Narhari Zirwal Controversy : गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अध्यक्षपदी देखील त्यांची निवड झाली. सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची सूत्रे आल्यापासून त्यांच्यासमोरील आव्हानं संपता संपेनात. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ हे त्यांच्या कार्यालयातील क्लर्कच्या लाचखोरीमुळे अडचणीत आले होते. त्यानंतर काही दिवसांत अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.

सध्या नरहरी झिरवाळ यांचा तृतीय पंथीयासोबतचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. त्यामुळे आता नरहरी झिरवाळांबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय भूमिका घेतात? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवरच सुनेत्रा पवारांसमोर पक्षातील नेमकं आव्हाने काय आहेत? जाणून घेऊयात.

राष्ट्रवादीचा चौथा नेता अडचणीत?

धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, रूपाली चाकणकर यांच्यानंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे चौथे नेते आहेत जे अडचणीत आले आहेत. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काही दिवसांत बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काही दिवसांत नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच त्यांचा पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा घेण्यात येण्याची शक्यता आहे. यानंतर आता मंत्री झिरवाळ यांचा तृतीयपंथीयाबरोबरचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने ते अडचणीत आले आहेत. मागच्या काही महिन्यांत राष्ट्रवादीचे हे चार मोठे नेते अडचणीत आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे पक्ष नेतृत्व यावर काय मार्ग काढणार? हे एक पक्ष नेतृत्वापुढे आव्हान माणलं जात आहे.

मंत्री झिरवाळ का अडचणीत आले? कथित व्हिडीओत काय?

मंत्री झिरवाळ यांचा तृतीयपंथीयाबरोबरचा एक कथित अश्लील व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून या प्रकरणात विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टिकेची झोड उठवली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती मंत्री झिरवाळ असल्याचा दावा विरोधक करत आहेत. या प्रकरणावरून मंत्री झिरवाळ यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या कथित व्हिडीओ प्रकरणाबाबत अद्याप तरी मंत्री झिरवाळ यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदार संघाचे आमदार आहेत. आता व्हायरल झालेला व्हिडीओ हा सात महिन्यापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे.

झिरवाळांचं मंत्रिपद जाणार?

मंत्री झिरवाळ यांची समाजमाध्यमांवर चित्रफित व्हायरल झाल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या प्रकरणी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर झिरवाळ यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर तसं झालं तर धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्रीपद सोडावे लागणारे झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे मंत्री असतील. त्यामुळे या प्रकरणात आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

मंत्री झिरवाळ क्लर्कच्या लाचखोरीमुळे आले होते अडचणीत

मुंबईतील मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. एका औषध दुकानदाराचा रद्द करण्यात आलेला परवाना पुन्हा नूतनीकरण करून देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून कारवाई केली होती. या प्रकरणात दोघांना अटक देखील झाली होती. या संपूर्ण प्रकरणात मंत्री झिरवाळ यांच्यावर टिकेची झोड उठली होती.

सुनेत्रा पवारांसमोर आव्हान काय?

दिवंगत नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली. तसेच पार्थ पवार यांनाही राज्यसभेची संधी देण्यात आली. त्यामुळे आता भविष्यात पार्थ पवार यांच्याकडेही पक्षाची काही प्रमाणात जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र, यातच काही दिवसांपासून राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी सुरू असून सातत्याने कोणता न कोणता नेता अडचणीत येत असल्यामुळे यावर मार्ग काढणं हे एक सुनेत्रा पवार यांच्यासमोर आव्हान मानलं जात आहे.

दुसरीकडे पक्षाच्या विलीनीकरणाच्याही चर्चा सुरू आहेत. त्यामुळे त्याबाबतही नेमकं काय भूमिका घ्यायची हे देखील एक सुनेत्रा पवारांसमोर आव्हान असणार आहे. तसेच पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठीही सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पक्षाची सूत्रे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी ताब्यात घेतल्याचा आरोप सातत्याने आमदार रोहित पवार यांच्यासह आणखी काही नेते करत आहेत. त्यामुळे यातून पक्षातील अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोर हे देखील एक आव्हान असणार आहे.