नाशिक – महानगरपालिका निवडणूक निकाल लागल्यानंतर अनेक गोष्टींचे कुतुहल नागरिकांना आहे. निवडणूक प्रचारादरम्यान राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे या ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात झाली. सभेला मिळालेल्या प्रतिसादामुळे मनसे आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. परंतु, निवडणूक निकालात मात्र याचे प्रतिबिंब उमटले नाही.

उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने तरी १५ जागांपर्यंत मजल मारली. पण, राज ठाकरे यांच्या मनसेला केवळ भोपळा फोडल्याचे समाधान मिळाले. भाजपच्या नेत्यांकडून वारंवार राज ठाकरे यांच्यावर त्यांच्या सभेला गर्दी जमत असली तरी गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होत नसल्याची टीका केली जाते. नाशिक महानगरपालिका निवडणूक निकालात पुन्हा ते दिसून आले. परंतु, मनसेला केवळ एकच जागा मिळण्याची इतरही अनेक कारणे आहेत.

नाशिक महानगरपालिका निवडणूक उमेदवार जाहीर करण्यापासून, एबी अर्ज देण्यापासून तर प्रचारापर्यंत प्रचंड गाजली. या सर्व घडामोडींचा भाजपसह सर्वच राजकीय पक्षांना फटका बसला. महापालिका निवडणुकीत स्वबळावर शंभरपेक्षा अधिक जागा जिंकण्याची मनिषा भाजपने बाळगली होती. परंतु, त्यांची गाडी ७२ पर्यंतच थांबली. उमेदवारी जाहीर केल्यावर झालेली एबी अर्जांची पळवापळवी भाजपची अब्रू पूर्णपणे घालवून बसली. त्यातून सावरत बंडखोरांवर कारवाई करीत भाजपने प्रचार यंत्रणा राबवली.

दुसरीकडे, ठाकरे बंधूंनी मुंबईत एकत्र येण्याची घोषणा केल्यानंतर नाशिकमध्ये मनसे आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संयुक्तरित्या आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवात मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांनी पेढे वाटले. पेढे खाल्ले. दिनकर पाटील यांनी तर नृत्यही केले. आणि दुसऱ्याच दिवशी ही मंडळी भाजपमध्ये सामील झाली. रात्रीतून त्यांना पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याचा साक्षात्कार झाला.

नाशिकमध्ये मनसेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ज्यांनी घेतल्या, त्यांच्यामध्ये दिनकर पाटील यांचाही समावेश होता. तेच पाटील रात्रीतून भाजपमध्ये गेल्याने मनसेचे स्थानिक पदाधिकारी सैरभैर झाले. पाटील यांनी दिलेल्या धक्क्यातून मनसेला सावरताच आले नाही. त्यास ठाकरे बंधूंची संयुक्त सभाही कामी आली नाही. मनसेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवित ३० उमेदवार उभे केले होते.

या उमेदवारांपैकी एक-दोन अपवाद वगळता सर्वच आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य होते. समोर आर्थिकदृष्ट्या संपन्न भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असताना त्यांना तोंड देण्यासाठी जी रसद पक्षाकडून मिळणे आवश्यक होती, ती मनसेच्या उमेदवारांना मिळालीच नाही. प्रत्येकाला आपआपल्या कुवतीप्रमाणे लढावे लागले. स्थानिक पदाधिकारीही त्यांच्याच प्रभागात अडकल्याने इतर उमेदवारांच्या मदतीला जाणे त्यांना शक्य झाले नाही.

मनसे आणि उध्दव ठाकरे यांच्या प्रांरभीच्या नियोजनानुसार ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेनंतर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात येणार होते. परंतु, ठाकरे बंधूंनी संपूर्णपणे मुंबईवर लक्ष केंद्रित केल्याने आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या संयुक्त रोड शोचे नियोजन बारगळले. या सर्व घडामोडींचा जो बसायचा तो फटका उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेला बसला. त्यातही ठाकरे गटाचे उमेदवार मनसेपेक्षा काही प्रमाणात प्रबळ असल्याने ठाकरे गटापेक्षा मनसेला अधिक नुकसान सहन करावे लागले. किमान आदित्य आणि अमित ठाकरे यांचा रोड शो जरी झाला असता तरी मनसेने किमान दुहेरी आकडा तरी गाठला असता, असा पदाधिकाऱ्यांचा दावा आहे.

सातपूरमध्ये मनसेला सलीम शेख यांच्यासारखा मोहरा गमवावा लागला. त्यांच्याविरुध्द विरोधकांकडून दुर्देवाने धार्मिक अस्त्र बाहेर काढण्यात आले. आणि कोणताही भेदभाव न करता सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा पराभव झाला. मनसेला भोपळा मिळू नये म्हणून प्रभाग १३ मधील मयुरी पवार यांचा विजय कारणीभूत ठरला.

कधीकाळी नाशिक महापालिकेत सत्ता मिळविणाऱ्या मनसेची भविष्यातील वाटचाल कशी राहील, हे स्थानिक पदाधिकाऱ्यांपेक्षाही वरिष्ठ नेत्यांवर अधिक ‌अवलंबून आहे. केवळ निवडणूक एके निवडणूक असे धोरण न ठेवता वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने संपर्क ठेवण्यावर भर दिल्यास मनसे पुन्हा सावरु शकते. अमित ठाकरे यांच्यासारख्या वरिष्ठ पातळीवरील नव्या फळीवर याबाबतीत अधिक मदार राहील. नाशिकमध्ये मनोज घोडके, सलीम शेख यांच्यासारखे काही निष्ठावान कार्यकर्ते कोणत्याही आमिषाला बळी न पडता अजूनही त्यांच्याकडेच आहेत.