scorecardresearch

उस्मानाबादमध्ये शिंदे गटाला बळ

शिवसेनेत अनेक वर्षे संघटनात्मक जबाबदाऱ्या पेलणारे अनिल खोचरे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील काही मूळ शिवसैनिकांचे मत परिवर्तन होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Eknath Shinde,Tanaji Sawant, Anil Khochare, Osmanabad, Shiv Sena
उस्मानाबादमध्ये शिंदे गटाला बळ ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेनेसाठी नवा संघटनात्मक चेहरा मिळाला असून सहसंपर्कप्रमुख म्हणून काम करणारे अनिल खोचरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे काम केले. मात्र, निवडणुकांमध्ये कधीही न्याय केला नाही, अशी त्यांची भावना होती. या भावनेला पालकमंत्री तानाजी सावंत यांनीही खतपाणी घातले आणि नुकतेच खोचरे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. गेल्या काही महिन्यात शिवसेनेतून कार्यकर्ते आपल्याकडे वळविण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य केल्यामुळे कळंब व उस्मानाबाद या भागातील शिवसैनिक बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडे फारसा वळला नाही. गेल्या काही वर्षात खासदार निंबाळकर आणि आमदार पाटील यांनी त्यांच्या समर्थक शिवसैनिकांची फळी बांधलेली होती. मूळ शिवसेना घडविणारे कार्यकर्ते आणि नवी फळी यामध्ये काहीसे अंतर हाेते. अनिल खोचरे हे या प्रक्रियेत काहीसे एकटे होते. मात्र, संघटनेतील छोट्या गावातील कार्यकर्त्यांच्या ओळखी तसेच संघटनात्मक कार्यक्रम घडवून आणण्यात त्यांचा पुढाकार असे. मराठवाड्यातील शिवसेना नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. परिणामी उस्मानाबादमधील शिवसेनेत तानाजी सावंत आणि आमदार ज्ञानराज चौगुले वगळता शिवसैनिकांमध्ये बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा फारसा प्रभाव दिसून आला नव्हता. मात्र, आता अनिल खोचरे यांच्यामुळे काही शिवसैनिक आता तानाजी सावंत यांच्या बाजूने झुकू शकतात.

हेही वाचा… मोदींचे विश्वासू सी. आर. पाटील नेमके आहेत कोण ?

अनेक गावांमध्ये संपर्क असणारे अनिल खोचरे यांनी पत्रकार बैठक घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा मनोदय स्पष्ट केला. ते ‘लोकसत्ता’ शी बोलताना म्हणाले, ‘उस्मानाबाद जिल्ह्याचे राजकारण एकाच घरातून होत असे. एक नेता नको असेल तर त्याच घरातील वादातून पुढे आलेला दुसरा नेता जनतेने स्वीकारावा अशी मानसिकता घडविण्यात आली. आता यातून सुटका होऊन सर्वसामांन्य व्यक्तीला राजकारणात प्रवेश मिळेल अशी आशा आता निर्माण झाली आहे. ’

हेही वाचा… नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण .. वाद नको रे बुवा

शिवसेनेत अनेक वर्षे संघटनात्मक जबाबदाऱ्या पेलणारे अनिल खोचरे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील काही मूळ शिवसैनिकांचे मत परिवर्तन होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. तानाजी सावंत आणि ज्ञानराज खोचरे यांच्याशिवाय संघटनात्मक पातळीवर काम करणारा नवा चेहरा बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळाला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-12-2022 at 16:43 IST