संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीत एखाद्या पक्षाची लाट येते व या लाटेत पक्षाला यश मिळते. हे यश पुढे टिकविणे आव्हान असते. काही पक्षांना हे यश टिकविता येत नाही आणि पुढील निवडणुकांमध्ये पक्षाची नामोनिशाणी राहात नाही. आसाममध्ये आसाम गण परिषद, आंध्र प्रदेशात चित्रपट अभिनेते चिरंजीवी यांचा प्रजाराज्यम आणि महाराष्ट्रात मनसे ही वानगीदाखल उदाहरणे.

विदेशीच्या मुद्द्यांवर आसाममध्ये विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या आसाम गण परिषदेला सत्ता मिळाली पण पुढे अंतर्गत संघर्षात पक्षात फाटाफूट झाली व पक्षाला अस्तित्वासाठी झगडावे लागले. सध्या हा पक्ष भाजपचा दुय्यम भागीदार म्हणून सत्तेत असला तरी पक्षाची पीछेहाट झाली. आंध्र प्रदेशात २००९ च्या निवडणुकीत चिंरजीवीच्या प्रजाराज्यम पक्षाने साऱ्यांच्याच झोपा उडविल्या होत्या. सभांना प्रचंड गर्दी व्हायची. पहिल्या फटक्यात या पक्षाचे १८ आमदार निवडून आले व पक्षाचा दबदबा निर्माण झाला. खुद्द चिरंजीवी हे केंद्रात राज्यमंत्री झाले. पण सत्तेची ही ऊबही प्रजाराज्यमला राजकीय प्रभाव टिकवण्यात मदत करू शकली नाही. पाच वर्षांत पक्षाचे अस्तित्वच संपले.

महाराष्ट्रातही २००९च्या निवडणुकीत मनसेची लाट आली होती. मराठीच्या मुद्द्यावर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक परिसरात जनतेचा चांगला पाठिंबा मिळाला. राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत असे. तरुण वर्गात प्रचंड आकर्षण होते. मनसेचे १३ आमदार निवडून आले आणि राज ठाकरे हे राज्याच्या राजकारणात भविष्यात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करतील असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जाऊ लागला. पण ते यश मनसेला टिकविता आले नाही. २०१४ आणि २०१९ मध्ये दोन्ही वेळा मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला. २०१४ मध्ये ३.१५ टक्के तर २०१९ मध्ये २.२५ टक्के मते मिळाली. पक्षाची प्रगती होण्याऐवजी उलटा प्रवास सुरू झाला. नाशिक महानगरपालिकेची सत्ताही मनसेही गमाविली. पण २०१९ मध्ये केंद्रातील भाजप सरकारविरोधात लाव रे तो व्हीडीओचा प्रयोग करत राज ठाकरे हे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशात मोदी विरोधी राजकारणातील एक दखलपात्र राजकीय वक्ते ठरले होते. त्यानंतर तोवर भाजपसोबत असलेल्या शिवसेनेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याने राज ठाकरे यांच्यापुढे पुन्हा प्रश्न निर्माण झाला. मधल्या काळात पक्षाचा झेंडा भगवा करून त्यांनी पुढच्या वाटचालीचे संकेत दिले.

आता राज ठाकरे हे पुन्हा एकदा चर्चेच आले ते त्यांच्या नवीन भूमिकेमुळे. मशिदींवरील भोंगे हटवावेत ही मागणी वा मशिदींसमोर हनुमान चालीसाचे पठण केले जाईल या त्यांच्या इशाऱ्यानंतर राजकीय संदर्भ बदलत गेले. वृत्तवाहिन्यांवर दिवसरात्र भोंगे व हनुमान चालिसावरून चर्वितचर्वण सुरू झाले. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या साऱ्याच राजकीय पक्षांना राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर व्यक्त व्हावे लागले. राज्याचे राजकीय कथानक राज ठाकरे यांच्या भूमिकेनुसार ठरणार असे चित्र निर्माण झाले. मशिदींसमोरील भोंगे हटव्यण्याची मुदत संपत आली तेव्हा सरकारला राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द कराव्या लागल्या. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली गेली. अयोध्या दौऱ्याची घोषणा, भगवी शाल पांघरून केलेली आरती, मशिदींवरील भोंग्यावरून घेतलेली आक्रमक भूमिका यातून राज ठाकरे यांना ‘हिंदू जननायक’ म्हणून हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे नवे हिंदूहृदयसम्राट अशी प्रतिमा पद्धतशीरपणे तयार करण्यात आली. मराठी ते हिंदुत्व असा मनसेचा राजकीय प्रवास झाला. एकेकाळी हिंदी भाषकांचा द्वेष करणाऱ्या मनसेच्या सभांचे फलक हिंदीतून झळकू लागले. भाजपच्या इशाऱ्यानुसार राज ठाकरे यांची वाटचाल सुरू झाल्याची टीका होऊ लागली.

महाराष्ट्र भाजपमध्ये ब्राह्मण नेतृत्व अडगळीत, जातीपातींच्या राजकारणात उपेक्षा

वृत्तवाहिन्यांवरील प्रसिद्धीचा आलेख चढा असताना प्रत्यक्ष राजकारणात-लोकांमधून मशिदींवरील भोंग्याच्या भूमिकेला मनसेला हवा तितका पाठिंबा मिळाला नाही. इतकेच नव्हे तर पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली. त्यामुळे भोंगा व हनुमान चालिसाचा संघर्ष त्यावेळी हवेतच विरला. उलट मनसे कोंडीत सापडल्याचे चित्र निर्माण झाले. राजकीय कार्यक्रम अपयशी ठरत असताना हिंदूजननायक प्रतिमेसाठी जाहीर केलेला अयोध्या दौरा स्थगित करावा लागल्याने राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेला मोठा धक्का बसला आहे.

