सुजित तांबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पक्षप्रमुखांकडून नियोजित दौरे अचानक रद्द होणे, स्थानिक नेत्यांकडून आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नागरिकांच्या प्रश्नांमध्ये घेण्यात येणारी भूमिका आणि दुभंगलेल्या शिवसेनेमुळे निर्माण झालेल्या संधीचा लाभ घेण्याऐवजी समाजमाध्यमांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास कार्यकर्त्यांना घातलेली बंदी… अशा राज ठाकरे यांच्या लहरी राजकारणामुळ पुण्यातील मनसे ही फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’अशी अवस्था झालेल्या मनसेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हा पर्याय जवळचा वाटत असल्याने संबंधित पदाधिकारी हे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे अगोदरच कमकुवत असलेली मनसे आणखी खिळखिळी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हेही वाचा… रस्ता सुरक्षा समिती आणि खासदार ज्येष्ठतेचा तिढा

मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे राज्यभर दौरे करत असले, तरी पक्षाच्या धरसोड वृत्तीमुळे पुण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडत आहेत. नाईलाजास्तव पक्षातच थांबलेले काही पदाधिकारी, आगामी महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी सक्षम पर्याय शोधत होते. त्यामुळे ते पदाधिकारी शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाच्या संपर्कात आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत राज ठाकरे कोणती ठोस भूमिका घेतात, याच्या प्रतीक्षेत संबंधित पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा… रावसाहेब दानवेंची तयारी सुरू ; काँग्रेसमध्ये मात्र सामसूम!

पश्चिम महाराष्ट्रात मनसेचे फारशी ताकद नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राज ठाकरे यांचा दौरा असल्यास त्याची जबाबदारी ही पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात येत असते. नुकताच ठाकरे यांनी शिर्डीचा दौरा केला. त्यानंतर ते कोल्हापूरमध्ये जाणार होते. मात्र, ऐनवेळी दौरा रद्द केल्याचे कळविण्यात आले. त्यामागचे कारण सांगण्यात आले नाही. त्यामुळे कोल्हापूरमधील मनसेचे कार्यकर्ते आणि पुण्यातील पदाधिकाऱ्यांची अडचण झाली. अशा धरसोड वृत्तीमुळे पक्षवाढीला खीळ बसत असल्याची भावना मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

हेही वाचा… राहुल गांधींच्या भारत जोडोपूर्वी ‘या’ पाच पदयात्रांनी घडवली राजकीय क्रांती

मनसेकडून आक्रमकपणे भूमिकेची अपेक्षा असताना आंदोलन करताना आपल्या प्रभागातील मतदार डोळ्यासमोर ठेवून आंदोलने करण्यात येत आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर बंदी घातल्याच्या मागणीसाठी शहरातील मनसेने गेल्या महिन्यात पुण्यात टिळक चौकात आंदोलन केले. मात्र, या आंदोलनाला प्रमुख पदाधिकारीच आले नाहीत. त्यामध्ये आगामी महापालिका निवडणूक कारणीभूत ठरली. संबंधित पदाधिकाऱ्यांच्या प्रभागांमध्ये ‘पीएफआय’ या संघटनेला अंतर्गत पाठिंबा असणारा वर्ग आहे. ती मते जाऊ नयेत, यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी न जाण्याचा पर्याय निवडला. मात्र, ‘पीएफआय’वर बंदीचा निर्णय झाल्यावर पेढे वाटण्याच्या वेळी फक्त हजेरी लावण्याचे काम काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले. पदाधिकारीच दुटप्पी भूमिका घेत असल्याने पक्ष वाढणार कसा, अशी चर्चा मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live :  “तुझा संजय कमजोर पडला, शरण गेला तर…”, संजय राऊतांचे आईला भावनिक पत्र

महापालिकेत ताकद वाढणार कशी?

पुणे महापालिकेवर २०१२ च्या निवडणुकीत मनसेचे २९ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर मनसेचा शहरावरील प्रभाव आणखी वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत अवघे दोन नगरसेवक निवडून येऊ शकले. सध्या प्रभावी नेतृत्वाअभावी पक्ष संघटन हे कमकुवत झाल्यासारखी स्थिती आहे. पक्षाची ताकद वाढण्यासाठी शहरातील मनसेने जुन्या शिवसेनेप्रमाणे आक्रमक पवित्रा घेण्याची वेळ आली आहे. आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी मनसेने आक्रमकता स्वीकारली नाही, तर महापालिकेत दोनपेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहील, अशी या पक्षातील परिस्थिती आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns organization on verge of split in pune print politics news asj
First published on: 12-10-2022 at 16:37 IST