विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. शिवसेनेचे (ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर महायुतीकडून विविध योजनांची घोषणा केली जाते व त्या योजना नंतर बंद केल्या जातात असा आरोप गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या योजना देखील बंद झाल्याचे ते म्हणाले. तसेच शिवसेना (ठाकरे) आमदार कैलास पाटील यांनी देखील पंतप्रधान मोदींच्या नावाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते थकल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू केलेल्या योजनांकडे फडणवीस सरकार दुर्लक्ष करत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. भास्कर जाधव व कैलास पाटील नेमकं काय म्हणाले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने कोणत्या योजना सुरू करण्यात आल्या होत्या? त्या योजना बंद पडल्या आहेत का? ते जाणून घेऊयात.

भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले ?

महायुती सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू केलेल्या काही योजना बंद केल्याचा आरोप शिवसेनेचे (ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी केला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तुम्ही स्थगिती सरकार म्हणत होते. पण, त्या सरकारमध्ये तुम्ही पण होते. लोकांची मतं पदरात पाडून घेण्यासाठी तुम्ही सगळं केलं, पण निवडणूक संपल्यानंतर तुम्ही काय केलं? कुठे गेला आनंदाचा शिधा? त्यानंतर दिवाळी, दसरा, गणपती उत्सव हे सण आले नाहीत का? स्वच्छता मॉनिटर कुठे गेले? लाडक्या भावांना दिला जाणार अप्रेंटिसशीपचा कोर्स का बंद झाला? मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना का बंद झाली? एक रूपयात पीक विमा योजना का बंद झाली? एक राज्य एक गणवेश योजना कुठे अडकली? योजनादूत तुम्ही तयार केले, ती योजना कुठे गेली?” भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या योजनांचाही उल्लेख केला.

मोदींच्या नावाने सुरू केलेल्या योजना फडणवीस सरकारने बंद केल्याचा आरोप

भास्कर जाधव पुढे म्हणाले, “नमो कामगार कल्याण योजना तुम्ही बंद करून टाकली. नमो नमो करून तुम्ही मोदींच्या नावाचा उपयोग मतं मिळवण्यासाठी केला. नमो शेततळे योजना, नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना, नमो ग्रामसचिवालये योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना, नमो दिव्यांग शक्ती योजना, नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना या सगळ्या योजना कुठे गेल्या? निवडणुकीसाठी तुम्ही लोकांच्या समोर हे फंडे आणले. लोकांच्या भावनांना तुम्ही हात घातला.” असा आरोप जाधव यांनी केला. मोदींच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या योजना बंद केल्याचा आरोप जाधव यांनी फडणवीस सरकारवर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त ११ सूत्री कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ सूत्री कार्यक्रम हाती घेतला होता. त्या अंतर्गत १) नमो महिला सशक्तीकरण अभियान, २) नमो कामगार कल्याण अभियान, ३) नमो शेततळे अभियान, ४) नमो आत्मनिर्भर आणि सोलार ऊर्जा गाव अभियान, ५) नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान, ६) नमो ग्राम सचिवालये अभियान, ७) नमो स्मार्ट आदिवासी शाळा अभियान, ८) नमो दिव्यांग शक्ती अभियान, ९) नमो क्रीडा मैदान आणि गार्डन अभियान, १०) नमो शहर सौंदर्यीकरण प्रकल्प व ११) नमो तीर्थस्थळ आणि गडकिल्ले संरक्षण अभियान यांची घोषणा करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या ११ सुत्री कार्यक्रमापैकी काही अभियानांचे काय झाले? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.

“नमो शेतकरी योजनेचे हप्ते कुठे अडकले?”

शिवसेनेचे (ठाकरे) धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते अडकल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. ते म्हणाले, “राज्य सरकारने मोठ्या गाजावाजात जाहीर केलेली नमो शेतकरी महासन्मान योजना आज प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणांची योजना ठरली आहे का, असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या सन्मानाच्या नावाने योजना जाहीर करायची आणि प्रत्यक्षात हप्तेच वेळेवर द्यायचे नाहीत, ही सरकारची भूमिका शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करणारी ठरत आहे.”

नमो शेतकरी योजनेच्या “दोन हप्त्यांचा अद्याप पत्ता नाही”

आमदार कैलास पाटील म्हणाले, “पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात या योजनेचे हप्ते वेळेवर मिळत नसल्याने राज्यभरातील लाखो शेतकरी संभ्रमात आणि आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या योजनेचा शेवटचा हप्ता ९ सप्टेंबर २०२५ रोजी देण्यात आला होता. तोही एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीचा होता. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२५ आणि डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या दोन हप्त्यांचा अद्याप पत्ता नाही. सरकारने जाहीर केलेली योजना असूनही हप्ते थांबले असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार, याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.”

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे?

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणारे महाराष्ट्रातील शेतकरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रूपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर चार महिन्याला दोन हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता देण्याची तयारी सुरू केली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रूपये जमा केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.