राजकीय पक्षांनी भूमिका किंवा धोरणे बदलणे नवीन नाही. जनतेचा विश्वास संपादन करणे हे राजकीय पक्षांसाठी मुख्य असते. मनसेच्या बाबत नेहमीच धोरण सातत्याचा अभाव आढळला. शिवसेना विरोध हा मनसेचा एकमेव कार्यक्रम. शिवसेनेला नामहोरम करण्याच्या नादात मनसेने स्वत:चे नुकसान करून घेतले. मनसेची भूमिका सतत बदलत गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज ठाकरे यांनी गुजरात दौऱ्यानंतर मोदी यांचे केवढे कौतुक केले होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात याच मोदी यांचे राज ठाकरे यांनी ‘लाव रे व्हिडिओ’ च्या माध्यमातून वाभाडे काढले होते. त्याच राज ठाकरे यांना २०२२ च्या सुरुवातीला मोदी यांचा आधार वाटू लागला. महाराष्ट्रातील प्रश्नात मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज ठाकरे हे जाहीर सभांमधून करू लागले.

शिवसेनेला पर्याय म्हणून मनसे हे राज ठाकरे यांचे अगदी सुरुवातीपासूनचे लक्ष्य होते. पण मार्च २००६ मध्ये मनसेची स्थापना झाल्यापासून गेल्या १६ वर्षांत शिवसेनेच्या आसपास येणेही निवडणुकीच्या राजकारणात मनसेला जमलेले नाही. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल तरुण वर्गात वेगळे आकर्षण आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज्यात सभांना गर्दी होते ती राज ठाकरे यांच्या सभांना. आक्रमक आणि तरुण वर्गाला भिडणाऱ्या त्यांच्या भाषणांना प्रतिसादही चांगला मिळतो. पण मतांमध्ये रुपांतरित करण्यात त्यांना यश येत नाही. धोरण सातत्याचा अभाव हा मनसेसाठी प्रतिकूल ठरणारा मुद्दा. मराठीच्या मुद्द्यावर मनसेला मुंबई, ठाण्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मराठी पाट्यांचा विषय यशस्वी झाला. तेव्हा शिवसेनेला नामहोरम करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादीच्या राज्यकर्त्यांनी मनसेला अनुकूल अशीच भूमिका घेतली. उत्तर भारतीयांना केलेली मारहाण किंवा ‘खळ्ळ खट्याक’ यावर मराठी मनात राज ठाकरे यांच्याबद्दल आकर्षण वाढले. टोल किंवा फेरीवाले हे सामान्य जनतेशी संबंधित मुद्दे मनसेने हाती घेतले. पण हे दोन्ही मुद्दे मनसेने तडीस नेले नाहीत. मनसेच्या इशाऱ्यानंतर मुंबई व ठाण्यातील फेरीवाले काही काळ गायब झाले होते. आता तर मनसेचे केंद्रबिंदू असलेल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर फेरीवाल्यांनी व्यापलेला बघायला मिळतो.

मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद सभेच्या तयारीसाठी वॉर्डनिहाय व गावनिहाय १५०० बैठका

फेरीवाल्यांच्या विरोधातील मुद्दा मनसेने नंतर सोडून दिला किंवा फार काही ताणला नाही. टोलच्या विरोधातही सातत्य दिसले नाही. ५५ टोल नाके बंद झाले ते फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे. ४ मे नंतर मशिदींवरील भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशी मागणी करीत राज ठाकरे हे आक्रमक झाले होते. पण ठाकरे यांच्या या मुद्द्याला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. अयोध्या दौऱ्याच्या माध्यमातून हिंदूजननायकाची प्रतिमा तयार करून मनसेचे नवनिर्माण करण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न होता. पण स्थानिक भाजप खासदाराने घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांची पंचाईत झाली. उत्तर भारतीयांना झालेल्या मारहाणप्रकरणी माफी मागावी ही भाजप खासदाराची मागणी होती. माफी मागावी तर शिवसेना व साऱ्याच पक्षांना आयत कोलीत दिल्यासारखे. राज ठाकरे यांना उगाचच मोठे का करावे, असा मतप्रवाह भाजपमध्ये होताच. अयोध्या दौऱ्यावरून भाजपकडून तेवढे सहकार्य न मिळाल्याने राज ठाकरे यांना दौरा स्थगित करावा लागला. काहीही झाले तरी आपल्या मतांवर ठाम असलेल्या राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यातून माघार घ्यावी लागल्याने त्यांच्या प्रतिमेला नक्कीच धक्का बसला.

मशिदींवरील भोंगे व अयोध्या दौऱ्यातून आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करून शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मतांवर डोळा ठेवून असणाऱ्या राज ठाकरे यांना नवी भूमिका साकारताना ठेच लागली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाताना त्यांना आता नवे कथानक रचावे लागेल. मनसेचा घसरत चाललेला आलेख त्यांना रोखावा लागेल. मनसेची आताच खरी कसोटी आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns raj thackeray ayodhya visit politics bmc elections hundutva pmw
First published on: 31-05-2022 at 10:25 IST