सोलापूर : भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि मोहिते-पाटील कुटुंबीयांमधील संघर्षाला तोंड फुटले असताना खासदार निंबाळकर यांनी दिवाळीचे निमित्त करून स्नेहमेळावा भरवून मोहिते-पाटील विरोधकांना एकत्र आणले. यातून दोन्ही गटांत शह-काटशहाचे राजकारण चांगलेच पेटल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांनी माढा लोकसभा निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. परंतु त्यानंतर गेल्या तीन-साडेतीन वर्षांत त्यांच्यात मतभेद वाढले आणि ते उत्तरोत्तर वाढतच गेले आहेत. सुरुवातीला त्यांच्या समर्थकांमध्ये शीतयुद्ध वाढले असताना दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका जाहीर न करता सावध पवित्रा घेतला होता. परंतु अलिकडे दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका जाहीर करून एकमेकांच्या विरोधात आव्हान-प्रतिआव्हान द्यायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा – पनवेल : सिडकोच्या जागेवर राडारोडा टाकणाऱ्यास अटक

खासदार निंबाळकर यांनी तर यापुढे मोहिते-पाटील यांच्या अकलूजमधील शिवरत्न बंगल्याच्या उंबरठ्यावर पायही न ठेवण्याचे जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे तथा भाजपचे जिल्हा संघटक सचिव धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आगामी माढा लोकसभेसाठी स्वतः इच्छूक उमेदवार असल्याचे जाहीर करीत संपूर्ण मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे. केंद्र सरकारशी संबंधित स्थानिक विकासाच्या प्रश्नावर त्यांनी स्वतः पाठपुरावा सुरू केला आहे. सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावर माढा आणि जेऊर (करमाळा) येथे सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांच्याकडे केली आहे. समाज माध्यमांवर दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांची उणी-दुणी काढत असताना त्यांची पातळीही घसरली आहे. स्थानिक विकास प्रश्न मार्गी लावण्याच्या कामांचे श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे.

मागील तीन-साडेतीन वर्षांत भाजपअंतर्गत निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्यात सुप्त आणि उघड संघर्ष सुरू असताना त्यात हस्तक्षेप न करता पक्षश्रेष्ठींनी त्याकडे काणाडोळाच केल्याचे पाहावयास मिळते. याच पार्श्वभूमीवर खासदार निंबाळकर यांनी नुकताच दिवाळीचे औचित्य साधत अकलूजजवळ नातेपुते येथे स्नेहमेळावा आयोजित करून मोहिते-पाटील विरोधकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणले. किंबहुना हा स्नेहमेळावा मोहिते-पाटील विरोधकांचा होता. रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाशिव खोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्नेहमेळाव्यास सांगोल्याचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, माढ्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र तथा सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, भाजपचे माढा विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, उत्तम जानकर, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माढा विभाग जिल्हाप्रमुख महेश चिवटे आदींनी हजेरी लावली होती.

या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले भाजपचे संघ वर्तुळातील आमदार श्रीकांत भारतीय यांनी मात्र समक्ष उपस्थित न राहता दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा देऊन सावध पवित्रा घेतला. सदाशिव खोत यांनी दूध दराच्या प्रश्नावर महायुती शासनाला घरचा आहेर दिल्याने सर्वांच्या भुवय्या उंचावल्या. तर मेळाव्यात माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक आणि सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले उत्तम जानकर यांचा ‘भावी आमदार’ म्हणून उल्लेख केल्यामुळे भाजपच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

हेही वाचा – नवी मुंबई : वंडर्स पार्कमधील प्रवेश महाग

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माळशिरसचे आमदार राम सातपुते, पंढरपूरचे नेते प्रशांत परिचारक, करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप आदींसह मोहिते-पाटील समर्थकांनी या मेळाव्याकडे पाठ फिरविली होती. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी, मेळाव्यास न आलेल्या आणि आपणास विरोध करणाऱ्या मंडळींकडे लक्ष न देता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपलीच उमेदवारी निश्चित असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.

एकंदरीत, या स्नेहमेळाव्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपअंतर्गत राजकारण तापले असतानाच सध्या महायुतीत दुखावलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते, आमदार महादेव जानकर यांनी अकलूजमध्ये शिवरत्न बंगल्यात विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेतली. मोहिते-पाटील कुटुंबीयांशी जानकर यांनी दीर्घवेळ बंद खोलीत खलबते केली. जानकर यांनी यापूर्वी २००९ साली माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना आव्हान दिले होते. त्यांनी आता मोहिते-पाटील यांची थेट भेट घेतल्याने त्यांच्या डोक्यात काय चालले आहे, हा चर्चेचा विषय झाला आहे. दुसरीकडे मोहिते-पाटील यांनी फलटण माण-खटाव भागात निंबाळकर विरोधकांशी सलगी वाढविली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp nimbalkar organized a friendly meeting on the occasion of diwali and brought mohite patil opponents together print politics news ssb
First published on: 01-12-2023 at 14:02 IST