महाराष्ट्रातील आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : रायगडमधील नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीतून मनसेने ऐनवेळी माघार घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना भाजपाने शिंदेसेनेला पुन्हा धक्का दिला. बारामती नगरपरिषद निवडणुकीत अजित पवार गटाने लाखो रुपये देऊन आपले उमेदवार फोडल्याचा आरोप शरद पवार यांच्या पक्षातर्फे करण्यात आला. काँग्रेसला मत म्हणजे मुस्लिमांना मत, असे वादग्रस्त विधान भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केले. धनंजय मुंडे यांनी बीडमधील सभेत आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढल्याची चर्चा रंगली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

ठाकरे गटासाठी मनसेची माघार

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेत युती होणार असल्याच्या चर्चा आहे. यादरम्यान रत्नागिरीतील नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीतून मनसेने आपल्या उमेदवारांचे नामांकन अर्ज मागे घेऊन शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे गटाची ताकद वाढली असून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपासून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. सद्यस्थितीत दोघांमधील दुरावा कमी झाला असल्याचे मानले जात आहे. या ऐतिहासिक एकोप्याचे पहिले दर्शन घडले असून त्याची राजकीय पक्षांमध्ये धडकी भरली आहे. जिल्ह्यातील मनसेच्या पाठिब्यामुळे महायुतीच्या नेत्यांना जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये जास्त लक्ष देण्याची वेळ आल्याने महायुतीला ही निवडणूक जड जाण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.

भाजपाचा शिंदेसेनेला पुन्हा धक्का

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना भारतीय जनता पक्षाने शिवसेना शिंदे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीआधी शिंदेसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना भाजपाने आपल्या गोटात खेचून आणले आहे. त्यामध्ये माजी नगरसेविका शिल्पा वाडकर यांचाही समावेश आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या उपस्थितीत आज शिल्पा यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले आहे. ऐन महापालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर शिंदेसेनेला बसलेला हा मोठा झटका मानला जात आहे. शिल्पा वाडकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. भाजपातील त्यांचा प्रवेश सोहळा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आणखी वाचा : “संस्कृत ही तर मृत भाषा”, उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानावरून भाजपाची आगपाखड; तामिळनाडूत नेमकं घडतंय काय?

अजित पवार यांच्या गटावर फोडाफोडीचे आरोप

बारामती नगरपरिषद निवडणुकीत अजित पवार गटाने लाखो रुपये देऊन आपले उमेदवार फोडल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आला आहे. बारामती नगरपरिषद निवडणुकीत आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यातील चार उमेदवार हे आपल्या पक्षाचे असल्याचा दावा युवानेते युगेंद्र पवार यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत जे झाले तेच नगरपरिषद निवडणुकीतही होत असल्याचा आरोप युगेंद्र यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.”आपल्याविरोधात मोठी शक्ती काम करीत आहे. आपल्याकडील चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख रुपये देऊन फोडण्यात आले आहे. उमेदवारी मागताना त्यांनी आपण चांगले काम करू असे आश्वासन दिले होते, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पण ते फुटले”, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण?

राज्यात सध्या नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आपापल्या उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. आज बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते तथा राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे हे दोन्ही नेते उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडेंनी आपले भाषण संपवताना त्यांचे जुने जवळचे सहकारी वाल्मिक कराडची नाव न घेता आठवण काढल्याची चर्चा आहे. “गेल्या नऊ-दहा महिन्यापासून आपले काम सुरळीत सुरू आहे. पण आज एक व्यक्ती आपल्यासोबत नाही आणि त्याची जाणीवही होते. काय चुकले काय नाही ते न्यायालय बघेल; पण ती जाणीव नक्कीच आहे”, असे मुंडे यांनी म्हटले आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड जेलमध्ये आहे. त्यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. संबंधित प्रकरण हे न्याय प्रविष्ट आहे.

हेही वाचा : एनडीएच्या बिहार विजयात RSS चेही योगदान; मुस्लीम बहुल भागात कसा केला प्रचार?

नवनीत राणां यांचं वादग्रस्त विधान

भाजपाच्या नेत्या तथा अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी एक वादग्रस्त विधान केले. “आपल्या देशात काँग्रेस म्हणजे मुस्लीम आणि मुस्लीम म्हणजे काँग्रेस अशी स्थिती आहे. त्यामुळे आपले एक जरी मत काँग्रेसला गेले तरी ते मत मुस्लिमांना गेले असा त्याचा अर्थ होतो”, असे राणा यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला असून सर्वस्तरातून टीका होत आहे. मेळघाटातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना नवनीत राणा यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. “मेळघाटात काँग्रेसचे झेंडे वाटल्याचं ऐकले. हे काँग्रेसचे झेंडे कोणाला दिले असतील? मुस्लिमांना काँग्रेसचे झेंडे दिले गेले. त्या लोकांनी तशी घोषणाच केली आहे. त्यामुळे आपले एक जरी मत काँग्रेसला जाणे म्हणजे आपले मत मुस्लिमांना जाणार,” असे राणा यांनी म्हटले आहे. बिहारच्या लोकांनी एनडीएच्या बाजूने त्सुनामीसारखा निकाल दिला आहे. भाजपा कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे, परिश्रमाचे हे फळ आहे, त्यामुळे विरोधकांनी आतातरी ईव्हीएमवर रडणे सोडावे, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.