नागपूर : “विदेशोमे पांच घंटे बारिश होई तो पांच मिनटमे पानी गायब… नागपूरमे आधा घंटा बारिश हुई तो रस्तेही गायब…” ,,, नागपूरच्या पावसाबाबत समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या या चित्रफितीतील ओळी केवळ पावसावरचा विनोद नाहीत. त्या नागपूरच्या विकास मॉडेलवर नागरिकांनी नोंदविलेला उपरोधिक आक्षेप आहेत. पावसाने तुडुंब भरलेले रस्ते व त्यामुळे नागरिकांची होणारी दैना दर्शवणाऱ्या दुसऱ्या एका चित्रफितीत पार्श्वभूमीवर वाजणारे ” ‘भारत मां की शक्ती न्यारी,.. है अपणे नितीन गडकरी’ …. हे गीत योगायोगाने नसून ‘विकास पुरुषांच्या’ शहरातील वास्तवावर नागरिकांनी मारलेला राजकीय टोला मानला जात आहे.

‘विकास पुरुष’, ‘इन्फ्रास्ट्रक्चर मॅन’ अशी बिरुद लावणाऱ्या दिग्गज नेत्यांच्या या शहराची फक्त दोन तासाच्या पावसात काय दैना होते याची प्रचिती चित्रफीतून येत असल्याने विकासाच्या दाव्यांपेक्षा विकासाच्या फसलेल्या नियोजनावरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

मंगळवारी अवघ्या दोन तासांच्या पावसाने नागपूर पुन्हा एकदा जलमय झाले. रेल्वेस्थानक, रुग्णालये, पोलीस ठाणे, नागरी वस्त्या आणि विशेष म्हणजे प्रमुख रस्ते काही तास पाण्याखाली गेले. ज्या शहराचे प्रतिनिधित्व ‘विकास पुरुष’ म्हणून ओळख निर्माण करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे संसदेत करतात आणि “ इन्फ्रास्ट्रक्चर मॅन’ असे ज्यांना संबोधले जाते ते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

इतके दिग्गज नेते या शहरात असताना आणि सलग एका दशकापासून सत्तेत असतानाही या शहराची पावसाने दरवर्षी अशी दैना व्हावी यातून विकासाचे नियोजन चुकले हेच सिद्ध होते. त्याचेच प्रतिबिंब समाजमाध्यमांवर व्हायरल उपरोधिक चित्रफितींतून उमटले असून यामुळे शहरातील पाणी तुंबण्याचा प्रश्न थेट राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विरोधकांच्या टीकेपेक्षा समाजमाध्यमांवरील ही लोकप्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांसाठी अधिक अस्वस्थ करणाऱ्या ठरल्या आहेत.

वरील चित्रफीती या प्रातिनिधीक स्वरुपाच्या आहेत. गेल्या दशकभरात मेट्रो, उड्डाणपूल, सिमेंट रस्ते, स्मार्ट सिटी आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे नागपूरला ‘विकासाचे मॉडेल’ म्हणून सादर करण्यात आले. यातूनच गडकरींना ‘विकास पुरुष’ अशी ओळख मिळाली. याच अनुषंगाने एका चित्रफितीत पावसात पाणी तुंबलेल्या रस्त्यावर अडकलेले नागपूरकर दिसतात आणि त्याचबरोबर ‘अपणे नितीन गडकरी’ हे गाणंही वाजते.

दुसऱ्या चित्रफीतीत सत्ताधाऱ्यांकडून ‘नागपूर आंतराष्ट्रीय शहर करू’ या घोषणेला लक्ष्य करण्यात आले आहे. यात पाण्याचे तुंबलेल्या नागपूरच्या रस्त्याची तुलना विदेशात पाण्याचा निचऱ्याशी करण्यात आली आहे. अशा कित्येक चित्रफीतींनी सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घातला असून त्यात लोकांनी विशेषत: जेन-झी ने सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे.

नागपूर पूर्वीचे अन् आत्ताचे …

नागपूरला पूरच येत नव्हता का असे नव्हे तर या शहराला पुराची पार्श्वभूमी आहे. पण ती नागनदी, पिवळी नदी आणि मोठ्या नाल्यांना आलेल्या पुरांची आहे, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे आलेल्या पुराची नाही. २०१४ पूर्वीही अनेकदा शहरात अतिवृष्टी झाली, पण मोजके चौक वगळता रस्ते गुडघाभर पाण्यात बुडाल्याचे चित्र नव्हते, इंग्रजकालीन नाल्या, पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणांमुळे अडचणी येत नव्हत्या, नदीकाठच्या वस्त्यांचा अपवाद सोडला तर नागरी वस्त्या, सदनिकांचे तळघरात पाणी साचल्याच्या , त्यामुळे वाहने खराब होण्याच्या घटनाही तुरळक.

