आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : मुंबईचा महापौर हा राजधानी दिल्लीतूनच ठरणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला… जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाबरोबर युती होताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाच्या ४३ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले… उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदेंचा भाजपाकडून गेम होणार, असे वक्तव्य काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून केले… पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढलो असतो तर महाविकास आघाडीला ६७ जागा मिळाल्या असत्या, असा दावा काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी केला… आतातरी तोंड उघडून चुकीच्या कामाला आक्रमकपणे विरोध करा, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथील नवनिर्वाचित नगरसेवकांना दिला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार?

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या युतीला निर्विवाद बहुमत मिळाले. मात्र, महापौरपदावरून दोन्ही पक्षांमध्ये चुरस रंगल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गोटातील सर्व नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात ठेवले आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदावर शिंदे गटाने अडीज वर्षांसाठी दावा केल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मुंबईचा महापौर हा राजधानी दिल्लीतूनच ठरणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आतापर्यंत इतिहासात असे कधीच घडले नाही. महापौर ठरविण्यासाठी शिंदे गटातील लोकांना दिल्लीच्या पायाशी बसावे लागत असून हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली आहे. दुसरीकडे- भारतीय जनता पक्षाकडून आपल्याच नगरसेवकांचे फोट टॅप केले जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.

भाजपातून ४३ जणांचे राजीनामे

महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडताच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री व भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा व शिंदे गटाच्या युतीची घोषणा केली. या घोषणेनंतर काही तासांतच दोन्ही पक्षातील जागावाटपाचे सूत्रही ठरविण्यात आले. राणे यांनी घेतलेल्या युतीच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले असून राजीनामा सत्राला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाबरोबर युती होताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाच्या ओरोस मंडळाचे अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर राहून काम करणे उचित वाटत नसल्याचे त्यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे. त्यापाठोपाठ भाजपाच्या तब्बल ४३ पदाधिकाऱ्यांनीही सामूहिक राजीनामे दिले आहेत. या प्रकारामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा : फडणवीसांच्या मित्राचा भाजपा सोडण्याचा निर्णय; कोण आहेत आमदार संदीप जोशी? त्यांनी काय घोषणा केली?

शिंदे-पवारांचा गेम होणार – नाना पटोले

मुंबईतील महापौरपदावरून भाजपा व शिंदे गटात रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरून विरोधी पक्षातील अनेक नेते सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करीत आहेत. यादरम्यान मुंबईच्या महापौरपदाबद्दल भाष्य करताना काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी मोठे विधान केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा भाजपाकडून गेम होणार, असे पटोले यांनी म्हटले आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले की- महापालिकांच्या निवडणुकांआधी पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांचा चांगलाच दरारा होता, पण निवडणुकीनंतर या दोन्ही शहरांवरील त्यांची मालकी संपुष्टात आली आहे. तिकडे ठाण्यासह नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत तेच घडले आहे. भारतीय जनता पक्ष काय करणार हे मी आधीच सांगतले होते. आणखी थोडे दिवस थांबा, त्यानंतर मोठमोठ्या घडामोडी घडतील, असेही पटोले यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

प्रशांत जगताप यांचा मोठा दावा

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढलो असतो तर महाविकास आघाडीला ६७ जागा मिळाल्या असत्या, असा दावा काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी केला. ते पुणे येथील जाहीर पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार यांच्या पक्षाचे पुण्यातील शहराध्यक्षपद माझ्याकडे असताना मी कार्यकर्त्यांची चांगली मोट बांधली होती; परंतु काही जणांनी त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीमधून लढलो तर पक्षाचे चाळीसच्या आसपास नगरसेवक निवडून येतील आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर पक्षाचे तीन ते आठ नगरसेवक निवडून येतील, हे मी त्यांना काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वीच सांगितले होते. महायुतीतील घटक पक्षाला मतदान करायचे असेल तर मग भाजपालाच मतदान केलेले काय वाईट ही लोकांची मानसिकता होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने लोकांनी भाजपालाच मतदान केले, असे जगताप म्हणाले. काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही मी माझे सहकारी असलेले ७ नगरसेवक निवडून आणले. त्यांना (राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना उद्देशून) तेही जमले नाही, असा टोलाही जगताप यांनी लगावला.

हेही वाचा : Mumbai Mayor: मुंबईच्या महापौर पदासाठी रणकंदन ? कोणत्या पक्षाने काय भूमिका घेतली ?

अजित पवारांचा नगरसेवकांना आदेश

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला नाही.अजित गव्हाणे निवडणूक न लढवता मैदानाच्या बाहेर राहिल्याने जनतेत चुकीचा संदेश गेला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या विरोधात बोलणे टाळले. आतातरी तोंड उघडून चुकीच्या कामाला आक्रमकपणे विरोध करा, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येतील नवनिर्वाचित नगरसेवकांना दिला. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी स्वतः उमेदवार ठरविण्यापासून प्रचाराची धुरा सांभाळली. महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरून भाजपाच्या स्थानिक नेत्यांना लक्ष्य केले. त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आले. महापालिकेत त्यांचे केवळ ३७ नगरसेवक निवडून आले. यादरम्यान पवार यांनी पक्षातील नवनिर्वाचित ३७ नगरसेवकांची पुण्यात बैठक घेतली आणि निवडून आलेल्या नगरसेवकांचे अभिनंदन केले. यावेळी पवार यांनी आपल्या नगरसेवकांना चुकीच्या कामांना प्रखरपणे विरोध करण्याचा आदेश दिला आहे.