नाशिक – कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात एकाचवेळी सुरु करण्यात आलेली विविध कामे आता महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांसाठी त्रासदायक ठरु लागली आहेत. सर्वच रस्त्यांवरील खोदकाम, खड्डे, चिखल यातून वाट काढताना नाशिककर वैतागला असताना दुसरीकडे अनेक वर्षांपासून झाकून ठेवलेला नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा कोंबडा पुन्हा आरवण्यास सुरुवात झाली. कुंभमेळा मंत्री म्हणून कार्यरत भाजपचे गिरीश महाजन हे जणूकाही एकट्याच्या बळावर कुंभमेळ्याचे काम वाहून नेण्याच्या थाटात वावरत असल्याने विरोधी पक्ष तर दूरच, परंतु मित्रपक्षांमध्येही कुंभमेळाविषयक नियोजनात फारसे स्थान नसल्याची भावना निर्माण झाली आहे. विरोधक आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) नाराजी उघड करण्यास खड्ड्यांचे निमित्त झाले. त्यामुळे काही महिन्यांपासून शांत असलेले नाशिकचे राजकारण अचानक ढवळून निघाले आहे.
नाशिक शहरातील खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे पाच महिन्यात पाच नागरिकांचा मृत्यू, दुचाकी घसरणे, कित्येक वाहनचालकांचे जखमी होणे, अशा सततच्या घटनांमुळे नाशिककरांमध्ये प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला असताना महापालिका प्रशासन, महापौर आणि नाशिकचे अघोषित पालकमंत्री म्हणून वावरणारे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन तसेच सत्ताधारी नगरसेवकांना टिकेचे धनी व्हावे लागत आहे. सर्वप्रथम उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने शहरातील खड्डे आणि खोदकामांमुळे निर्माण झालेल्या समस्येवर आवाज उठविल्यानंतर इतर पक्षांनीही याविषयी भूमिका मांडण्यास सुरुवात केली. खड्डे आणि रस्ते खोदकामामुळे होणारा त्रास याचा संबंध प्रत्येक नाशिककराशी येत असल्याने उद्योजकांपासून कामगारांपर्यंत सर्वांमध्येच हळूहळू साचत गेलेला असंतोष आता बाहेर पडू लागला आहे.
विरोधक रस्त्यावर
नाशिककरांमधील या असंतोषाची जाणीव झाल्यानंतर महापालिकेतील सत्तेत सहभागी असल्याने काहीशी अडचण झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही एक, दोन आंदोलने करुन विरोधात उडी घेतली. परंतु, या आंदोलनांपासून शिंदे गटाचे जिल्ह्यातील मंत्री दादा भुसे हे अलिप्तच राहिले. नाशिक शहराशी संबंधित या घटनांमध्ये ते कुठेच दिसले नाहीत. काँग्रेस, आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडी हे पक्षही उशिरा का होईना आंदोलनात उतरले.
भाजपची पंचाईत
या सर्व घडामोडीत सर्वाधिक पंचाईत सत्ताधारी भाजपची झाली. तरीही, नाशिकमध्ये निर्माण झालेल्या खड्ड्यांना आपण नव्हे, तर महापालिका प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला. ठेकेदार नगरसेवकांचे काहीही ऐकत नाहीत. उलट, त्यांच्याकडे विचारणा केल्यास ते नगरसेवकांनाच धमकी देतात. ठेकेदारांनी उपठेकेदार नेमले असून त्यांच्याकडून ते काम करुन घेत असल्याचे खुद्द भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केंदार यांनीच उघड केले. महापौर हिमगौरी आडके आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सततच्या पावसामुळे रस्ते दुरुस्तीला अडथळे येत होते. आता सर्व खड्डे पाच-सहा दिवसांत बुजविले जातील, असे आश्वासन देत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादीचे पालकमंत्रीपद लक्ष्य
शहरात खड्ड्यांमुळे निर्माण झालेला जनक्षोभ लक्षात घेत इतके दिवस शांत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) मंत्री छगन भुजबळ यांनी जमदग्नीचा अवतार धारण केला. त्यांनी महापालिका आयुक्त, महापौर यांना जबाबदारी झटकून चालणार नाही, असे सुनावले. नाशिककरांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची वाट पहात आहात काय, असे ठणकावतानाच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीही या प्रकरणात लक्ष घालावे, असे नमूद केले. भुजबळ यांनी केलेल्या प्रश्नांमागे रिकाम्या पालकमंत्रीपदाची किनार असल्याचे मानले गेले.
पालकमंत्रीपदाचा विषय पुन्हा ऐरणीवर आणण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मानून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकच्या पालकमंत्रीपदी छगन भुजबळ यांची नियुक्ती करण्याचे आवाहन करणारे फलक शहरात जागोजागी लावले गेले. यासंदर्भात भुजबळ यांनी कानावर हात ठेवले. आपणांस या फलकांसंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचा दावा करुन त्यांनी सर्व फलक काढून घेण्यास कार्यकर्त्यांना बजावण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व फलक गायब झाले असले तरी या फलकांना जे काम करावयाचे होते, ते मात्र झाले. म्हणजेच, पालकमंत्रीपदाचा विषय पुन्हा चर्चेत आला. शहरातील समस्यांविषयी स्थानिक मंत्र्यांना अधिक ममत्व असते, हे बिंबविण्याचा प्रयत्न करुन एकप्रकारे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकविषयी फारसे देणेघेणे नसल्याचे दर्शविण्यात आले.
तूर्तास तरी भुजबळ आणि महाजन या दोन मंत्र्यांमध्ये पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या अघोषित संघर्षापासून शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे अंतर राखून आहेत. पालकमंत्रीपदाविषयी भुजबळ समर्थकांनी जोर लावला असला तरी महाजन यांचा तंबू मात्र तसा शांत आहे.
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. खड्डयांमुळे पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिकबद्दल बरेच काही बोलले जात आहे. याचा अर्थ छगन भुजबळ यांना पालकमंत्री करा असा होत नाही. हे काम ज्यांच्याकडून सुरु आहे त्यांच्याकडून व्यवस्थित करा, असे माझे म्हणणे आहे. कुंभमेळ्यावर कोणतीही नाराजी नाही. मात्र, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अडचणी सोडवल्या पाहिजेत -छगन भुजबळ (मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
पालकमंत्री असो वा नसो, मी नाशिकमध्ये नेहमी हजर असतो. छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांना काय वाटते, ते त्यांनी मांडले आहे. येत्या सहा महिन्यांत नाशिकचा चेहरामोहरा बदलेल. सर्व कामे पूर्ण होतील. नाशिकला सर्वात सुंदर शहर करावयाचे आहे. -गिरीश महाजन (कुंभमेळा मंत्री)
