नागपूर : दीक्षाभूमी -१४ ऑक्टोबर १९५६ हा नागपूरच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींचा दिवस.. या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या घटनेची साक्षीदार असलेली भूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाते. या रक्तविरहीत समााजक्रांतीची माहिती पुढच्या पिढीला व्हावी म्हणून तेथे स्मारक उभारले. ते जगभाराचे प्रेरणास्थान मानले जाते.

संविधान चौक – डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले. त्याच्या सन्मानार्थ नागपुरातील एका महत्वाच्या चौकाला संविधान चौक असे नाव देण्यात आले. तेथे संविधानाची प्रास्ताविका एका दगडी शिलेवर कोरण्यात आली. दलित, पीडित, शोषित, अन्यायग्रस्तांच्या आंदोलनाचे केंद्र म्हणून हा चौक ओळखला जातो. तेथे डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाआहे.

दीक्षाभूमी आणि संविधान चौक ही दोन ठिकाणे नागपूरच्या सामाजिक व वैचारिक अस्मितेची प्रतीके मानली जातात. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर देशभरातील लाखो आंबेडकर अनुयायी एकत्र येऊन महामानवाला अभिवादन करतात तर दरवर्षी १४ एप्रिलला या महामानवाच्या जयंतीदिनी संविधान चौक लाखो भीमसैनिकांकडून होणाऱ्या बाबासाहेबांच्या जयजयकाराने गुंजतो. मात्र, सध्या ही दोन्ही स्थळे वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली असून त्याकडे सामाजिक आणि राजकीय अंगने बघितले जाऊ लागले आहे.

दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतीत वर्चस्वासाठी वाद सुरूआहेआणि तो अयोग्य आहे म्हणून त्याविरोधात संविधान चौकात आंदोलन केले जात आहे. विशेष म्हणजे, संघर्ष करणारेआणि आंदोलन करणारे दोन्ही गट स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी मानत असल्याने या वादाचा परिणाम थेटआंबेडकरी समाजाच्या प्रतीकांवर होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

नागपूर हे २०१४नंतर देशातील उजव्या विचारांच्या राजकारणाचे प्रमुख केंद्रहीआहे. त्यामुळे येथील प्रत्येक घडामोडींमागे काही राजकारण आहे का?या दृष्टीनेही बघितले जाते. हा वादही त्याला अपवाद नाही. राजकीय जाणकारांच्या मते, हा वाद केवळ समितीवरील वर्चस्वाच्या संघर्षापुरता मर्यादित नसून त्यामागे अर्थकारण आणि राजकीय हितसंबंधही दडलेले असू शकतात. दीक्षाभूमीच्या विकासासाठी शासनाकडून मिळणारा कोट्यवधी रुपयांचा निधी, समितीच्याअखत्यारीतील शैक्षणिक संस्था आणि सामाजिक प्रभाव यामुळे स्मारक समितीवरील नियंत्रणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे समितीतील संघर्षात विविध राजकीय प्रवाहांचे अप्रत्यक्ष पाठबळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच राजकारणात प्रतीकांना अत्यंत महत्त्व असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि वारसा हा आज सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा सामाजिक आधार बनला आहे. जेव्हा आंबेडकरी गटांमध्येच संघर्ष निर्माण होतो, तेव्हा त्याचा परिणाम संबंधित प्रतीकांच्या सार्वजनिक प्रतिमेवर होऊ शकतो. विरोधकांना टीकेची संधी मिळते, तर सत्ताधारी शक्तींना हस्तक्षेप किंवा प्रभाव वाढवण्याची संधी निर्माण होऊ शकते, असा राजकीय विश्लेषकांना वाटते.

नागपूरची ओळख एकीकडे धम्मचक्र प्रवर्तनाची भूमी म्हणून आहे, तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामुळे ती संघाच्या वैचारिक केंद्राच्या रूपातही ओळखली जाते. या दोन अस्मिता अनेकदा समांतरपणे पुढे आल्या असल्या, तरी राजकीय पटलावर त्यांचे स्वतंत्र महत्त्व कायम आहे. सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तासमीकरणे आणि परिवाराचा प्रभाव लक्षात घेता, या प्रश्नावर पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याला महत्त्व प्राप्त होणारआहे. सरकारी हस्तक्षेपाला आंबेडकरी समाज रस्त्यावर येऊन विरोध करेल, असा इशारा ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांनी यापूर्वीच दिला आहे.