scorecardresearch

नांदेड : सेनेच्या जिल्हाप्रमुखपदावर दावा करणारे बारडकर काँग्रेसमध्ये! अशोक चव्हाणांचा मित्रपक्षाला धक्का!

काँग्रेस नेते व मंत्री अशोक चव्हाण यांची मुंबईत भेट-चर्चा झाल्यानंतर बारडकरांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाची घोषणा झाली.

ashok chavan nanded politics shivsena
नांदेडमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये घडतंय वेगळंच राजकारण! (संग्रहीत छायाचित्र)

काही वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर या पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदावर दावा सांगणारे बाळासाहेब देशमुख बारडकर यांना या पक्षाने पदासाठी झुलवत ठेवल्यामुळे त्यांनी शुक्रवारी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेस पक्षात घरवापसी केली. काँग्रेस नेते व मंत्री अशोक चव्हाण यांची मुंबईत भेट-चर्चा झाल्यानंतर बारडकरांच्या पक्षप्रवेशाची घोषणा झाली. नांदेड जिल्ह्यात शिवसेनेमध्ये आलेली मरगळ दूर करण्यात संपर्क प्रमुखांसह स्थानिक नेत्यांना आलेले अपयश माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनलेले असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसने राज्याच्या सत्तेतील आपल्या या मित्रपक्षाला पहिला धक्का दिला.

सुमारे पाच वर्षांपूर्वी मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे तत्कालीन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपलाच पक्ष फोडून तत्कालीन जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुखांसह अनेक शिवसैनिकांना भाजपमध्ये दाखल केले आणि आता जिल्हाप्रमुखपदाचे दावेदार असलेले बारडकर काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस पक्षात जाऊ शकणाऱ्यांची नावे चर्चेत येत आहेत. पक्षाच्या माध्यमातून खासदार-आमदार झालेल्यांचे पक्षसंघटनेला भक्कम करण्याकडे लक्षच नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे निष्ठावान सैनिकांचे म्हणणे आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना सर्वोच्च स्थानावर आहे; पण नांदेड जिल्ह्यात काँग्रेसच्या व्यापक वर्चस्वापुढे शिवसेनेची स्थिती कुपोषितासारखी झाल्याचे निदान होत असतानाच, मंत्री चव्हाण यांनी विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीतच बारडकरांना शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणल्यामुळे खासदार हेमंत पाटील यांना मोठा धक्का बसला.

सोलापुरात भाजपच्या आक्रमकतेपुढे विरोधक थंडच

बारडकर हे मूळचे काँग्रेसचेच; पण सुमारे पाच वर्षांपूर्वी पक्षाने तालुकाध्यक्षपदाच्या निवडीत अन्याय केल्यानंतर त्यांनी चव्हाण आणि काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. बारड परिसरात त्यांचा चांगला प्रभाव आहे. तेथील ग्रामपंचायत त्यांच्या गटाच्या ताब्यात असून त्यांचे उपद्रवमूल्य लक्षात घेऊन चव्हाण यांनी त्यांना पुन्हा पक्षात आणल्यामुळे भोकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला जबर तडाखा बसला आहे.

नांदेड जिल्ह्यात पुढील चार-पाच महिन्यांत १० नगर परिषदांसह जिल्हा परिषद – पंचायत समित्या आणि नंतर नांदेड-वाघाळा शहर मनपाची निवडणूक होणार आहे. नगर परिषदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया काँग्रेसने सुरू केली. हा पक्ष अशी जुळवाजुळव करत असताना, शिवसेना आणि पक्षाचे संघटन मात्र भरकटलेले आहे. बारडकरांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्याच वाटेवर असलेली काही नावेही चर्चेत आली आहेत.

स्वागत अशोक चव्हाणांचेच!

बाळासाहेब देशमुख बारडकर यांनी शुक्रवारी सायंकाळनंतर मुंबईत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी पक्षाने त्यांचे स्वागत करण्याऐवजी बारडकरांनीच मंत्री अशोक चव्हाण यांना शाल अर्पण करून पुष्पगुच्छ दिला. याच प्रसंगाचे छायाचित्र प्रसारमाध्यमांकडे पाठविण्यात आले. या पक्ष प्रवेशप्रसंगी आमदार अमरनाथ राजूरकर, भाऊराव चव्हाण कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, जि.प.चे माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, बारडचे सरपंच प्रभाकरराव आठवले यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते हजर होते. बारडकरांचे ज्यांच्याशी राजकीय वैर आहे ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांना दूर ठेवून हा पक्षप्रवेश सोहळा पार पाडण्यात आला.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-06-2022 at 12:11 IST
ताज्या बातम्या