BMC Election Results Update: मुंबई : असाउद्दिन ओवोसी यांच्या नेतृत्त्वाखालील ऑल इंडिया मजलीस – ए- इथेहादूल मुस्लीमन म्हणजेच एमआयएम या पक्षाने महानगरपालिका निवडणुकीत १०० पेक्षा अधिक जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. समाजवादी पार्टीचा मुस्लिमांमधील जनाधार घटल्याने त्याचा फायदा एमआयएमने उचलल्याचे गणित मांडले जात आहे.एमआयएमच्या या यशाचा काँग्रेसलाही काही ठिकाणी फटका बसला आहे.

एमआयएमचे सर्वाधिक ३३ नगरसेवक हे छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून आले आहेत. मालेगाव २१, नांदेड १३, धुळे १०, मुंबई ७, सोलापूर ८, ठाणे ५, अमरावती ११, नागपूर व परभणी प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला आहे. एमआयएमच्या या यशाने काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार व शरद पवार दोन्ही गट) आदींच्या गोटात धडकी भरणे स्वाभाविक आहे.

मुंबईतील मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये समाजवादी पार्टीचे सहा ते सात नगरसेवक अनेक वर्षे निवडून येत असत. अबू आसीम आझमी आणि रईस शेख या दोन आमदारांच्या वादात पक्षाचे मोठे नुकसान झाले. पक्षाचा मुस्लीमबहुल भागातील जनाधार घटला. ही जागा एमआयएमने घेतली आहे. समाजवादी पार्टीला जेवढे यश मिळायचे तेवढेच यश एमआयएमला मिळाल्याकडे काँग्रेसच्या एका नेत्याने लक्ष वेधले.

मुस्लीमबहुल भागांमधील प्रभागांमध्ये एमआयएमची पतंग (पक्षाचे निवडणूक चिन्ह) हवेत उडाली आहे. गेली काही वर्षे राज्यात एमआयएमला अपेक्षित यश मिळत नव्हते. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात मुस्लीम मते काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट या महाविकास आघाडीच्या परड्यात पडली होती. महानगरपालिका निवडणुकीत मुस्लिम मतांचे विभाजन झाले आहे. एमआयएमला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याकबहुल भागांमध्ये अपेक्षित पाठिंबा मिळतो. यंदा मालेगाव, नांदेड, सोलापूर, अमरावती, धुळे, मुंब्रा आदी मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये एमआयएमचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत. याचाच अर्थ मुस्लीम मते यंदा मोठ्या प्रमाणावर एमआयएमएम कडे वळल्याचे स्पष्ट होते.

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लीम मते मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाली होती. मुंबईत शिवसेना व काँग्रेसची आघाडी नव्हती. तसेच उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीमुळे मुस्लिमांची एकगठ्ठा मते शिवसेनेला मिळाली नाहीत. मु्स्लिमांनी एमआयएमचा पर्याय स्वीकारला. वास्तविक एमआयएम राज्यात पक्षांतर्गत गटबाजीने पोखरला आहे. संभाजीनगरमधील वाद समोर आला. पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला झाला. मुंबईतही पक्षांतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणावर आहे. तरीही मुस्लीस समाजातून एमआयएमला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला.

एमआयएमबद्दल जनमानसा स्थान असल्याचे या निकालावरून स्पष्ट होते.- इम्तीयाज जलिल , प्रदेशाध्यक्ष एमआयएम.