मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांत १० जूनला होणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाची कसोटी लागली आहे. मुंबई आणि कोकण पदवीधरच्या जागा कायम राखण्याचे भाजप आणि ठाकरे गटापुढे मोठे आव्हान असेल.
विधान परिषदेचे चार सदस्य हे ७ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या चारही मतदारसंघांत १० जून रोजी मतदान होणार असून, १३ जूनला मतमोजणी होईल, असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. या चारही मतदारसंघांमध्ये १५ ते २२ मे या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. निवृत्त होणाऱ्या चार सदस्यांमध्ये भाजप, ठाकरे गट, लोकभारती (जनता दल युनायटेड) आणि अपक्ष सदस्यांचा समावेश आहे.
हेही वाचा : बसपा अध्यक्ष मायावती यांचा पुतण्या आकाश आनंद नेमका कोण?
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये जो उमेदवार अधिक मतदार नोंदणी करतो त्याला निवडणूक अधिक सोपी जाते हे नेहमीच अनुभवास येते. मुंबई पदवीधर या शिवसेना ठाकरे गटाचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघातील लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गट की भाजपचा उमेदवार असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ठाकरे गटाकडून अनिल परब, वरुण सरदेसाई ही नावे चर्चेत आहेत.
मुंबई शिक्षक मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले लोकभारतीचे कपिल पाटील यांनी आता लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. याऐवजी लोकभारतीने सुभाष मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजप या मतदारसंघात उमेदवार उभा करणार आहे.
हेही वाचा : गोध्रा जळितकांड: मोदींची लालूंवर टीका; नेमका कोणत्या समितीचा उल्लेख केला?
कोकण पदवीधर हा पारंपारिक भाजपचा मतदारसंघ मानला जातो. निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात विजय संपादन करीत भाजपचे वर्चस्व मोडून काढले होेते. पण २०१८च्या निवडणुकीपूर्वी डावखरे यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून पुन्हा निरंजन डावखरे यांना उमेदवारी मिळणार आहे.
नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांनी शिवसेनेला साथ दिली. पक्षातील फुटीनंतर दराडे बंधू हे ठाकरे गटाबरोबर कायम असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
हेही वाचा : “तुम्हाला जामीन मिळाला तर तुम्ही फाइल्सवर सही…”; केजरीवालांच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?
निवृत्त होणारे आमदार :
विलास पोतसीन – शिवसेना ठाकरे गट (मुंबई पदवीधर)
कपिल पाटील – लोकभारती (मुंबई शिक्षक)
निरंजन डावखरे – भाजप (कोकण पदवीधर)
किशोर दराडे – अपक्ष ( नाशिक शिक्षक)