नागपूर : प्रशासकराजच्या चार वर्षांनी झालेल्या निवडणुकीनंतर महापालिकेत भाजप पुन्हा सत्तेत आली. केंद्र व राज्यातही पक्ष सत्तेत असल्यामुळे चार वर्षांपासून गल्लीबोळातील रखडलेली कामे आता मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून विरोधी पक्षच नव्हे तर सत्ताधारी नगरसेवकही स्थायी समिती सभापती शिवानी दाणी फाईल मंजूर करीत नसल्याच्या तक्रारी करीत आहे. यातून विशेषत: सत्ताधाऱ्यांमध्येच संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहे. विशेष म्हणजे प्रभागातील विकास कामांवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असून जनतपुढे कसे जायचे, असा सवाल नगरसेवक उपस्थित करीत आहेत.
अशी पडली संघर्षाची ठिणगी
महापालिकेत सत्ताधारी नगरसेवक प्रभागातील विविध विकास कामांच्या फाईल तयार करीत आहेत. अर्थातच या फाईल मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात येते. यात रस्त्याचे कामे, रस्ता दुरुस्ती, सांडपाणी वाहिनीची दुरुस्ती, समाजभवन दुरुस्ती आदीच्या फाईलचा समावेश आहे. या फाईल केवळ १० लाखांच्या कामांच्या आहेत. परंतु गेल्या काही महिन्यात या फाईल मंजूर केल्या जात नसल्याची विरोधी तसेच सत्ताधारी नगरसेवकांचीच ओरड आहे. यातील ज्येष्ठ नगरसेवकांचाही समावेश असून पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या सभापतींकडून थेट नकार मिळत असल्याने त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचल्याचे त्यांचे मत आहे. भाजप शिस्तीचा पक्ष असल्याने नगरसेवक उघडपणे बोलत नाही. परंतु महापालिकेत त्यांच्या नाराजीच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत.
जनतेपुढे कसे जाणार?
निम्मे आर्थिक वर्ष संपले. शिल्लक निम्म्या वर्षात विकासकामाची एकही फाईल मंजूर न झाल्यास जनतेला काय उत्तर देणार, असा सवाल काही सत्ताधारी नगरसेवक करीत आहेत. विकासकामांचे आश्वासन देऊन नगरसेवक म्हणून महापालिकेत आलो. परंतु सत्ताधारी पक्षातील पदाधिकारीच विकासकामे रोखत असल्याने जनतेपुढे कसे जाणार, असा सवाल काही नगरसेवकांनी केला. विकासकामाच्या आता तयार केलेल्या पूर्ण फाईल या वर्षात होणार नाही, किमान त्या मंजूर करून ठेवल्यास पुढील आर्थिक वर्षात ती कामे होतील, या अपेक्षेने नगरसेवक फाईल तयार करीत आहेत. त्या मंजूर न झाल्यास पुढील वर्षी पुन्हा तीच प्रक्रिया करण्यात वेळ जाईल आणि विकासकामे रखडतील, अशी भीती नगरसेवकांत आहे.
गटात विभागले नवीन व जुने नगरसेवक
एकीकडे नगरसेवकांच्या फाईल मंजूर होत नसल्याच्या तक्रारी असतानाच महापालिकेत नवीन व जुने ज्येष्ठ नगरसेवक असे दोन गट पडल्याचीही चर्चा आहे. नवीन नगरसेवकांचे नेतृत्त्व सध्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी करीत असल्याची चर्चा आहे. नवीन नगरसेवकांच्या फाईलला प्राधान्य दिल्या जात असल्यात असल्याची कैफियत काही नगरसेवकांनी महापौर, सत्तापक्ष नेत्यांकडे मांडली. त्यांनीही स्थायी समिती सभापतींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पळसाला पाने तीनच, अशी स्थिती आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नगरसेवकांपुढे रखडलेल्या फाईलवर तोडग्यासाठी कुणाकडे जावे, असा प्रश्न उभा राहिला आहे.
