नागपूर : अमरावतीतील सरकारी रुग्णालयात आगीच्या दुर्घटनेत तीन नवजात बाळांचा मृत्यू, गडचिरोलीतील आश्रमशाळेतील तीन आदिवासी मुलींचा सर्पदंशाने मृत्यू आणि नागपूरकडे सणासाठी येणाऱ्या छत्तीसगडमधील सहा महिला व त्यांच्या तीन चिमुकल्यांचा अपघाती मृत्यू—या तीनही घटना वेगवेगळ्या असल्या, तरी त्यांची वेदना ताजी आहे. विशेष म्हणजे, या घटनांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नागपूरच्या सत्ताधारी राजकारणाशी जोडला जातो. अशा वेळी शुक्रवारी नागपुरात झालेल्या मारबत मिरवणुकीतील सत्ताधारी नेत्यांचा उत्सवी सहभाग अनेकांच्या संवेदनशीलतेच्या कसोटीवर प्रश्न उपस्थित करणारा ठरला.
या घटना अगदी अलीकडच्या आहेत. १० ऑगस्टला गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळेतील तीन आदिवासी मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. आश्रमशाळांमधील सुरक्षितता, आरोग्य सुविधा आणि प्रशासनाची तत्परता याबाबत या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले. गडचिरोलीचे पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून सहपालकमंत्री अॅड. आशीष जयस्वाल आहेत. दोघांचाही नागपूरच्या राजकारणाशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे गडचिरोलीतील या घटनेची जबाबदारी केवळ स्थानिक प्रशासनापुरती मर्यादित राहत नाही, असा राजकीय संदेशही त्यातून जातो.
२४ ऑगस्टला अमरावतीच्या सरकारी रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन नवजात बाळांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या चौकशी अहवालातून रुग्णालयातील व्यवस्थेतील त्रुटी आणि प्रशासकीय अनास्थेवर बोट ठेवण्यात आले. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचेही पालकमंत्री आहेत. त्यामुळे अमरावतीतील या दुर्घटनेची राजकीय जबाबदारी नागपूरच्या सत्ताधारी नेतृत्वापासून वेगळी करता येत नाही.
यात भर पडली ती ११ सप्टेंबरच्या पहाटे घडलेल्या भीषण अपघाताची. नागपूरकडे सणासाठी येणाऱ्या छत्तीसगडमधील वाहनाला झालेल्या अपघातात सहा महिला आणि तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. सणाच्या दिवशीच नऊ जणांचे जीव जाणे ही नागपूरसह संपूर्ण विदर्भासाठी हेलावून टाकणारी घटना होती. नागपूरमधील छ्तीसगढी समाजाचा नागपूरच्या राजकारणात, विशेषतः भाजपच्या राजकीय समीकरणात, प्रभाव असल्याचे मानले जाते. निवडणुकीच्या काळात या समाजाशी जवळीक साधण्यासाठी राजकीय प्रयत्न होत असतात. त्यामुळे या दुर्घटनेची वेदना नागपूरच्या सत्ताधारी राजकारणापर्यंत पोहोचणे अपेक्षित होते.
अशा पार्श्वभूमीवर शुक्रवारी नागपुरात मारबत मिरवणूक निघाली. मारबत ही नागपूरची ऐतिहासिक आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेली लोकपरंपरा आहे. तिचे महत्त्व वेगळे आहे. मात्र, यंदा महापालिकेने उत्सवाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला. ‘मारबत ग्लोबल करण्याच्या’ प्रयत्नांत सार्वजनिक निधीचा वापर आणि त्यानंतर सत्ताधारी नेत्यांचा उत्सवी सहभाग यामुळे वेगळाच राजकीय संदेश गेला.
प्रश्न मारबत साजरी करण्याचा नाही. प्रश्न आहे तो वेळेचा आणि संवेदनशीलतेचा. एका बाजूला पूर्व विदर्भातील अनेक भाग दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करीत आहेत. गावागावात पोळा साधेपणाने साजरा होत असताना दुसरीकडे नागपुरात उत्सवासाठी मोठा खर्च केला जातो. त्याच वेळी अवघ्या काही तासांपूर्वी नऊ जणांचा अपघाती मृत्यू झालेला असतो. अशा वेळी सत्ताधारी नेत्यांनी उत्सवात सहभागी होताना किमान शोक व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली वाहून आणि काही काळ संयम पाळून आपली संवेदनशीलता दाखवणे अपेक्षित होते, असे म्हणणे गैर ठरणार नाही. पूर्वी मोठी दुर्घटना घडल्यास सार्वजनिक कार्यक्रम रद्द करणे, कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी श्रद्धांजली वाहणे किंवा उत्सवाचा स्वर काही काळ संयत ठेवणे ही राजकीय आणि सामाजिक शिष्टाचाराची बाब मानली जात असे. वरील तिन्ही घटनांचे दुःख अजून ताजे असताना नागपुरातील सत्ताधारी नेते उत्सवी झगमगाटात सहभागी होताना दिसतात, तेव्हा ‘उत्सव महत्त्वाचा की संवेदना?’ हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे..
