काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली. या यात्रेचा शेवटच्या टप्प्यात आज एक दुःखद घटना घडली. आज सकाळी पंजाबच्या जालंधर येथे काँग्रसचे खासदार संतोख सिंह चौधरी यांचा यात्रेत चालत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या मृत्यूनंतर संतोख सिंह यांचे सुपुत्र आणि हल्का फिल्लौरचे आमदार विक्रमजीत चौधरी यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. माझ्या वडीलांचा मृत्यू निष्काळजीपणामुळं झाला असा आरोप त्यांनी लावला आहे. विशेष म्हणजे भाजपाच्यावतीनेही या आरोपाला दुजोरा मिळाला असून सर्वांनीच पंजाबचे सत्ताधारी आपला याबाबत जबाबदार धरले आहे.

विक्रमजीत चौधरी म्हणाले की, जेव्हा वडीलांना रुग्णवाहिकेत नेण्यात येत होते तेव्हा छातीवर पंप करत असताना ते श्वास घेत होते. तेव्हा घटनास्थळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सर्वांना बाजूला सारत आम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवू, असे सांगितले. पण त्यांच्याकडे खरंतर कोणतंही साहित्य नव्हते. डॉक्टर गांगरलेल्या अवस्थेत होते. आतापर्यंत त्यांचे कॅटरॅकचे ऑपरेशन सोडले तर माझ्या वडीलांना कधीही कोणता आजार झाला नव्हता.

विक्रमजीत चौधरी आणि इतर विरोधी पक्षांनी आम आदमी पक्षाला देखील जबाबदार धरले आहे. भाजपाचे माजी कॅबिनेट मंत्री मनोरंजन कालिया यांनी सांगितले की, संतोख सिंह यांच्यावर उपचार करण्यात हलगर्जीपणा झालेला आहे आणि याला आप पक्ष जबाबदार आहे. संतोख सिंह यांना वेळेवर योग्य उपचार मिळाले असते तर कदाचित ते वाचले असते. राहुल गांधी यांच्यामागे जी रुग्णवाहिका असते, त्यात साधी साधी उपकरणे देखील नव्हती. याची संपूर्ण जबाबदारी पंजाबचे राज्यकर्ते आप पक्षाचीच आहे.

मनोरंजन कालिया पुढे म्हणाले की, कमीतकमी व्हीआयपी मंडळीसाठीतरी अतिशय काटेकोर नियोजन असायला हवे. रुग्णवाहिकेत जिथे रुग्णाला झोपवले जाते, तिथे सामान ठेवण्यात आले होते. डॉक्टर गांगरलेल्या अवस्थेत एकमेकांकडे पाहत होते. म्हणजे या डॉक्टरांना अशा गंभीर परिस्थितीत काय करायचे? याचे प्रशिक्षणच मिळाले नव्हते. या संपूर्ण घटनेसाठी पंजाब सरकार जबाबदार असून त्यांनी या यात्रेसाठी चांगल्या आरोग्य सुविधा द्यायला हव्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठ डॉक्टरांनी मात्र आरोप फेटाळले

हलगर्जीपणाचे आरोप झाल्यानंतर जालंधरचे शल्य चिकीत्सक डॉ. रमन शर्मा यांनी आजतकशी बोलताना त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. आम्ही कुठलाही हलगर्जीपणा केलेला नाही. खासदारांचे दुःखद निधन झाल्याबद्दल आम्हालाही वाईट वाटत आहे. संतोख सिंह यांना सकाळी ८.३० वाजता हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा माझ्या टीमशी मी बोललो होतो. आम्ही प्रोटोकॉलनुसार खासदारांवर उपचार केले. सीपीआर, कोरडिंग मसाज केली गेली. त्यांना ऑक्सिजनही लावले होते. दोन वेळा शॉकचे झटके देण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतरही आमच्या डॉक्टरांनी सहकार्य केले, मात्र तरिही आम्ही खासदारांना वाचवू शकलो नाहीत, याचे आम्हाला शल्य आहे.