Narendra Modi : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत खासदारांनी त्यांचं म्हणणं मांडलं. राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी त्यांना उत्तर दिलं. संविधानाचा उल्लेखही केला तसंच आम्ही संविधान जगणारी माणसं आहोत, खिशात संविधान घेऊन फिरणारे नाही असा टोलाही लगावला. इतकंच नाही तर सरकारने कशी बचत केली आणि तो निधी शीशमहलसाठी नाही तर लोकांच्या विकासासाठी वापरला असंही मोदी यांनी स्पष्ट केलं. ४० मिनिटांच्या भाषणात मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलं. बुधवारी ( ५ फेब्रुवारी ) दिल्ली विधानसभेचं मतदान आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शीशमहलचा उल्लेख करत अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलं.

अरविंद केजरीवाल यांच्यावर मोदींनी कशी टीका?

मी आज बचतीचं महत्त्व देशाला सांगतो आहे, मात्र २०१४ च्या आधीची १० वर्षे आठवा. वृत्तपत्रात हेडलाइन यायच्या आज इतक्या लाख कोटींचा घोटाळा, आज इतके लाख कोटी कुठे गेले कळलं नाही. मागच्या दहा वर्षांत घोटाळा न झाल्याने जे लाखो करोडो रुपये वाचले आहेत ते देखील आम्ही जनतेच्या सेवेसाठीही वापरले आहेत. ज्या पैशांची बचत झाली त्यातून आम्ही लोक कल्याणाच्या योजना आणल्या. त्या पैशांचा उपयोग शीशमहल बनवण्यासाठी केला नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवाल यांनाही टोला लगावला. दिल्ली विधानसभेच्या अनुषंगाने शीशमहलचा मुद्दा चांगलाच चर्चेत राहिला. दरम्यान मोदी यांनी भाषणात हा उल्लेख आवर्जून केला. त्याचप्रमाणे त्यांनी राहुल गांधींवरही टीका केली.

राहुल गांधींबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी?

“दिल्लीत अनेक जागा अशा आहेत जिथे अनेक कुटुंबांनी त्यांची संग्रहालयं उभारली आहेत, जनतेच्या पैशांतून ती संग्रहालयं उभारली आहेत. आम्ही पंतप्रधान संग्रहालय तयार केलं आहे, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सगळ्यांचा समावेश त्यात आहे. माझी तर इच्छा आहे की पीएम म्युझियममध्ये जे महापुरुष आहे त्यांच्या कुटुंबांनी, पुढच्या पिढीने ते पाहिलं पाहिजे. काही कमतरता असली तर ते सरकारला सांगितलं पाहिजे. आपल्यासाठी जगणाऱ्यांची कमतरता नाही पण आम्ही संविधानासाठी जगणारे लोक आहोत. सत्ता जेव्हा सेवा होते तेव्हा राष्ट्रनिर्मिती होते.” असं मोदी म्हणाले

सत्तेला जहागिरी म्हणून पाहिलं की लोकशाही संपते-मोदी

यानंतर नरेंद्र मोदी म्हणाले, “जेव्हा सत्तेकडे जहागिरी म्हणून पाहिलं जातं तेव्हा लोकशाही संपते. आम्ही संविधानाची भावना घेऊन चाललो आहोत, विषारी राजकारण करणं आम्हाला जमत नाही. देशाचं ऐक्य हे आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात मोठा पुतळा आम्ही तयार केला आहे. सरदार पटेल जनसंघ किंवा भाजपाचे नव्हते. पण आम्ही संविधान जगणारे लोक आहोत त्यामुळे त्यांचं इतकं मोठं शिल्प उभं केलं आहे.” याचं कारण आम्ही संविधान मानणारे, जगणारे लोक आहोत असं मोदी म्हणाले.

खिशात संविधान घेऊन फिरणारे म्हणत राहुल गांधींवर टीका

काही लोक शहरी नक्षलवादाची भाषा खुलेपणाने बोलत आहेत. हे लोक संविधान काय समजणार? देशाचं ऐक्य यांना कसं समजणार? सात दशकं, जम्मू काश्मीर आणि लडाख संविधानाच्या अधिकारापासून वंचित होतं. हा अन्याय नव्हता का? आम्ही अनुच्छेद ३७० ची भिंत पाडली. आता त्या दोन्ही राज्यांना देशातल्या लोकांप्रमाणेच अधिकार आणि हक्क मिळत आहेत. संविधानाचं महत्त्व आम्हाला माहीत आहे त्यामुळे असे बळकट निर्णय आम्ही घेतले आहेत. आपलं संविधान भेदभाव करण्याचा अधिकार देत नाही. जे लोक खिशात संविधान घेऊन फिरतात त्यांना हे कळणार नाही की मुस्लिम महिलांवर तुम्ही काय वेळ आणली होती. आम्ही ट्रिपल तलाकचा खात्मा केला आणि संविधानानुसार मुस्लिम मुलींना समानतेचा अधिकार दिला असं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं.

Story img Loader