तत्कालीन महापालिका आयुक्त यांनी नागपूरकरांना प्रथमच सिमेंट रस्त्यांची ओळख करून दिली. त्यांनी शेकडो किलोमीटरचे सिमेंट रस्ते बांधले पण त्यालगतच्या घरात आत्ताही पाणी शिरत नाही, याचे कारण तसे नियोजन करून रस्ते बांधणी करण्यात आली. तेव्हाचे सत्ताधारी पावसाला दोष देत नव्हते, त्रुटी शोधून त्यावर उपाययोजना केली जात होती. आत्ता इतके नव्हे पण २०१४ पूर्वी नागपुरात अनेक उड्डाण पुल बांधले गेले, पण एकाचाही आराखडा चुकला नाही किंवा पावसाचे पाणी त्याावर अडत नाही. पण आता २०१४ नंतर दरवर्षी शहरातील प्रमुख चौक, नव्याने विकसित झालेले भाग, उड्डाणपुलांखालचे मार्ग आणि भुयारी रस्ते पाण्याखाली जाण्याचे प्रमाण वाढल्याने विकासाच्या आराखड्यावरच प्रश्न उपस्थित होत आहेत.

सिमेंट रस्ते, उड्डाणपूल आणि इतर प्रकल्पांची रचना करताना जलनिचऱ्याचा पुरेसा विचार झाला का, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.पण सत्ताधारी प्रत्येक वेळी अतिरिक्त पाऊस झाला म्हणून हे घडले असे सांगूून हात वर करतात. पण भरवस्तीतील एका शाळेत पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची गरज भासते यातूनच नेत्याचे विकासाचे नियोजन कसे फसले हे स्पष्ट होते.

सर्व दाव्यातील फोलपणा उघड महापालिकेत सलग तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आहे, शहर विकासाचा दावा प्रत्येक वेळी केला जातो, केंद्र,राज्य आणि महापालिकेत एकाच पक्षाची सत्ता असल्याने शहराचा विकास होईल असा दावा केला जातो, पण विकासाचा झगमगाट फक्त जाहिरातीत दिसतो, प्रत्यक्षात नागपूरकर किती नरकयातना भोगतो हे मंगळवारच्या पावसाने पुन्हा एकदा स्पष्ट केले.

महापालिकेच्या विविध विभागांनी पाणी तुंबण्यावर कायमस्वरूपी उपाय झाल्याचे दावे नुकतेच केले होते. नरेंद्रनगर भुयारी मार्ग, पडोळे चौक यांसारख्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र मंगळवारच्या पावसानंतर याच ठिकाणी वाहने पाण्यात अडकली, पंप लावून पाणी उपसावे लागले आणि विमानतळ मार्ग, व्यापारी भाग तसेच नव्याने विकसित झालेल्या वस्त्याही जलमय झाल्या. सर्वाधिक वर्दळीचा वर्धा मार्ग संपूर्ण पाण्याखाली होता, जागतिक दर्जाचे म्हणून प्रचार करणारे मेट्रोचे बर्डी, धरमपेठ, छत्रपती चौक गळत होते.

उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूनी (उताराच्या) खोलगट भागात काही फूट पाणी साचले होते. वर्धामार्गावरील संताजी महाविद्यालयालगतची खोलगट भागातील व्यापारपेठ पूर्णपणे पाण्यात बुडाली.. तेथे रस्त्यावरील पाण्याच निचराच होत नाही. दरवर्षी हा प्रकार घडतो, पण उपाययोजनेच्या पातळीवर प्रयत्न शुन्य आहेत. नव्याने वसलेल्या मनीषनगरची अवस्था अत्यंत बिकट आहे. घरातील फ्रीज पाण्यात तरंगावे इतके पाणी घरात शिरले यावरून या शहराची किती दैना झाली याची कल्पना यावी. त्यामुळे प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, नागपूरमध्ये प्रश्न पावसाचा नसून नियोजनाचा बनत चालला आहे. शहराच्या विस्ताराबरोबर जलनिचरा व्यवस्था सक्षम करण्याऐवजी दृश्यमान प्रकल्पांना अधिक प्राधान्य दिल्याची टीका सातत्याने होत आहे. त्यामुळे रस्ते, भुयारी मार्ग, व्यापारी संकुले, निवासी वस्त्या आणि सार्वजनिक इमारतींमध्ये वारंवार पाणी साचण्याच्या घटना आता अपवाद राहिलेल्या नाहीत.