नागपूर : नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन भाजपने केले असले तरी या निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्वपक्षीय मतदारांमध्ये मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. शेजारच्या जिल्ह्यांमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदारांचे मत ‘लाख’मोलाचे ठरले असताना नागपुरात सत्ताधाऱ्यांनी बिनविरोधची भूमिका घेतल्याने मतदारांच्या मताचे मूल्य कमी (‘मातीमोल’) होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विधान परिषदेची पोटनिवडणूक होत आहे, सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस. मर्यादित मतदार असल्याने या निवडणुकीला घोडेबाजाराची पार्श्वभूमी आहे. पक्ष,निष्ठा, धोरण, विचारसरणी यापेक्षा या निवडणुकीत ‘लक्ष्मीदर्शन’ प्रभावी ठरते हा आजवरचा इतिहास आहे, त्यामुळे लक्ष्मीपुत्र किंवा त्यांचा आशीर्वाद असणारेच येथून निवडून येतात.२०२२ मध्ये याच मतदारसंघातून भाजप नेते व विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले होते, त्यांना या निवडणुकीतील अर्थकारणाची इत्यंभूत माहिती आहे, त्यामुळेच त्यांनी यंदा नागपूर जिल्ह्यातील निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी पुढाकारही घेतला.
एकूण मतदारांपैकी ६७ टक्के मतदार महायुतीकडे असणे हे यासाठी आणखी एक प्रमुख कारण आहे. दुसरीकडे विरोधकांकडे मतांचे पुरेसे संख्याबळ आणि प्रबळ उमेदवार नसणे ही बाब भाजपच्या पत्थ्यावर पडणारी आहे, त्यामुळे त्यांनी उमेदवारच दिला नाही तर निवडणुकीतील घोडेबाजाराला संधीच उरणार नाही, असे भाजपला वाटते, पण भाजपसह इतर पक्षाच्या मतदारांच्या मनात मात्र निवडणूक व्हावी असे आहे, असे झाले तरच मतमुल्य वाढेल असे त्यांना वाटते, मात्र, भाजपसह विविध पक्षांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांमध्ये निवडणूक व्हावी, अशी भावना असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक झाल्यास मतदारांच्या मताचे ‘मुल्य’ वाढते, तर बिनविरोध निवडणुकीत मतदारांची भूमिका गौण ठरते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. ही भावना शेजारच्या जिल्ह्यांतील परिस्थितीमुळे आणखी तीव्र झाली आहे.
शेजारच्या जिल्ह्यांतील परिस्थितीची चर्चा
नागपूरलगतच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली तसेच भंडारा-गोंदिया या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतही विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. या मतदारसंघांत सत्ताधारी आणि विरोधक तुल्यबळ असल्याने प्रत्येक मत ‘लाख’ मोलाचे ठरू लागले आहे. मतदारांभोवती राजकीय हालचाली वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेतनागपूरमधील मतदार हे सर्व पाहत आहेत. त्यांनाही आपल्या मताचे वजन जाणवावे, अशी स्वाभाविक अपेक्षा आहे. त्यामुळे बिनविरोधच्या आवाहनाबद्दल त्यांच्यात उत्साहापेक्षा उदासीनताच अधिक दिसते.
काँग्रेसची कोंडी
या निवडणुकीत काँग्रेसची कधी नव्हे इतकी कोंडी झाली आहे. विजयासाठी लागणारे मतदारांचे भक्कम पाठबळ भाजपकडे असल्याने त्यांच्या विरुद्ध उमेदवार द्यायचा ठरला तर तो ‘गेमचेंजर’ असावा लागतो, तसा उमेदवार सध्या तरी यापक्षाकडे नाही. काँग्रेसची सत्ता असताना अनेक वर्ष मंत्रीपद भोगणाऱ्या नेत्याकडे पक्षाने या निवडणुकीची जबाबदारी सोपवली. त्यांनी घेतलेल्या बैठकीत एकही कोणीच उमेदवारीची मागणी केली नाही. उठसूठ भाजपवर टीका करणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेत-त्वाला आव्हान देणाऱ्या काँग्रेसच्या स्थािक नेत्यांना मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात भाजप विरोधात उमेदवार मिळू नये ही या पक्षासाठी नामुष्कीची बाब आहे, तसे होऊ नये म्हणून पराभव अटळ असताना काँग्रेसला येथे उमेदवार द्यावाच लागणार आहे आणि हीच बाब बिनविरोध निवडणुकीच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर आहे,दरम्यान, “निवडणूक झाली तरच मताला मूल्य, अन्यथा मत मातीमोल” अशा आशयाचे संदेश सध्या मतदारांच्या मोबाईलवर फिरत असून बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेला त्यातून आणखी हवा मिळत आहे
