Voters ink municipal corporation election महापालिका निवडणुकांसाठी आज सकाळपासूनच मतदान केले जात आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी हे मतदान पार पडत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह सर्वत्र सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या महापालिका निवडणुकांत प्रत्येक पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र, याचदरम्यान एका विषयावरून वाद निर्माण झाला आहे. विरोधक आणि अनेक मतदारांकडून असा दावा केला जात आहे की, मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई सहज पुसली जात आहे. महापालिका निवडणुकीत शाई वादाचा मुद्दा का ठरत आहे? ही शाई नक्की कुठे आणि कशी तयार होते? ती पुसली का जात नाही? याविषयी जाणून घेऊयात…

मतदानानंतर बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईवरून वाद

मतदानानंतर बोटावर अमिट शाई लावली जात असते. मतदान करून बाहेर पडलेल्या मतदाराच्या बोटावर लावली जाणारी शाई ही पूर्वी अनेक दिवस जात नसे. साबण, पाणी, डिटर्जंट वापरूनही ती सहज निघत नसे. मात्र, महापालिका निवडणुकांमध्ये मार्करद्वारे शाई लावली जात आहे. लावलेली शाई ही नेलपेंट रिमूव्हरद्वारे काही क्षणांत पुसली जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. ठाणे महापालिका मतदान प्रक्रिया सुरू असतानाच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओंमध्ये एक मतदार मतदानानंतर बोटावरील शाईवर नेलपेंट रिमूव्हर लावताच ती पूर्णपणे निघून जात असल्याचे दाखवताना दिसत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना सरकार आणि प्रशासनावर ताशेरे ओढले. फ्रॉड निवडणुकांतून सत्तेत येण्याला सत्ता म्हणत नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले. बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. “निवडणुका कशा पद्धतीनं जिंकायच्या हे सरकारनं ठरवलं आहे. बोटावर जी शाई लावली जायची, त्या जागी आता नवीन पेन आणलाय. म्हणजे मतदार मतदान करून बाहेर आल्यानंतर सॅनिटायजरने ही शाई लगेच पुसली जातेय,” असा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे सध्या शाईवरून राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.

मतदानादरम्यान वापरण्यात येणारी शाई नक्की कशी तयार होते?

मतदानाच्या आधी मतदारांना निळी शाई लावली जाते. ही शाई अनेक दिवस बोटावर तशीच राहते. या शाईला ‘फॉस्फरिक इंक’ असेही म्हणतात. मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि बोगस मतदान होऊ नये म्हणून या शाईचा वापर केला जातो. १९६२ साली झालेल्या भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या शाईचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला. देशात १९५१-५२ साली पहिल्यांदा निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी अनेकांनी दोनदा मतदान केल्याचा प्रकार समोर आला. निवडणूक आयोगाकडे त्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांवरून निवडणूक आयोगाने मार्ग काढण्याचा विचार केला. तेव्हा, मतदाराच्या बोटावर शाई लावण्याची संकल्पना समोर आली.

‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च-नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी’ (CSIR-NPL)ने ही शाई विकसित केली असून, तिचे उत्पादन ‘मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड’द्वारे केले जाते. आज ही शाई ३० हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाते. निवडणुकीच्या शाईची रचना अतिशय रंजक आहे. त्यात त्वरित ओळखीसाठी एक विशिष्ट रंगद्रव्य आणि ‘सिल्व्हर नायट्रेट’ हा महत्त्वाचा घटक असतो. जेव्हा ही शाई त्वचेवर लावली जाते तेव्हा सिल्व्हर नायट्रेटचा अतिनील प्रकाशाशी (यूव्ही लाईट) आणि त्वचेशी संपर्क येतो, ज्यातून ‘सिल्व्हर क्लोराईड’ तयार होते. त्यामुळे ही शाई सहसा पुसली जात नाही, केवळ त्वचेच्या बाहेरील पेशी बदलल्या गेल्या तरच हा रंग निघतो.

शाई किती काळ टिकायला हवी यानुसार सिल्व्हर नायट्रेटचे प्रमाण १० ते १८ टक्क्यांदरम्यान असते. शाई लावण्याची पद्धत सोपी, पण प्रभावी आहे. सहसा ती डाव्या हाताच्या अंगठ्यावर, नखावर आणि बोटावर सरळ रेषेत, विशेषतः ‘क्युटिकल’ (नखाच्या मुळाशी असलेली त्वचा)वर लावली जाते, जिथून ती पटकन काढणे जवळजवळ अशक्य असते. शाई लावण्याच्या पद्धतींमध्ये स्पंज असलेल्या बाटल्या, ब्रश असलेल्या बाटल्या, स्प्रे बाटल्या व मार्कर पेन यांचा समावेश होतो.

शाई त्वचेवर कितीकाळ टिकते?

ही शाई त्वचेवर साधारणतः ७२ ते ९६ तास टिकते आणि नखांवर व क्युटिकलच्या भागावर दोन ते चार आठवडे राहू शकते, असे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने आपल्या वृत्तात नमूद केले आहे. क्युटिकलवरील डाग नवीन नखांच्या वाढीबरोबरच नाहीसा होतो. शाई ही लोकशाही प्रक्रियेचे एक वैशिष्ट्य आहे, ती एखाद्याच्या मतदानाच्या मूलभूत अधिकाराच्या वापराचे प्रतीक आहे आणि निवडणूक प्रणालीची निष्पक्षता सुनिश्चित करते.

शाई लवकर सुकण्यासाठी त्यात अल्कोहोलसारखे द्रावक वापरल्याने ती अधिक टिकाऊ असते. काही प्रकारांमध्ये बायोसाईडचा समावेश असू शकतो, जेणेकरून एका मतदाराकडून दुसऱ्या मतदाराकडे जीवाणूंचे संक्रमण होणार नाही. ही शाई प्रभावी असूनही निवडणूक शाईच्या वापराबाबत काही वाद यापूर्वीही समोर आले आहेत. काही ठिकाणी विविध रासायनिक पद्धतींनी शाई काढल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे तिच्या परिणामकारकतेबद्दल चिंता व्यक्त केली गेली, असे ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे.

असे असूनही निवडणूक गैरप्रकार रोखण्यासाठी ही आजही एक व्यापकपणे वापरली जाणारी पद्धत आहे. निवडणूक शाईची भूमिका केवळ तांत्रिक बाबींपुरती मर्यादित नाही, ती लोकशाही प्रक्रियेतील आपल्या सहभागाची एक ग्वाही आहे. मतदान केल्यानंतर नागरिक अभिमानाने आपली शाई लागलेली बोटे दाखवतात. हे देशाचे भवितव्य घडवण्यातील त्यांच्या योगदानाचे प्रतीक आहे.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

निवडणूक आयोगाने नमूद केले की, बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता घेण्यात आली आहे. त्यांनी पुढे म्हटले की, मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०११ रोजी आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. निवडणूक आयोगाने याबाबत, “या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी. तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजूला त्वचेवर तीन-चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वीदेखील देण्यात आल्या आहेत आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या गेल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये,” असे स्पष्ट केले आहे.