सौरभ कुलश्रेष्ठ

भाजपच्या संसदीय मंडळातून ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना वगळताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील केंद्रीय निवडणूक समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी देत केंद्रात महाराष्ट्रातून भाजपचे सर्वोच्च नेते हे नितीन गडकरी नव्हे तर देवेंद्र फडणवीस हेच असतील असा संदेश मोदी यांनी दिला आहे. एकप्रकारे कायमचे प्रतिस्पर्धी असलेले गडकरी यांना वगळून आपला राजकीय हिशेब चुकता करताना मोदी यांनी नागपूरचेच व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे लाडके असलेले पण आपल्याला नेता मानणारे देवेंद्र फडणवीस यांना नेमून संघाला फार खळखळ करता येणार नाही अशी व्यवस्था केली.

Unemployed youth works for political parties
Election 2024: राजकीय पक्षांसाठी काम करणारे पगारी कार्यकर्ते
onion, Dindori, loksabha election 2024,
दिंडोरीत कांदा प्रचाराच्या केंद्रस्थानी
utkarsha rupwate, Shirdi, vanchit,
नाराज उत्कर्षा रुपवते यांचा काँग्रेसचा राजीनामा, वंचितमध्ये प्रवेश; शिर्डीतून लढणार
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत

पक्षात मंत्री व आमदार-खासदार अनेक असतात. पण नेते मोजके असतात. निर्णय प्रक्रियेतील स्थान, पक्षाच्या सर्वोच्च समितीमधील नियुक्ती यावरून हे नेतेपण अधोरेखित केले जाते. नितीन गडकरी हे केवळ ज्येष्ठ मंत्री नव्हते तर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व आतापर्यंत भाजपच्या सर्वोच्च अशा संसदीय मंडळात होते. हे मंडळ राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय पातळीवरील नियुक्त्यांचा निर्णय घेते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्ती आणि महाराष्ट्र भाजपच्या राजकारणातील प्रमुख असले तरी नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री व संसदीय मंडळातील सदस्य या नात्याने भाजपचे महाराष्ट्रातून केंद्रात काम करणारे सर्वोच्च नेते होते. तर फडणवीस हे महाराष्ट्रातील पहिल्या फळीतील पण राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांच्यानंतर दुसऱ्या फळीतील नेते असे राजकीय चित्र होते. संसदीय मंडळातून नितीन गडकरी यांना वगळून मोदी यांनी आता त्यांना एकप्रकारे त्या नेतेपदावरून दूर केले. गडकरी यांचे स्थान आता राजकीयदृष्ट्या इतर केंद्रीय मंत्री व खासदारांसारखे झाले आहे. राष्ट्रीय व महाराष्ट्राच्या राजकारणातील गडकरी यांचे महत्त्व आणखी कमी करण्यात आले आहे, असा थेट संदेश मोदी यांनी दिला. 

पण हे राजकारण केवळ गडकरींचे नेतृत्व संपवण्यापुरते नाही तर महाराष्ट्रात भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नवे नेतृत्व उभे करण्यासाठीही आहे आणि भविष्याचा त्यात विचार आहे असा संदेश मोदी यांनी फडणवीस यांना पदोन्नती देत दिला. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास देवेंद्र फडणवीस यांना भाग पाडून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना एकप्रकारे शिक्षा दिल्याचे मानले जात होते. महाराष्ट्रातील आमदारांमध्ये त्यामुळे नाराजी पसरली होती. केंद्रीय नेतृत्व फडणवीस यांचे खच्चीकरण करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. अशा परिस्थितीत २०२४ मधील लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र भाजपमधील फडणवीस यांच्यासारखा निर्णायक नेता कमकुवत होऊ नये यासाठी आता ती शिक्षा दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीत स्थान देत फडणवीस यांना पक्षादेश स्वीकारल्याचे बक्षीस देत त्यांना खूष करण्यात आले आहे. फडणवीस यांचे खच्चीकरण हे केंद्रीय भाजपचे धोरण नाही असा संदेशही त्यातून देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात फडणवीस हेच केंद्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी उचलतील असे नेते आहेत असेही त्यातून अधोरेखित करण्यात आले. याशिवाय महाराष्ट्र भाजपमध्ये आता गडकरी गट आणि फडणवीस गट असे राजकारण चालणार नाही तर फडणवीस हेच महाराष्ट्र भाजपमधील नेते असतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे मानले जात आहे.