नागपूर- पोलिसांवर शंका घेणे म्हणजे गृहखात्यावर शंका घेणे, याचाच दुसरा अर्थ हे खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अविश्वास दाखवणे असा होतो. याची पूर्ण कल्पना असतानाही नागपूर दंगल प्रकरणी भाजपचेच आमदार स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर शंका उपस्थित करीत आहेत, त्यामुळे भाजप नेतृत्वाचा आमदारांवरील धाक कमी झाला का ? असा सवाल केला जात आहे.

१७ मार्चला रात्री महाल भागातील काही वस्त्यांमध्ये उसळलेली दंगल आता निवळली असून जनजीवनही पूर्वपदावर आले आहे. मात्र या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांच्या भूमिकेवर आत्ताही प्रश्न उपस्थित करणे सुरूच आहेत. हे प्रश्न उपस्थित करणारे लोकप्रतिनिधी विरोधी पक्षाचे असेल तर तो त्यांचा अधिकार म्हणून समजण्यासारखे आहे, मात्र एका पाठोपाठ एक सत्तापक्ष म्हणजे भाजपचेच आमदार पोलिसांच्या कारवाईवर शंका घेऊ लागले आहेत, तेही खुद्द नागपूरकर देवेद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना. त्यामुळे भाजप आमदारांना झाले तरी काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ज्या महाल भागात दंगल उसळली त्या भागाचे म्हणजे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांंनी दंगलीच्या दुसऱ्याच दिवशी या घटनेला पोलीस जबाबदार आहेत, दंगेखोर गोंधळ घालत असताना त्यांनी बघ्याची भूमिका घेतली, असे जाहीरपणे माध्यमांशी बोलताना सांगितले. याच दिवशी सभागृहात निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांमुळेच दंगल आटोक्यात राहिली, असे प्रशस्तीपत्र विधानसभेत दिले होते. त्याच दिवशी घटनेचा आढावा घेण्यासाठी मुंबईहून नागपूरला आलेल्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही फडणवीस यांचीच री ओढली होती. त्यानंतर दटके यांनी दंगेखोरांनी बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस शिपायासोबत गैरवर्तनाचा मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दाही २३ तारखेला नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला. यामुळे दटके यांची कोंडी झाली. यावर दटके यांची अद्याप प्रतिक्रिया आली नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी नागपूर सोडल्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपचे आणखी एक आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपूर पोलिसांवर शंका घेणारे प्रसिद्धी पत्रक काढले. हे पत्रक तसे काँग्रेसवर टीका करणारे होते. पण त्यात उल्लेख नागपूर पोलिसांमधील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेणारा होता. विशेष म्हणजे दंगल मध्य नागपूरमध्ये झाली असताना त्यावर पूर्व नागपूरच्या आमदारांनी भाष्य करणे, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, हे अनाकलनीय वाटणारे आहे, त्यामुळेच याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

नागपूरमध्ये कायदा व सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यास हिंदुत्ववादी संघटनांनी केलेले आंदोलन कारणीभूत असताना त्यापासून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी भाजप आमदाराकडून पोलिसांना लक्ष्य केले जात आहे का ? असा सवाल आता केला जात आहे.

खोपडेंचा आक्षेप काय ?

खोपडे यांनी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले असून त्याच्या भूमिकेची चौकशी व्हावी अशी मागणी केली, ज्या दिवशी ही घटना घडली, त्यावेळेस काही अधिकारी घटनास्थली हजर होते.त्यांच्यापुढे हिंसाचार सुरू होता. पण त्यांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, असा आक्षेप खोपडे यांनी घेतला आहे.