नाना पाटेकर यांनी प्रत्यक्षात कधीही निवडणूक लढवली नाही; पण त्यांच्या सार्वजनिक आयुष्यात नेहमीच राजकारणाचा प्रभाव जाणवत होता. विविध राजकीय पक्षांतील नेत्यांशी नानांचे जवळचे संबंध होते. अनेकांनी त्यांना निवडणूक लढवण्याची ऑफरही दिली होती. तरीही कोणत्याही पक्षात प्रवेश न करता त्यांनी सक्रिय राजकारणापासून दुरावा ठेवला होता. ऑक्टोबर २०२२ मध्ये नानांनी राजकारणाबाबत सर्वात परखड टिप्पणी केली होती. एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीतून त्यांनी दोन्ही नेत्यांना राजकारणातील उलथापालथीबाबत परखड प्रश्न विचारले होते.

नाना पाटेकरांनी शिंदे-फडणवीसांना कोणते प्रश्न विचारले होते?

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात बंड करण्यासाठी अडीच वर्षे का लागली? असा सवाल नाना पाटेकर यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला होता. तसेच निवडणुका संपल्यानंतर मतदारांना काही किंमत उरते का? असा प्रश्नही त्यांनी या दोन्ही नेत्यांसमोर उपस्थित केला होता. सामान्य नागरिकांप्रमाणे राजकारण्यांना त्यांच्या चुकांसाठी जबाबदार का धरले जात नाही, यावरही नानांनी बोट ठेवले होते. निवडून आलेल्या काही लोकप्रतिनिधींच्या संपत्तीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी नानांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दाखला दिला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाच्या वेळी त्यांच्या बँक खात्यात केवळ २५ हजार रुपये होते. आज एखादा नगरसेवक निवडून आल्यानंतर कोट्यवधी रुपये कमावतो. मग भ्रष्ट राजकारण्यांवर कारवाई का होत नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. तसेच तुम्ही राजकारणी पुन्हा एकत्र याल; पण तुमच्यामुळे ज्या कुटुंबांमध्ये फूट पडते, त्या कुटुंबांचे काय? असा सवालही त्यांनी केला होता.

बाळासाहेब ठाकरे यांच्याशी नाना पाटेकरांचे सलोख्याचे संबंध

काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांनी राजकारणाचा खालावत चाललेला स्तर आणि राजकीय नेत्यांकडून वापरल्या जाणाऱ्या अपमानास्पद भाषेवरही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यांचे राजकीय नेत्यांशी अनेक दशकांपासून मैत्रिपूर्ण संबंध होते. एकसंध शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना ते वडिलांसमान मान होते. २०१३ मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करावे, असा सल्लाही दिला होता. एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्याशीही नाना यांचे सलोख्याचे संबंध होते. काहीवेळा त्यांनी शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून राजकीय नेत्यांशी असलेली त्यांची जवळीक ही केवळ राजकीय निष्ठेवर आधारलेली नव्हती हे स्पष्ट होते.

२०१४ मध्ये भाजपाने नानांना दिली होती निवडणूक लढवण्याची ऑफर

२०१४ मध्ये भाजपाने नाना पाटेकर यांना मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती; पण त्यांनी राजकारणापासून दुरावा कायम ठेवत पक्षाची ऑफर नाकारली. त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी भाजपाला चित्रपटसृष्टीतील एखाद्या लोकप्रिय व्यक्तीच्या शोधात होती. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही आपल्याला अनेक राजकीय पक्षांनी ऑफर दिल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले होते. तसेच खासदारकीसाठी आपले नाव चर्चेत असल्याचे समजल्यानंतर शरद पवार यांनीही आपल्याला फोन केला होता, असे त्यांनी सांगितले होते. नाना पाटेकर हे पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी त्यावेळी चर्चा होती. मात्र, त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला नाही. मार्च २०२४ मध्ये नाशिक येथे शेतकऱ्यांना संबोधित करताना नाना पाटेकर यांनी राजकारणात प्रवेश न करण्यामागचे कारणही स्पष्ट केले होते. मी राजकारणात प्रवेश करू शकत नाही, कारण मी स्पष्टवक्ता आहे, असे ते म्हणाले होते. राजकारणी काही चुकीचे करत असतील तर त्यांच्या तोंडावर रोखठोक बोलणारा मी माणूस आहे, असे सांगत त्यांनी सक्रिय राजकारणापासून स्वतःला कायम दूर ठेवले.

