Nandigram By-Election Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमधील नंदीग्रामची विधानसभा पोटनिवडणूक आता अत्यंत चुरशीची बनली आहे. या जागेला राज्याच्या राजकारणात मोठे महत्त्व आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ही जागा सोडल्यानंतर येथे पोटनिवडणूक होत आहे. त्यात सुवेंदू अधिकारींनी त्यांचे जवळचे सहकारी चंद्रनाथ रथ यांच्या आई हसीराणी रथ यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत बनली आहे.
याच काळात काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना २००७ च्या नंदीग्राम जमीन आंदोलनाशी संबंधित सहा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अटक झाली, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले. मात्र, कोलकाता उच्च न्यायालयाने प्रधान यांना अंतरिम जामीन दिला असून, त्यानंतर त्यांनी पुन्हा प्रचार सुरू केला आहे.
नंदीग्राममध्ये भाजपाची स्थिती मजबूत असल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात. दुसरीकडे मात्र मिलन प्रधान यांना जुन्या प्रकरणात अटक झाल्याने भाजपाने सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच तृणमूलच्या उमेदवाराने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी प्रधान यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेस आणि तृणमूलमधील बदलत्या राजकीय समीकरणांची मोठी परीक्षा असणार आहे.
१२ दिवस हल्दिया कारागृहात राहिल्यानंतर बुधवारी बाहेर आलेल्या प्रधान यांनी थेट सुवेंदू अधिकारी यांच्यावर निशाणा साधला. “सुवेंदू अधिकारी इतके घाबरले का आहेत? नंदीग्राममुळे आपण नेते झालो, असे ते नेहमी सांगतात. मग त्यांनी बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी का दिली?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रधान यांनी याच मुद्द्यावरून २००७ च्या नंदीग्राम जमीन आंदोलनाचा संदर्भ दिला. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आपणही सहभागी होतो आणि त्याच आंदोलनामुळे सुवेंदू अधिकारी यांना राजकीय उभारी मिळाली, असा दावा त्यांनी केला. “ज्या घटनांमध्ये अधिकारी यांचीही भूमिका होती, त्याच प्रकरणांमध्ये मला आता अटक करण्यात आली, मग यामुळे ते घाबरले आहेत का?” असा सवाल त्यांनी केला.
५८ वर्षीय प्रधान यांच्या प्रचारासाठी आता काँग्रेसचे प्रमुख नेते मैदानात उतरले आहेत. मतदानाला अवघे चार दिवस राहिल्याने त्यांच्या प्रचाराला गती मिळणार आहे. दुसरीकडे, संपूर्ण मतदारसंघात भाजपाची प्रचार यंत्रणा सक्रिय झाली असून सुवेंदू अधिकारी आणि भाजपाच्या उमेदवार हसीराणी रथ यांचे पोस्टर्स सर्वत्र दिसत आहेत.
दुसरीकडे प्रधान यांचे पोस्टर्स मात्र तुलनेने कमी असून ते प्रामुख्याने सोनाचुरा परिसरातच दिसून येत आहेत. याच परिसरात प्रधान यांचे वडिलोपार्जित घर आहे. विशेष म्हणजे या भागात ममता बॅनर्जी यांचे एकही पोस्टर दिसत नसल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
काँग्रेस-तृणमूल समोरची आव्हानं
नंदीग्राममध्ये भाजपाच्या तुलनेत काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमी असल्याचे चित्र दिसत असले, तरी तृणमूल काँग्रेससमोरही स्थानिक पातळीवर अडचणी आहेत. ममता बॅनर्जी यांच्या स्थानिक पातळीवरील प्रमुख नेते अबू ताहेर आणि शेख सुफियान सध्या सक्रिय नाहीत. ताहेर हे तृणमूलचा फूटीर गट डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेससोबत आहेत, तर सुफियान सध्या फरार असल्याचे वृत्त आहे. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलचे उमेदवार राहिलेले पबित्र कार हेही आता प्रचारात सक्रिय दिसत नाहीत. त्यांचा सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभव झाला होता.
काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मते, “ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे सांगितले आहे; पण त्यांचे कार्यकर्ते प्रत्यक्ष मैदानात दिसत नाहीत.” मतदानाच्या दिवशी परिस्थिती बदलेल, ममता बॅनर्जी यांच्या पारंपरिक मतदारांचा पाठिंबा आपल्याला मिळेल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. मात्र, भाजपाच्या दबावामुळे हे मतदार सध्या घराबाहेर पडत नसल्याचा दावा काँग्रेसच्या या नेत्याने केला आहे.
प्रधान यांच्या सुटकेनंतर नंदीग्राममध्ये काँग्रेसचा जोरदार प्रचार सुरू आहे. बुधवारी कारागृहातून बाहेर येताच पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष सुवंकर सरकार, सरचिटणीस सुभाषीष भट्टाचार्य यांच्यासह पक्षाचे अनेक नेते त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. त्यानंतर प्रधान आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घरी निघाले, त्यावेळी समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
समर्थकांचा हा प्रतिसाद पाहून प्रधान भावूक झाले. “लोकांमध्ये भाजपाविरोधात किती नाराजी आहे, हे या पाठिंब्यातून दिसते. निवडणूक मुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने झाली तर भाजपा ही जागा टिकवू शकणार नाही. आम्ही काँग्रेसची लाट निर्माण करू,” असेही त्यांनी नमूद केले.
