नारायण राणे व सुनील तटकरे या कोकणातील दोन नेत्यांमध्ये बरेच साम्य आहे. दोघेही लोकसभेचे खासदार आहेत. राणेंचा एक मुलगा मंत्री तर दुसरा आमदार. तटकरेंचेही तसेच. स्वतः खासदार, मुलगी मंत्री तर मुलगा आमदार. छगन भुजबळांची हीच व्यथा आहे. पुतण्या समीरचा मंत्रिमंडळातील समावेश रोखला गेल्याने आमच्या मुलाबाळांना वेगळा न्याय का, असा सवाल भुजबळांनी पक्षाला केला आहे.
राज्याच्या राजकारणात घराणेशाही नवीन नाही. अनेक नेतेमंडळींनी आपली पत्नी, मुले, मुली, पुतणे, सुनांना पुढे आणले. घराणेशाहीच्या वादातून ठाकरे आणि पवार कुटुंबियात फूट पडली व दोघांचे पक्ष फुटले. पूर्वी घरातील एकाला राजकारणात पुढे आणले जात असे. आता तसे राहिलेले नाही. मुले, मुली, सुना, जावई साऱ्यांनाच पदे वाटली जातात. राजकीय नेत्यांच्या कुटुबियांतील सदस्यांची महत्त्वाकांक्षा वाढल्यानेच राजकीय घरांमध्ये वाद होऊ लागले. मुलायमसिंह यादव, देवीलाल, लालूप्रसाद यादव, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, करुणानिधी, प्रकाशसिंग बांदल, देवेगौडा असे अनेक नेते त्याला अपवाद ठरले नाहीत. प्रत्येकालाच मंत्रिपद, खासदार, आमदारकी हवी असते. त्यातून घरांमध्ये वाद झाले.
राज्यात वसंतदादा पाटील यांच्या घराण्यात पदांवरून वाद झाला. दुसरे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर – पाटील यांना त्यांची सून व नातवाने आव्हान दिले. नातवाने आजोबांचा पराभव केला. एकनाथ गायकवाड यांनी मुलगी वर्षा यांना राजकारणात पुढे आणले. वर्षा गायकवाड यांची लोकसभेवर निवड झाल्यावर धारावी मतदारसंघात त्यांनी सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली नाही. तर राजकारणापासून दूर असलेल्या आपल्या बहिणीला आमदारकी मिळवून दिली. . सत्ता पदांवरून अनेक घराण्यांमध्ये वाद झाले. ही यादी भली मोठी आहे.
भुजबळांची नाराजी
आपल्या मुलाबाळांना वेगळा न्याय का, असा सवाल अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारीकरिता छगन भुजबळ इच्छूक होते. पण आपण दिल्लीला जात असल्याने मंत्रिमंडळातील आपल्या रिक्त जागी पुतणे समीर यांची नियुक्ती करावी ही भुजबळांची अट होती. पक्षाने ही अट फारशी गांभीर्याने घेतली नव्हती. भुजबळांनी समीरच्या नियुक्तीचा मुद्दा लावून धरल्यावर मग राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून कळवितो, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दिल्लीतून नकार आली की मुंबईतच नकारात्मक भूमिका घेण्यात आली याविषयी नक्की माहित नाही. पण भाजपने लगेचच समीर भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास नकार दिला. मग भुजबळांनी राज्यसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला. आपल्याला नाही तर समीर भुजबळांना राज्यसभेवर संधी मिळते का याचाही खडा टाकून बघितला.
नारायण राणे स्वत: भाजपचे खासदार, नितीश राणे हे भाजपचे मंत्री तर दुसरे पुत्र निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार. राणे व तटकरे यांनी दोन्ही मुलांना राजकारणात पदे मिळवून दिली. भुजबळ स्वत: मंत्रिपदी, पुत्र पंकज हे विधान परिषदेचे आमदार आहेत. पुतणे समीर यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची योजना होती. पण राणे वा तटकरेंना जे जमले ते भुजबळांना काही जमले नाही.
