पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्ष मजबुतीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा संपर्क अध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला असून, पुण्याची जबाबदारी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडे साेपविण्यात आली आहे. आगामी तीन वर्षे कोणत्याही निवडणुका नसल्या, तरी पक्षाची मोट बांधण्यासाठी अमित ठाकरे हे पुण्यात जनसंपर्क कसा वाढविणार, याकडे पुणेकरांचे लक्ष असणार आहे.

लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आत्मपरीक्षण करून पक्षांतर्गत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रत्येक जिल्ह्यासाठी संपर्कप्रमुख आहेत, त्याप्रमाणे आता मनसेचे प्रत्येक जिल्ह्यात संपर्क अध्यक्ष असणार आहेत. या संपर्क अध्यक्षांच्या देखरेखीखाली प्रत्येक जिल्ह्याचा कारभार चालणार आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. त्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याला संपर्क अध्यक्ष नेमण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामध्ये पुण्याची जबबदारी ही अमित ठाकरे यांच्याबरोबरच अविनाश अभ्यंकर आणि अमेय खोपकर यांच्याकडे असणार आहे.

मनसेने २००९ मध्ये संपर्क अध्यक्ष नेमले होते. मात्र, कालांतराने या पदावर कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. आता पुन्हा हे पद कार्यान्वित करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय संपर्क अध्यक्ष

पुणे – अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, अमेय खोपकर

नागपूर – हेमंत संभूस

ठाणे – मनोज चव्हाण, संजय नाईक

रायगड – संदीप देशपांडे, योगेश परुळेकर, राजेश येरुणकर

सिंधुदुर्ग – शिरीष सावंत, संदीप दळवी

रत्नागिरी – नितीन सरदेसाई, शिरीष सावंत

पालघर – प्रमोद उर्फ राजू पाटील, केतन नाईक

लातूर – दिलीप धोत्रे

धाराशिव – राजेंद्र उर्फ बाबू वागसकर

छत्रपती संभाजी नगर – बाळा नांदगावकर, विनायक म्हशीलकर, दिलीप चितलंगे, बिपीन नाईक

जालना – जयप्रकाश बाविस्कर

नांदेड – संतोष नगरगोजे, सतनामसिंग गुलाटी

सोलापूर – किशोर शिंदे, सुधीर पाटसकर

सातारा – रणजीत शिरोळे, गणेश सातपुते

कोल्हापूर – यशवंत किल्लेदार, नंदकुमार चिले

धुळे – प्रकाश भोईर

नंदुरबार – कर्णबाळा दुनबळे

जळगाव – संदीप पाचंगे, आशिष साबळे

नाशिक – अविनाश जाधव, अभिजीत पानसे

अहिल्यानगर – नयन कदम

अमरावती – राजू उंबरकर

अकोला – हेमंत गडकरी

यवतमाळ – प्रशांत कनोजिया

बुलढाणा – बाळा शेडगे

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांकडे विशेष लक्ष

जिल्हा संपर्क अध्यक्ष नेमताना मनसेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या जिल्ह्यांकडे विशेष लक्ष दिले आहे. पुणे जिल्ह्यासाठी अमित ठाकरे यांच्याबरोबर अविनाश  अभ्यंकर आणि अमेय खोपकर हे असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्याची जबाबदारी ही पक्षाचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांच्याकडे देण्यात आली आहे. ठाण्यामध्ये मनोज चव्हाण आणि संजय नाईक यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.