सौरभ कुलश्रेष्ठ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्या ना कोणत्या विषयावरून महाविकास आघाडीला व त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा अहेर देणाऱ्या नाना पटोले यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून आता शिवसेनेची कळ काढली आहे. संभाजीराजे यांना कायम पाठिंबा राहील असे विधान करत काँग्रेसचा जुना मतदार असलेल्या मराठा समाजाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीने आपल्याला अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेवर पाठवावे असे आवाहन केले होते. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. मात्र शिवसेनेचे उमेदवार म्हणून राज्यसभेवर संधी देऊ. पण अपक्ष म्हणून पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. संभाजीराजे यांनी शिवसेना प्रवेशाची अट नाकारल्याने त्यांची राज्यसभेची संधी हुकली. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नाराजीचा सूर लावला.

संभाजीराजे यांच्या उमेदवारीच्या निर्णयात महाविकास आघाडी म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चर्चा झाली. पण काँग्रेसला त्यात घेतले नव्हते. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी संभाजीराज यांच्या नाराजीचा सूर पकडत हे खरेच दुर्दैवी आहे असे विधान केले.

“इतर पक्षांचे माहीत नाही. परंतु संभाजीराजे राज्यसभेत जावेत अशी काँग्रेसची मनापासून इच्छा होती. महाराष्ट्राच्या नेतृत्वाची एक वेगळी शान त्यांच्या नेतृत्वामुळे होती. ते खासदार झाले नाहीत हे खरेच दुर्दैवी. परंतु काँग्रेसचा त्यांना नेहमीच पाठिंबा राहील,” असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यातून त्यांनी शिवसेनेची कळ काढली आहे.‌ तसेच संभाजी राजे यांच्या सोबत मराठा समाजातील एक गट असल्याचे आणि मराठा समाज हा काँग्रेसचा जुना मतदार असल्याचे समीकरण मांडत एक प्रकारे मराठा कार्ड खेळले आहे.

पुढच्या काही महिन्यात राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यात या मराठा कार्डचा उपयोग होईल. निदान पश्चिम महाराष्ट्रात संभाजी राजांचा गट काँग्रेसच्या विरोधात असणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने नाना पटोले यांनी घेतला आहे.‌

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole congress political game on sambhaji raje chhatrapati rajyasabha election pmw
First published on: 27-05-2022 at 19:20 IST