भाजपा नेते नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी ७.१५ वाजता एनडीए सरकारचा तिसरा शपथविधी सुरू होईल. २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपाला एनडीएतील आपल्या सहकारी पक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे. सहाजिकच एनडीएतील घटक पक्षांनाही मंत्रिमंडळात सामावून घ्यावे लागेल. इतरांना कोणती मंत्रिपदे द्यायची, याबाबतच्या वाटाघाटीही केल्या जातील. या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला २४० जागा मिळाल्या आहेत. त्याखालोखाल एनडीएतील घटक पक्ष असलेल्या टीडीपीला १६, तर जेडीयूला १२ जागा मिळाल्या आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी २७२ चा जादूई आकडा प्राप्त करणे गरजेचे आहे. पूर्ण मंत्रिमंडळाचे संख्याबळ ७८ ते ८१ च्यादरम्यान असण्याची शक्यता आहे, असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. त्यापैकी जवळपास ३० जण आज मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. रविवारी (९ जून) सकाळी साडेअकरा वाजता नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मंत्रिमंडळाचा भाग असणाऱ्या सर्व खासदारांना त्यांच्या निवासस्थानी चहापानासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

हेही वाचा : निकालानंतर बंगालमध्ये भाजपा कार्यकर्ते घर सोडून पक्ष कार्यालयात ठाण मांडून का बसलेत?

भारतीय जनता पार्टी

माध्यमांमधील वृत्तांनुसार, भाजपा स्वत:कडे महत्त्वाची खाती ठेवणार आहे. त्यामध्ये रेल्वे, गृह, अर्थ आणि संरक्षण खात्याचा समावेश असेल. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी हे आज नक्की शपथविधी घेणार आहेत. राजनाथ सिंह यांना त्यांचे संरक्षण खाते तर गडकरी यांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग हेच खाते पुन्हा दिले जाणार आहे. आज सकाळी चहापानासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये अर्जुन राम मेघवाल, सर्बानंद सोनोवाल, प्रल्हाद जोशी आणि शिवराज सिंह चौहान यांचा समावेश आहे, असे न्यूज १८ च्या वृत्तात म्हटले आहे.

जनता दल युनायटेड (जेडीयू)

नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जनता दल युनायटेड पक्षाला दोन खाती मिळणार आहेत. त्यातील एक मंत्रिपद असेल तर दुसरे राज्यमंत्री पद असेल. जेडीयूने या पदांसाठी लालन सिंह आणि राम नाथ ठाकूर या वरिष्ठ नेत्यांची नावे सुचवली आहेत. लालन सिंह हे बिहारच्या मुंगेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत; तर राम नाथ ठाकूर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्तकर्ते कर्पूरी ठाकूर यांचे सुपुत्र आणि राज्यसभेचे खासदार आहेत. मात्र, ‘मिंट’ने याआधी दिलेल्या वृत्तानुसार, जेडीयूप्रमुख नितीश कुमार या सरकारमध्ये पाच मंत्रिपदांची मागणी करत आहेत. “आम्हाला किमान चार मंत्रिपदे मिळण्याची आशा आहे. आणखी एका राज्यमंत्रिपदाची विचारणा आम्ही करत आहोत”, असे एका जेडीयू नेत्याने यापूर्वी म्हटले होते.

तेलुगू देसम पार्टी (टीडीपी)

न्यूज १८ आणि हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, टीडीपीचे राम मोहन नायडू किंजरापू (३६) हे नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळामध्ये सामील होतील. नायडू हे श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यास ते वयाच्या ३६ व्या वर्षी सर्वांत तरुण केंद्रीय कॅबिनेट मंत्री ठरण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी चंद्रशेखर पेम्मासानी हे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्रिपदाची शपथ घेतील, हे निश्चित झाले आहे. पेम्मासानी हे लोकसभेतील सर्वात श्रीमंत खासदार असून त्यांची संपत्ती ५,७०५ कोटी रुपये आहे. नेल्लोर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी हे देखील मंत्रिपदासाठी चर्चेत होते.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, एनडीएमध्ये सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाच्या जागा जिंकणाऱ्या टीडीपी पक्षाला मंत्रिमंडळात चार खाती मिळण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, टीडीपी पक्षाला मंत्रिमंडळात चार जागा मिळाल्यास चित्तूर लोकसभा जागेचे प्रतिनिधी डी प्रसाद राव किंवा बापटलाचे प्रतिनिधी टी कृष्ण प्रसाद यांची वर्णी लागू शकते. हे दोन्ही अनुसूचित जातीचे खासदार असून टीडीपी पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू त्यांना संधी देऊ शकतात. सभागृहाच्या अध्यक्षपदावरही टीडीपी पक्षाचा डोळा आहे.

हेही वाचा : राजकीय क्षितीजावर अस्त ते पुन्हा दमदार ‘एंट्री’; चंद्राबाबू नायडूंनी ‘टीडीपी’ला कशी दिली उभारी?

शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मंत्रिमंडळात एक जागा मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती न्यूज १८ ने दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे की, “जरी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असले तरीही त्यांनी लोकांमध्ये जाऊन कामे केली आहेत. ते तिसऱ्यांदा खासदार म्हणून दिल्लीत जात आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळायला हवे, अशी अपेक्षा आमच्या खासदारांची आहे.” ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्रिमंडळात दोन खाती मिळवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने या लोकसभा निवडणुकीमध्ये सात जागांवर विजय मिळवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)

अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मंत्रिमंडळात दोन खाती मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त एक जागा मिळाली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते.

जनसेना पार्टी

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जेएसपीच्या वल्लभनेनी बाला शोरी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेएसपीने दोन जागा जिंकल्या आहेत. तसेच समांतरपणे झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतही त्यांनी लढवलेल्या सर्व २१ जागा जिंकल्या आहेत.

धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस)

जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. कृषी खाते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जेडीएस प्रयत्नशील आहे. जेडीएसने या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन जागा जिंकल्या आहेत.

लोक जनशक्ती पार्टी (लोजपा)

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, लोजपाचे प्रमुख चिराग पासवान यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. पक्षाच्या एका कार्यकर्त्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, “आम्हाला एका मंत्रिपदाचे वचन देण्यात आले आहे. आणखी एखादे राज्यमंत्रिपद मिळणे हा मोठा बोनस असेल.” लोजपाने लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या सर्व पाच जागा जिंकल्या आहेत.

राष्ट्रीय लोक दल (रालोद)

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, रालोदचे प्रमुख जयंत चौधरी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. याआधी झालेल्या एनडीएच्या बैठकीत चौधरींना व्यासपीठावर जागा न मिळाल्याने वाद निर्माण झाला होता. या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये दोन जागा जिंकल्या आहेत.

अपना दल

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, मिर्झापूर येथील अपना दल पक्षाच्या प्रमुख अनुप्रिया पटेल यांनादेखील मंत्रिपद मिळू शकते. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत अपना दलाने एक जागा जिंकली आहे.