स्थायी समिती सभापती म्हणाल्या… वाईटपणा घेईल…
केवळ निविदा प्रक्रिया टाळण्यासाठी विकासकामांच्या फाईल १० लाख रुपयांपर्यंत तयार करणे मान्य नाही. नगरसेवकांसोबत वाईटपण घेईल, परंतु मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असे स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी नमुद केले. विविध प्रभागांमधील रस्ते आणि इतर विकासकामांचे तुकडे करून १० लाख रुपयांपर्यंतच्या ‘कोटेशन’ फाईल म्हणून सादर केल्या जात आहेत. यामुळे महापालिकेच्या निधीचा गैरवापर आणि कामाच्या गुणवत्तेवरही परिणाम होऊ शकतो. ही कामे एकत्रित करून निविदा प्रक्रियेद्वारे केली जाऊ शकतात. यामुळे केवळ कामाची गुणवत्ताच सुधारणार नाही, तर सुमारे ४० टक्के निधीची बचत होईल, असे दाणी म्हणाल्या. स्थायी समितीने अशा अनेक फायली परत पाठवल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अशावेळी काहींनी नेत्यांकडून दबाव आला, मात्र, निर्णय प्रक्रियेत कोणताही बाह्य हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे दाणी-वाखरे यांनी स्पष्ट केले.
विषय समिती व झोन सभापतींमध्ये शीतयुद्ध
महापालिकेतील विविध विषयांच्या सभापतीपदी महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत अधिकाऱ्यांमध्ये वारंवार बैठकीस बोलावण्यावरून या सभापतींबाबत नाराजीचा सूर आहे. आता विषय समित्यांच्या सभापती झोन कार्यालयांमध्ये बैठकी घेत असल्याने झोन सभापतींचाही अहंकार दुखावल्याचे चित्र आहे. यातून एखादवेळी वादाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ताधारी पक्षात ही एक दुसरी चिंतेची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे भाजप सत्तेत आल्यानंतर महापौरपद महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्याने संपूर्णपणे महिलाराज ही भाजपची संकल्पना होती. परंतु आता विषय समिती सभापतींविरोधात प्रशासनात नाराजी वाढत आहे. महापालिकेला केवळ सल्ला देण्याचा अधिकार या समित्यांना आहे. परंतु स्थायी समितीप्रमाणे सर्वच अधिकार आपल्याकडे असल्याचा भ्रम त्यांना झाला असल्याचे अनेक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्याच पक्षातील झोन सभापतींच्या अधिकारावरही विषय समित्यांच्या सभापतींकडून अतिक्रमण केले जात असल्याची चर्चा आहे. विषय समित्यांच्या सभापती थेट झोनमध्ये बैठकी घेत असल्याने सभापतींमध्ये नाराजी आहे. ‘आम्हाला झोनच्या सभापतीपदी नियुक्त करून अधिकार दिले असताना विषय समिती सभापती ढवळाढवळ करीत आहे’, असे एका झोन सभापतीने सांगितले.
स्थायी समिती सभापतीप्रमाणे अधिकारांचा भ्रम
भाजपच्या आठ नगरसेविका झोन सभापती असून विषय समिती सभापती व झोन सभापती त्यांच्यातही संघर्षाची चिन्हे दिसून येत आहे. स्थायी समिती सभापतीप्रमाणे आपल्यालाही अधिकार असतात, या भ्रमात विषय समिती सभापती असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले. विशेष म्हणजे, त्यांच्या विभागाशी संबंधित कामाची फाईल त्यांच्याकडूनच जाईल, अशा सूचनाच या सभापतींनी दिल्या असल्याची पुस्तीही अधिकाऱ्याने जोडली. त्यामुळे अनेक कामाच्या फाईल्स रखडत आहे. एका समिती सभापतींच्या कक्षात तर फाईल्सचा ढिग जमा झाला असल्याचेही सूत्राने नमूद केले. याबाबत महापौर निता ठाकरे यांनी विषय समिती सभापतींची एक बैठक घेऊन त्यांना त्यांच्या कामाची जाणीव करून दिली. परंतु त्याचे अनुकूल परिणाम आतापर्यंत दिसून आले नाही. याबाबत एका भाजप नेत्याशी चर्चा केली असता त्यांनी ‘स्वत:च्या घरात कुटुंब कसे वागते, याबाबत बाहेर काय चर्चा करणार’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
