scorecardresearch

मोदींकडून शिंदे, फडणवीस यांच्यावर स्तुस्तीसुमने आणि गडकरींचा सहभाग शिष्टाचारापुरता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारचा बहुप्रतिक्षित दौरा त्यांनी केलेल्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन लोकार्पणाने वैशिष्ट्यपूर्ण ठरला

मोदींकडून शिंदे, फडणवीस यांच्यावर स्तुस्तीसुमने आणि गडकरींचा सहभाग शिष्टाचारापुरता
मोदींकडून शिंदे, फडणवीस यांच्यावर स्तुस्तीसुमने आणि गडकरींचा सहभाग शिष्टाचारापुरता

चंद्रशेखर बोबडे

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारचा बहुप्रतिक्षित दौरा त्यांनी केलेल्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन लोकार्पणाने जसा वैशिष्ट्यपूर्ण ठरला तसाच तो मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परस्परांवर केलेल्या स्तुतीसुमनानेही चर्चेचा विषय ठरला. याला अपवाद ठरले ते दौऱ्यात नागपूरचे खासदार म्हणून सहभागी झालेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा. त्यांचा या दौऱ्यातील सहभाग राज्यशिष्टाचारापुरता तर मर्यादित नव्हता ना, असे वाटावे इतपत त्यात वेगळेपणा होता. म्हणूनच त्याची दौऱ्यानंतर चर्चा होती व त्याचे वेगवेगळे अर्थही राजकीय वर्तुळात काढले जात होते.

हेही वाचा >>>केतन नाईक : कामगार चळवळीतील नेतृत्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा रविवारी पार पडला. त्यावर संपूर्णपणे फडणवीस यांची छाप होती. विकासाच्या दृष्टीने विचार केला तर मोदींचा हा दौरा या भागाच्या विकासाला चालना देणारा ठरला. शिंदे-भाजप सरकारच्या पातळीवर विचार केला तर राज्यातील उद्योग परराज्यात गेल्याने निर्माण झालेली नाराजी दूर करण्यास त्याचा फायदा झाला. राजकीय पातळीवर फायद्या तोट्याचा विचार केला तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोदींच्या सभेचा पुरेपूर वापर करून घेतला. तरीही चर्चेचा विषय ठरली ती बाब म्हणजे मोदी, शिंदे-फडणवीस यांनी परस्परांवर मुक्तकंठाने उधळलेल्या स्तुतीसुमनांची. विमानतळावर आगमनापासूनच मोदी आणि फडणवीस यांच्यातील जवळीक प्रकर्षाने दिसून आली. त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यात भर पडत गेली. पण जाहीर सभे व्यतिरिक्त कुठेही मोदी किंवा अन्यांची भाषणे नव्हती, त्यामुळे मोदी, शिंदे आणि फडणवीस यांच्यात परस्परांविषयी असणारा स्नेह त्यांच्या देहबोलीतून दिसून येत होता. कधी विमानतळावर स्वागता दरम्यान मोदींनी फडणवीस यांच्याशी केलेली चर्चा असो किंवा समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमात मोदींनी शिंदेची थोपटलेली पाठ आणि शिंदेंचा हात हातात घेऊन काढलेले छायाचित्र असो. या सर्व ठिकाणी गडकरीसोबत होते. पण अंतर राखूनच. जाहीर सभेत सर्वांनाच बोलण्याची संधी मिळाली. त्यावेळी शिंदे, फडणवीस यांनी पंतप्रधानांचा गुणगौरव केला. फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची स्वप्नपूर्तीच मोदींमुळे शक्य झाल्याचे सांगून त्याचे सर्व श्रेय त्यांना दिले. केंद्राच्या गतीशक्ती योजनेचाही उल्लेख केला. हे करताना त्यांनी गडकरींनी या भागाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेखगी आवर्जून केला. पूर्वी शिंदेंनीही मोदी यांनी दर्शविलेल्या स्नेहाची परतफेड त्यांच्या भाषणात करताना मोदींच्या नेतृत्वाची स्तृती केली. त्यांच्याचमुळे आमची ओळख आहे हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. यावेळी गडकरींचेही भाषण झाले व त्यांनीही शिंदे भाषण करीत असताना मोदी-फडणवीस यांच्यातील गुजगोष्टीनेही व्यासपीठासह सभेला उपस्थित नेत्यांचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा >>>Gujarat Election 2022 : गुजरात निवडणुकीत ७४ टक्के उमेदवारांचं ‘डिपॉझिट’ जप्त; ‘या’ पक्षाच्या उमेदवारांचा सर्वाधिक वाटा

गडकरी यांच्या भाषणात नेहमीचा त उत्साह नव्हता. त्यानंतर मोदींचे भाषण झाले. त्यांनी शिंदे, फडणवीस यांच्या कौतुकाची परतफेड केली. मोदी यांनी फडणवीस यांचा उल्लेख लोकप्रिय व विकासाबाबत कळवळा असलेले नेते असा केला. पण त्यांच्या भाषणातील गडकरींचा उल्लेख हा शिष्टाचारापुरताच होता.

गडकरी भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, आठ वर्षांपासून केंद्रात मंत्री असून नागपूरच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशात ते त्यांच्या विकास कामाच्या झपाट्यामुळे ओळखले जातात. नागपुरात मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेल्या प्रमुख प्रकल्पांपैकी मेट्रो, एम्स हे दोन मोठ्या प्रकल्पात गडकरींचेही योगदान मोठे आहे. मात्र मोदींच्या दौऱ्यात गडकरींच्या कर्तृत्वाची, त्यांच्या कामाची हवी त्या प्रमाणात दखल घेतली जात नसल्याचे त्यांचे पक्षातील व पक्षाबाहेरील समर्थकांनाही रुचणारे नव्हते. या सर्व कार्यक्रमाचे समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपित केले जात होते. त्यामुळे गडकरींविषयी सहानुभूती व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत होत्या. फडणवीस यांनी समृद्धीचे बांधकाम करणाऱ्या रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची मोदींशी भेट घालून दिली. विशेष म्हणजे या महाममंडळाची स्थापना गडकरी यांनी केली होती. याचा उल्लेख गडकरींनीच त्यांच्या भाषणात केला. त्यांना हे सांगावे लागणे यातच सर्व काही आले,असे त्यांचे समर्थक चर्चा करू लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 11:57 IST

संबंधित बातम्या