद होती. काँग्रेस अध्यक्षपदाचा नुकताच पदभार स्वीकारलेल्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला पहिले आव्हान हे राज्यातून दिले गेले. निवृत्त सनदी अधिकारी आणि गांधी कुुटुंबियांचे निकटवर्तीय राम प्रधान यांना उमेदवारी जाहीर झाली आणि काँग्रेस अंतर्गत वेगळा सूर उमटू लागला. सुरेश कलमाडी आणि विजय दर्डा या काँग्रेस नेत्यांनीच अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचे जाहीर केले. तेव्हाच गडबड होणार याचा अंदाज आला होता.

विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेसचे दोन, शिवसेना व भाजपचा प्रत्येकी एक पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून येणे अपेक्षित होते. मतमोजणीत पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे भाजपचे प्रमोद महाजन आणि अपक्ष विजय दर्डा हे निवडून आले होते. दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे प्रितीश नंदी हे विजयी झाले. तिसऱ्या फेरीत काँग्रेसच्या नजमा हेपतुल्ला आणि अपक्ष सुरेश कलमाडी हे निवडून आले. शिवसेनेचे सतीश प्रधान आणि काँग्रेसचे राम प्रधान हे दोघेच शेवटी उरले. चौथ्या व पाचव्या फेरीत दोघांनाही मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही.

सतीश प्रधान आणि राम प्रधान यांच्या केवळ अर्ध्या मतांचे अंतर होते. भाजपच्या आमदारांची दुसऱ्या पसंतीची सारी मते सतीश प्रधान यांना मिळाली. परिणाम शेवटच्या फेरीत शिवसेनेचे सतीश प्रधान यांची मते झाली ३९.८३. राम प्रधान यांना दुसऱ्या पसंतीची पुरेशी मते मिळाली नाहीत. राम प्रधान यांच्या एकूण मतांचे मूल्य ३७.९० होते.. सर्व मते मोजून झाल्यावर जास्त मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते. त्यानुसार शिवसेनेचे सतीश प्रधान यांनी सुरुवातीच्या टप्प्यात अर्ध्या मताची आघाडी घेतल्याने विजयी झाले. दोन प्रधानांमध्ये शेवटच्या टप्प्यात कमालीची चुरस बघायला मिळाली. शिवसेनेच्या सतीश प्रधान यांनी बाजी मारली.

‘मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कमालीची चुरस बघायला मिळाली. शेवटच्या टप्प्यात मोजले जाणारे प्रत्येक मत हे निर्णायक होते. आपल्याला जास्त मते पडल्याने विजयी घोषित करण्यात आले, अशी आठवण माजी खासदार सतीश प्रधान यांनी सांगितली.

दोन उमेदवार निवडून आणण्याएवढी पुरेशी मते असतानाही काँग्रेसचे राम प्रधान हे पराभूत झाले. सोनिया गांधी यांनी पुरस्कृत केलेल्या राम प्रधान यांचा पराभव काँग्रेसने गांभीर्याने घेतला. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. काँग्रेसच्या १० आमदारांना पक्षाने कारणा दाखवा नोटीस बजाविली. त्या आमदारांना दिल्लीत पाचारण करण्यात आले व तेथे त्यांनी वाईट वागणूक दिल्याची तक्रार आमदारांनी केली होती. आपल्या पराभवाचे सारे खापर राम प्रधान यांनी शरद पवार यांच्यावर फोडले होते. ‘माय ईयर्स विथ राजीव आणि सोनिया’ या पुस्तकात राम प्रधान यांनी शरद पवार यांनी आपल्याला कसे गाफील ठेवले याचे सारे विवेचन केले आहे. आपल्याला मते देणाऱ्या आमदारांची यादी देण्याची मागणी वारंवार प्रधान यांनी करूनही पवारांनी नावे देण्याचे टाळले होते. याउलट घरी शांतपणे झोपी जाण्याचा सल्ला पवारांनी दिला होता, असेही प्रधान यांनी पुस्तकात नमूद केले. मतदानाला १० मिनिटे बाकी असताना आमदारांची नावे आपल्याला दाखविण्यात आली होती. याउलट नजमा हेपतुल्ला यांना रात्रीच यादी देण्यात आली होती, असाही दावा प्रधान यांनी केला होता.

राम प्रधान यांच्या पराभवातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेची बिजे रोवली गेली. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला एक प्रकारे हे आव्हानच होते. पुढे सोनिया गांधी यांच्या विदेशीचा मुद्दा उपस्थित केल्याने शरद पवार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आणि पवारांनी मग राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.

दोन पोटनिवडणुकांमध्ये मतदान

राज्यसभेसाठी नंतर दोनदा पोटनिवडणुकांसाठी मतदान झाले. २००२ मध्ये पी.सी. अलेक्झांडर यांनी राज्यपालपदाचा राजीनामा देऊन राज्यसभेची पोटनिवडणूक लढविली होती. अलेक्झांडर यांना २०१ तर सुरेश केशवानी यांना ७१ मते मिळाली होती. प्रमोद महाजन यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेना – भाजपला बरोबर घेत उद्योगपती राहुल बजाज यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा बजाज यांनी काँग्रेसचे अविनाश पांडे यांचा पराभव केला होता.