scorecardresearch

मोदी सरकारचा नववा वर्धापन दिन; मोदींची लोकप्रियता आणि विकासकामांच्या जाहिराती केल्या जाणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्र्यांचा एक गट स्थापन करून मोदी सरकारच्या नवव्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरू केली आहे.

Narendra Modi Government 9th Anniversary
मोदी सरकारच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त मोदींच्या प्रतिमेची पुन्हा एकदा जाहीरात करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा नववा वर्धापन दिन ३० मे रोजी संपन्न होणार आहे. या वर्धापन दिनाची जय्यत तयारी केंद्र सरकारकडून केली जाणार आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळातील सदस्यांची एक बैठक घेऊन वर्धापन दिन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. मोदींची लोकप्रियता आणि केंद्र सरकारच्या विकास योजनांची जाहिरात करण्यावर केंद्र सरकारचा भर असणार असल्याचे भाजपामधील सूत्रांनी सांगितले. अमित शाह यांनी वर्धापन दिनाच्या तयारीसाठी मंत्रिमंडळातील सदस्यांचा एक गट तयार कला आहे. यामध्ये कॅबिनेटमंत्री आणि काही राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची रचना स्पष्ट करण्यासाठी काही दिवसांत या गटाची आणखी एक बैठक होईल.

मंत्रिमंडळाच्या या गटात गजेंद्र शेखावत, प्रल्हाद जोशी, अर्जुन मेघवाल, व्ही. मुरलीधरन, राजीव चंद्रशेखर, भारती पवार, दर्शना जरदोश, एल मुरुगन आणि सुभाष सरकार यांचा समावेश आहे. मोदी सरकारच्या मागच्या नऊ वर्षांतील कामगिरीची जाहिरात करण्यासाठी हा मंत्री गट इतर मंत्री आणि राज्यांच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून विविध कार्यक्रमांची आखणी करेल. मागच्या नऊ वर्षांत मोदी सरकारची उपलब्धी काय होती? हे जनतेपर्यंत पोहोचवले जाईल.

हे वाचा >> “नरेंद्र मोदी नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार, रशिया-युक्रेन युद्धात…”, नोबेल समितीकडून भारतीय पंतप्रधानांचं कौतुक

मागच्या वर्षी आठव्या वर्धापन दिनानिमित्त भाजपाने १५ दिवसांचा एक विशेष जाहीर कार्यक्रम हाती घेतला होता. ३० मेपासून पुढे हा कार्यक्रम चालला. यामध्ये मोदी सरकारने घेतलेले निर्णय, कल्याणकारी योजना यांची माहिती लोकांपर्यंत नेण्यात आली. या वर्षीदेखील पक्षाच्या कल्याणकारी योजनांच्या जाहिराती करण्यावर भर असणार आहे. लाभार्थींना गोळा करून प्रत्येक योजना तळागाळात पोहोचत आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला जाईल. केंद्र सरकारची प्रत्येक योजना प्रत्येक राज्यात यशस्वी झाली आहे, हा संदेश लोकांपर्यंत जाऊ द्या, अशा स्पष्ट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या असल्याचे भाजपामधील सूत्रांनी सांगितले.

विकासकामांच्या जाहिरातीसोबतच भाजपाकडून इतर मुद्द्यांनादेखील हात घातला जाणार आहे. अमृत महोत्सव आणि तिरंगायात्रा यांच्या शस्वितेबद्दल सांगितले जाणार आहे, तसेच काशीविश्वनाथ कॉरिडाॅर अशा धार्मिक स्थळांचा केलेला विकासदेखील लोकांपर्यंत नेला जाईल. भाजपा २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीदेखील मोदींची लोकप्रियता आणि विकासकामांच्या जाहिरातीवरच भर देणार असल्याचे दिसते. यासाठी पक्षाने अगोदरच, ‘मुझे चलते जाना है’ हा व्हिडीओ प्रसारित केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून मोदी आणखी एका विजयाच्या दिशेने निघाले असल्याचे दाखविण्यात येणार आहे.

हे वाचा >> भाजपाचे तीन सारथी; ज्यांच्यावर भाजपाचे ‘मिशन २०२४’ अमलात आणण्याची जबाबदारी

भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, आगामी काळात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे अनेक व्हिडीओ आणि शॉर्टफिल्म प्रसारित केल्या जाणार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ४०० जागांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तीन सदस्यांची एक समिती स्थापन केली असून त्यांना निवडणूक नियोजनाची जबाबदारी दिली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, सुनील बन्सल आणि तरुण चुग यांचा समावेश आहे. ही समिती केंद्र सरकार आणि राज्यातील संघटना यांच्याशी समन्वय साधून निवडणूक कार्यक्रमांची आखणी करणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 15:00 IST