Narendra Modi BJP has maximum 156 seats Congress opposition party leader opinions Gujarat Assembly Elections ysh 95 | Loksatta

X

Gujarat Assembly Elections : मोदी महिमा कायम

गुजरात विधानसभा निवडणूक सलग सातव्यांदा जिंकून भाजपने गुरुवारी ऐतिहासिक विजय नोंदवला.

Gujarat Assembly Elections : मोदी महिमा कायम
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

भाजपला सर्वाधिक १५६ जागा; काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदाची हुलकावणी, फक्त १७ जागी यश, ‘आप’ची पाच जागांवर सरशी, १३ टक्के मतांसह आश्वासक सुरुवात

पीटीआय, अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणूक सलग सातव्यांदा जिंकून भाजपने गुरुवारी ऐतिहासिक विजय नोंदवला. १८२ सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपने १५६ जागा जिंकत नवा विक्रम नोंदवला आहे. तर गेल्या निवडणुकीत ७७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी केवळ १७ जागा मिळाल्या आहेत. तर यंदा जोरदार प्रचाराने वातावरण निर्मिती केलेल्या आम आदमी पक्षाने पाच जागा जिंकत काँग्रेसच्या मतपेढीला खिंडार पाडले आहे. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे भाजपने गुजरातमध्ये आजपर्यंतचे सर्वात मोठे यश मिळवल्याचे मानले जाते. भाजपच्या या झंझावातात काँग्रेसने जेमतेम आपले अस्तित्व राखले, तर ‘आप’ने गुजरातमधील मतांच्या आधारे राष्ट्रीय पक्ष अशी ओळख मिळवली. भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी सुमारे ५२.५० एवढी आहे. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ९९ जागा जिंकल्या होत्या आणि त्याला मिळालेल्या मतांची टक्केवारी ४९.१ एवढी होती. काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी २७.२९ एवढी आहे, गेल्या वेळी काँग्रेसला ४० टक्क्यांवर मते होती. तर पदार्पण करणाऱ्या ‘आप’ने १२.९१ टक्के मते मिळवली आहेत.

जिन्गेश मेवानी विजयी

गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जिग्नेश मेवानी यांनी वडगमधून पुन्हा विजय मिळवला आहे. ४१ वर्षीय मेवानी यांना यावेळी भाजप उमेदवाराने कडवी झुंज दिली. काँग्रेसचे प्रमुख नेते पराभूत झाले असताना आता मेवानी यांच्यावर सदनात सत्ताधारी पक्षाला तोंड देण्याची जबाबदारी आहे.

मुख्यमंत्र्यांना १ लाख ९२ हजारांचे मताधिक्य

अहमदाबाद : गुजरातमध्ये भाजपच्या लाटेत विरोधक गारद झाले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतदारसंघातून १ लाख ९२ हजार मतांनी विजयी झाले. पटेल यांना दोन लाख १२ हजार ४८० तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अमिबेन याज्ञिक यांना २१ हजार १२० मते मिळाली. पाटीदारांचे प्रभुत्व असलेला हा मतदारसंघ गांधीनगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. पटेल हेच पुन्हा मुख्यमंत्री असतील हे पक्षाने यापूर्वीच जाहीर केले आहे. गृहराज्यमंत्री तसेच राज्य भाजपमधील प्रमुख नेते हर्ष संघवी हे माजुरा मतदारसंघातून १ लाख १७ हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी आपच्या उमेदवाराचा पराभव केला. सुरतमधील हा मतदारसंघ आहे. क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा या जामनगर उत्तर मतदारसंघातून पन्नास हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या.

गोध्रा मतदारसंघातून भाजपचे सी.के. राऊलजी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या रश्मीबेन चौहान यांचा ३५ हजार १९८ मतांनी पराभव केला. राऊलजी २००७ पासून ग्रोध्रा मतदारसंघातून विजयी होत आहेत. एमआयएमच्या उमेदवाराला येथे ९ हजार ५०८ मते मिळाली. आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदन गढवी हे खंबालीया मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. भाजपच्या मुलूभाई बेरा यांनी त्यांचा १८ हजार मतांनी पराभव केला. गढवी हे माजी वृत्त निवेदक आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसने गमावला आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचा पराभव होत असताना मुस्लिम बहुल दानिलिमडा मतदारसंघ राखण्यात त्यांना यश मिळाले. काँग्रेसचे आमदार शैलेश परमार यांनी भाजपच्या नरेशभाई व्यास यांचा १३ हजार ५२५ मतांनी पराभव केला. येथे आपच्या उमेदवाराला जवळपास २३ हजार मते मिळाली.

दीडशे जागांचे लक्ष्य पार : भाजपने १५६ जागा जिंकून २००२मधला नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाचा आपला विक्रम मागे टाकला आहे. त्याचबरोबर १९८५चा काँग्रेसचा १४९ जागांचा विक्रमही मोडीत काढला आहे. माधवसिंह सोळंखी मुख्यमंत्री असताना काँग्रेसने हे यश मिळवले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी भाजप यंदा दीडशे जागा जिंकेल असे जाहीर केले होते. ते यंदा भाजपने साध्य केले आहे. आपने काँग्रेसशी मते फोडल्याने हे सहज शक्य झाले.

  • पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल तसेच काँग्रेसमधून आलेले ओबीसी समाजातील नेते अल्पेश ठाकूर हे भाजपकडून विजयी झाले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 00:02 IST
Next Story
भाजपचा पराभव शक्य.. हाच या निकालांचा संदेश..