हसीराणींच्या प्रचारात अधिकारींचा प्रभाव
मात्र, प्रधान यांच्या अनुपस्थितीमुळे भाजपाच्या उमेदवार हसीराणी रथ यांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला. त्यांनी नंदीग्राममधील विविध भागांना भेटी देत प्रचार सुरू ठेवला आहे. रोड शोसोबतच मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेण्यावरही त्यांनी भर दिला आहे. दरम्यान, हसीराणी रथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सुवेंदू अधिकारीही त्यांच्यासोबत होते. त्यानंतर अधिकारींनी विविध समाजांतील मतदारांना हसीराणी यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले. ही पोटनिवडणूक अल्पसंख्याक मतदारांसाठी एक “परीक्षा” असल्याचेदेखील त्यांनी नमूद केले. राज्य सरकारसोबत राहायचे की नाही, हे अल्पसंख्याकांना ठरवावे लागणार आहे असे ते म्हणाले,
हसीराणी यांनी प्रचारात वारंवार मुख्यमंत्री अधिकारी यांचा उल्लेख केला आहे. अमरतला येथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या मतदारांशी संवाद साधताना म्हणाल्या की, “ही अधिकारींची भूमी आहे, इथे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम लोकांनी पाहिलं आहे.” याच विश्वासाच्या जोरावर आपण किमान एक लाख मतांच्या फरकाने विजयी होऊ, असा दावाही त्या करतात.
विरोधकांकडून होत असलेल्या दडपशाहीच्या आरोपांवर हसीराणी म्हणतात की, प्रत्येकाला प्रचार करण्याचा अधिकार आहे. भाजपाचा प्रधान यांच्या अटकेशी कोणताही संबंध नसल्याचेही त्या नमूद करतात. त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी जमलेली महिलांची मोठी गर्दी पाहून हसीराणी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्या म्हणतात, “मी निवडणूक जिंकू शकते, आमदारही होऊ शकते; पण माझ्या मुलाचा मृत्यू मी कधीच विसरणार नाही. आईने काय गमावलं आहे, हे फक्त आईच समजू शकते. माझ्या आयुष्यात निर्माण झालेली ही पोकळी कधीच भरून निघणार नाही.”
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या पोटनिवडणुकीत हा मुद्दा फारसा चर्चेत नाही.
दरम्यान, विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच एसआयआरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पश्चिम बंगालमध्ये यामुळे वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. पण, बंगालमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसआयआरवरील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली आहे. मात्र, स्थानिक मतदारांच्या लेखी हा निवडणुकीचा प्रमुख मुद्दा नसल्याचे दिसून येते, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
हसीराणी यांना भेटण्यासाठी थांबलेली स्थानिक महिला मुन्शी मंडोल यांना यंदा भाजपाचा मोठ्या फरकाने विजय होईल, असा विश्वास आहे. “नंदीग्राम हा सुवेंदूंचा गड आहे, इथे विरोधकांचा मागमूसही नाही, कुठल्याही कोपऱ्यात गेलं तरी फक्त भाजपाचे झेंडे दिसतात,” असे त्या म्हणाल्या.
नंदीग्राममधील मतांचे गणित
२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत अधिकारी यांना ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली. टीएमसीला ४७ टक्क्यांहून अधिक मतं मिळाली, तर डाव्यांना १.१९ टक्के आणि काँग्रेसला केवळ ०.३२ टक्के मते मिळाली. मात्र, भाजपाच्या सर्व समर्थकांमध्ये मंडोल यांच्यासारखा आत्मविश्वास दिसत नाही. यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे प्रधान यांना झालेली अटक.
भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, विधानसभा निवडणुकीतील अधिकारींचा विजय आणि ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची पोटनिवडणुकीतील माघार या मुद्द्यांमुळे भाजपासाठी ही निवडणूक सुकर होऊ शकली असती. मात्र, प्रधान यांच्या अटकेनंतर समीकरण बदलल्याची पक्षाला भीती आहे. प्रधान हे २००७ च्या जमीन आंदोलनात सक्रिय होते तरी तेव्हा ते प्रमुख नेते नव्हते, असे या ज्येष्ठ नेत्याने नमूद केले. दरम्यान, लोकशाही तृणमूल पक्षाचे (ऋतब्रत बॅनर्जी गट) उमेदवार एहतेशमुल हक प्रचारात फारसे सक्रिय दिसत नाहीत.
लोकशाही तृणमूलसोबत असलेले माजी राज्यमंत्री मदन मित्रा पराभवाच्या चर्चेला फारसं महत्त्व देत नाहीत. नंदीग्राममध्ये आपला मोठा जनाधार असून त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळेल, असा त्यांचा दावा आहे. या निवडणुकीत डाव्या आघाडीचे उमेदवार, सीपीआयचे शांतिगोपाळ गिरीही रिंगणात आहेत. २००७ च्या जमीन आंदोलनानंतर नंदीग्राममध्ये जवळपास अस्तित्व गमावलेल्या डाव्यांनी सोनाचुरा आणि भांगाबेरा परिसरातील काही भागांत पुन्हा जोर लावला आहे.
सीपीआय(एम)चे पूर्व मिदनापूर जिल्हा सचिवालय सदस्य हिमांशू दास यांच्या मते, बंगालमधील राजकीय हिंसाचाराचा सर्वाधिक फटका डाव्यांना बसला आहे. मिलन प्रधान यांच्या अटकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली असून, त्याचा लोकशाहीवर परिणाम होतो, असा दावा दास यांनी केला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराला मारहाण केली आणि पक्ष कार्यालयांची तोडफोड केली, असा आरोपही त्यांनी केला. १५ वर्षे टीएमसीच्या राजकीय दबावाचा सामना केल्याने अशा परिस्थितीची सवय असल्याचे ते म्हणाले. नंदीग्राममध्ये टीएमसीने सीपीआय(एम)-सीपीआयला संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र आता टीएमसीच कमकुवत झाली असून भाजपाविरोधात डावे पक्षच लढत असल्याचा दावादेखील दास यांनी केला.
