scorecardresearch

शरद पवार यांच्या उपस्थितीत मुस्लिम विचारवंत परिषद

गेल्या काही वर्षापासून मुस्लिम समाजात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना, मतदार म्हणून बदलेली भावना याचा विचार समजून घेण्यासाठी तसेच मुस्लिम समाजाच्या प्रश्नाचा उहापोह व्हावा म्हणून ही परिषद आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Aurangabad, NCP, Muslim intellectuals council, Sharad Pawar
शरद पवार यांच्या उपस्थितीत मुस्लिम विचारवंत परिषद ( संग्रहित छायाचित्र )

सुहास सरदेशमुख

औरंगाबाद: औरंगाबामध्ये येत्या रविवारी होणाऱ्या मुस्लिम विचारवंताच्या परिषदेत राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हजेरी लावणार आहेत. गेल्या काही वर्षापासून मुस्लिम समाजात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना, मतदार म्हणून बदलेली भावना याचा विचार समजून घेण्यासाठी तसेच मुस्लिम समाजाच्या प्रश्नाचा उहापोह व्हावा म्हणून ही परिषद आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांकडून आज एक दिवसाचा संप; इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील मुस्लिम समाजाची मते एकगठ्ठा करुन ती आपल्याकडे वळविण्यास मजलिस- ए- इत्तेहादुल – मुसलमीन अर्थात एमआयएम या पक्षाला यश मिळाले होते. ध्रुवीकरणाचे अनेक विषय राज्याच्या राजकारणात औरंगाबाद येथूनच सुरू होतात. त्यामुळे मुस्लिम समाजाचा विचार करण्याची पद्धती जाणून घेण्यासाठी देशातील विविध नेते औरंगाबाद येथे येत असतात. गेल्या काही दिवसापासून मुस्लिम समाजातूनही आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी पुढे रेटता यावी म्हणून ओवेसी यांनी तेलंगणा येथील काही प्राध्यापक आणि विचारवंताची परिषद औरंगाबाद येथे घेतली होती. काॅग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मुस्लिम विरोधी आहेत, असे वातावरण ‘एमआयएम’ कडून निर्माण करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने मुस्लीम विचारवंतांची परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये १०० एक जणांचा सहभाग असेल. यात शरद पवारांशी संवाद होणार असल्याचे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या फौजिया खान यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 10:56 IST