ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. ओडिशात भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मोहन चरण माझी यांनी बुधवारी (१२ जून) शपथ घेतली. माझी यांनी आज भुवनेश्वरच्या जनता मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. माझी यांनी यापूर्वी माजी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची भेट घेऊन त्यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. विधानसभा निवडणुकीत बीजेडीचा पराभव झाल्यानंतर पटनाईक यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी (११ जून ) भुवनेश्वर येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या भाजपा विधिमंडळाच्या बैठकीनंतर माझी यांच्या नावाची घोषणा केली. राजनाथ यांनी माझी यांचे नाव पुढे करून त्यांचा ‘तरुण आणि गतिमान’ नेते असा उल्लेख केला. नवीन मुख्यमंत्री म्हणून माझी ओडिशाला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेईल असेही त्यांनी सांगितले. मोहन चरण माझी यांच्यासह १३ मंत्र्यांनीही शपथ घेतली.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील स्त्रीशक्ती; मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ‘त्या’ सात महिला मंत्री कोणत्या?

मोहन चरण माझी कोण आहेत?

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार, मोहन चरण माझी हे केओंझरमधून चार वेळा आमदार राहिले आहेत. माझी हे आदिवासी समाजातील आहेत. ते त्यांच्या सार्वजनिक सेवा आणि संघटनात्मक कौशल्यासाठी ओळखले जातात. ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, माझी यांचा जन्म केओंझारच्या रायकाला गावात झाला. त्यांचे वडील एक सुरक्षा रक्षक होते. २०२४ मध्ये माझी केओंझार विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. ‘टाईम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, माझी यांनी बीजेडीच्या मिना माझी यांचा पराभव करून ११, ५७७ मतांच्या अंतराने केओंझार ही जागा जिंकली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही माझी केओंझार मतदारसंघातून निवडून आले होते. २०१४ मध्ये माझी यांचा बीजेडीच्या अभिराम नाईक यांच्याकडून पराभव झाला होता. त्यांनी यापूर्वी २००० ते २००९ दरम्यान दोनदा केओंझारचे प्रतिनिधित्व केले होते. ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार, बिजू जनता दल (बीजेडी) ने भाजपाबरोबर आघाडी सरकारचे नेतृत्व केले होते, तेव्हा माझी यांनी २००५ ते २००९ पर्यंत सरकारी उपमुख्य व्हीप म्हणून काम केले होते.

विधानसभेसाठी उभे राहण्यापूर्वी, माझी हे १९९७ ते २००० पर्यंत सरपंच होते. ते अनुसूचित जाती/जमातीच्या स्थायी समितीचे सदस्यही होते. “मोहन चरण माझी हे खनिज समृद्ध केंदुझार जिल्ह्यातील एक मजबूत आणि ज्वलंत आदिवासी नेते आहेत,” असे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक जतींद्र दास यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितले. ते पुढे म्हणाले, भाजपाचे एक निष्ठावंत सदस्य असलेल्या माझी यांचे संघाशी मजबूत संबंध असल्याचे मानले जाते. “चार वेळा आमदार राहिलेल्या माझी यांना राज्याच्या शासन व्यवस्थेची सखोल माहिती आहे आणि प्रदेशासाठी भाजपाची धोरणे तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

माझी ठरले चर्चेचा विषय

सप्टेंबर २०२३ मध्ये, तत्कालीन विरोधी पक्षाचे व्हिप आणि भाजपाचे आमदार मुकेश महालिंग यांना ओडिशा विधानसभेतून अध्यक्ष प्रमिला मल्लिक यांच्या व्यासपीठावर ‘डाळ’ फेकल्याबद्दल अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले होते. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, माझी आणि महालिंग मध्यान्ह भोजन योजनेसाठी डाळ खरेदीत झालेल्या ७०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा निषेध करत होते. ‘एनडीटीव्ही’नुसार माझी यांच्याकडे कायद्याची पदवी आहे. “भगवान जगन्नाथाच्या आशीर्वादामुळे भाजपाने ओडिशात बहुमत मिळवले आहे आणि राज्यात सरकार स्थापन होणार आहे. मी ४.५ कोटी ओडियांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी परिवर्तनासाठी मतदान केले,” असे माझी यांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले.

हेही वाचा : विनोद तावडे, अनुराग ठाकूर ते बी. एल. संतोष; कोण होणार भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष?

ओडिशातील निवडणुकीचे निकाल

ओडिशात भाजपाने विधानसभेच्या १४७ पैकी ७८ जागा जिंकून सत्ता स्थापन केली. तर बीजेडीला केवळ ५१ जागा जिंकता आल्या. काँग्रेसने १४ जागा जिंकल्या आणि माकपला एक जागा मिळाली, तर तीन जागांवर अपक्ष उमेदवारही विजयी झाले. पटनाईक यांनी ५ मार्च २००० रोजी ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. भाजपा ओडिशा युनिटचे अध्यक्ष मनमोहन सामल यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय शिष्टमंडळ पटनाईक यांच्या निवासस्थानी नवीन निवास येथे गेले होते आणि त्यांना शपथविधीला उपस्थित राहण्याचे औपचारिक निमंत्रणही दिले होते.