जम्मू : जम्मू आणि काश्मीरची जनता शांतता आणि त्यांच्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी भ्रष्टाचार, दहशतवाद आणि फुटीरतावादमुक्त सरकारची वाट पाहत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी हे राज्यघटनेचे सर्वात मोठे शत्रू असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी जम्मूमधील एम. ए. एम. स्टेडियम येथे झालेल्या प्रचारसभेत त्यांनी २०१६ मधील सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख केला. ‘‘दहशतवाद्यांना माहीत आहे की त्यांनी काही चुकीचे केले तर मोदी त्यांना पाताळातूनही शोधून काढतील. जनतेमध्ये भाजपबाबत प्रचंड उत्साह आहे. काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या तीन घराण्यांच्या राजवटीचा शेवट झाला असून जम्मू-काश्मीरच्या जनतेला हे तीनही पक्ष राज्यात परत नको आहेत,’’ असे पंतप्रधान म्हणाले. काश्मीर जनतेला भ्रष्टाचार, नोकऱ्यांमधील भेदभाव, दहशतवाद, फुटीरतावाद आणि रक्तपात नको आहे. त्याऐवजी त्यांना शांतता आणि त्यांच्या मुलांचे चांगले भविष्य हवे आहे, असे पंतप्रधानांनी त्यांच्या सुमारे ४५ मिनिटांच्या भाषणात सांगितले.