राजकीय नेत्यांशी जवळीक असूनही राजकारणापासून अलिप्त असलेले नाना

नाना पाटेकर यांची राजकीय नेत्यांशी असलेली मैत्री अनेकदा पक्षीय सीमारेषा ओलांडणारी होती. २०२० मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आपले हिरो आणि भारतीय राजकारणातील चाणक्य असे संबोधले होते. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हेदेखील आपले मित्र असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. त्याशिवाय शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नाम फाउंडेशनला मदत केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले होते. अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत नाना पाटेकर यांनी या संस्थेची स्थापना केली होती. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही संस्था काम करते. राजकारणाबाहेरील त्यांच्या सार्वजनिक आयुष्यातही हीच पक्षीय समतोलाची भूमिका दिसून आली. विविध राजकीय पक्षांतील नेते त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक कार्यक्रमांना उपस्थित राहत होते. मात्र, एखाद्या राजकारण्याशी असलेली मैत्री म्हणजे त्याच्या पक्षाला आपला पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ होत नाही, असे नाना पाटेकर कायम सांगत.

नानांकडून मोदी सरकारचे कौतुक, पण राजकीय पक्षांवरही टीका

डिसेंबर २०२३ मध्ये नाना पाटेकर यांनी नरेंद्र मोदी सरकारचे कौतुक करत सध्या त्यांना पर्याय नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर काही महिन्यांनी नाशिकमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय पक्षांवर टीका केली होती. तसेच मतदारांनी आपल्याला कोणते सरकार हवे, याचा निर्णय स्वतः घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते. नाना पाटेकर यांच्या राजकीय भूमिका कोणत्याही एका राजकीय गटात सहज बसणाऱ्या नव्हत्या. ते एका बाजूला मोदी सरकारचे कौतुक करत, तर दुसरीकडे शेतकरी, भ्रष्टाचार आणि राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीवरून राजकारण्यांना जाहीरपणे प्रश्न विचारत. नाना पाटेकर यांच्यासाठी राजकारण हे अनेकदा सामान्य नागरिकांच्या प्रश्नांपासून वेगळे नव्हते. २०१५ मध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करताना त्यांनी शरद पवार, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर एकत्र काम करण्याचे आवाहन केले होते. दुष्काळासारख्या गंभीर समस्येचा सामना एकट्या राजकीय पक्षाला करता येणार नाही, असे त्यांचे मत होते. २०२५ मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी तरुणांनी स्वतःला जातीच्या आधारावर विभागले जाऊ देऊ नये आणि आपल्या मतदानाचा वापर बदल घडवून आणण्यासाठी करावा, असे आवाहन केले होते.

नाना पाटेकरांचे राजकीय विश्वातील वैशिष्ट्यपूर्ण स्थान

मुंबईच्या सामाजिक रचनेवर राजकारणाचा होत असलेला परिणाम यावरही नाना पाटेकर यांनी भाष्य केले होते. २०२३ मधील एका मुलाखतीत त्यांनी राजकारणामुळे मुंबईत फूट पडली असून, राजकारण्यांना या विभाजनाचा फायदा होत आहे. त्याचवेळी सामान्य नागरिक मात्र धर्म आणि जातीच्या मुद्द्यांवरून एकमेकांशी वाद घालत असल्याचे नाना यांनी म्हटले होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बसून त्यांनी एकसंध शिवसेनेतील फुटीबाबत थेट प्रश्न विचारले. त्याचवेळी शरद पवार यांचे राजकीय रणनीतीकार म्हणून कौतुक केले. ठाकरे कुटुंबीयांशी वैयक्तिक संबंध कायम ठेवले. नाना पाटेकर यांनी स्वेच्छेने राजकारणाबाहेरील व्यक्ती म्हणून राहणे पसंत केले. त्याचबरोबर राजकारण्यांशीही ते ज्या स्पष्टपणे आणि परखडपणे बोलत होते, त्याच पद्धतीने राजकारणावरही आपले मत मांडत राहिले.