मालेगाव : विधानसभा निवडणुकीत बागलाण विधानसभा मतदार संघात भाजपचे दिलीप बोरसे हे तब्बल १ लाख २९ हजारावर मताधिक्याने विजयी झाले होते. आताच्या सटाणा नगर परिषद निवडणुकीत मात्र मतदारांनी याच बोरसे यांच्या विरोधात राग आळवल्याचे दिसून आले. भाजपने नगरसेवक पदाच्या २४ पैकी १५ जागा जिंकल्या असल्या तरी, नगराध्यक्षपद हस्तगत करत शिवसेना शिंदे गटाने भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्याची किमया केली. उमेदवारी देताना निष्ठावंतांना डावलण्यात आले, हा या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला. त्याबद्दल जबाबदार ठरवत आमदार बोरसे यांच्यावर या पराभवाचे खापर फोडण्यात येत आहे.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सटाण्यात भाजपला अत्यंत अनुकूल वातावरण दिसत होते. त्यामुळे इच्छुकांची संख्या अधिक होती. नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असलेल्या थेट नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या पत्नी योगिता मोरे आणि रुपाली कोठावदे यांच्यात भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी रस्सीखेच होती. त्यात मोरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले गेले. त्यामुळे रूपाली कोठावदे गट नाराज झाला. रुपाली या भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीधर कोठावदे यांच्या स्नुषा आहेत.
सटाणा शहराची आर्थिक नाडी असलेल्या सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेत श्रीधर कोठावदे यांचे मोठे प्रस्थ आहे. गेल्या अडीच दशकांपासून ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय आणि सटाण्याचे माजी नगराध्यक्ष असलेले सुनील मोरे हे दोन वर्षांपूर्वी समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे निष्ठावंत कोठावदे यांना डावलून मोरे यांच्या पत्नी योगिता यांना मिळालेली उमेदवारी भाजपमधील एका गटाला रुचली नाही. या गटाने बंडखोरीचा पवित्रा घेत रुपाली कोठावदे यांना निवडणूक रिंगणात उतरविले. कोठावदे यांची ही बंडखोरी भाजपला चांगलीच महागात पडली.
थेट नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या लढतीत शिंदे गटाच्या हर्षदा पाटील यांनी भाजपच्या योगिता मोरे यांचा दारुण पराभव केला. पाटील यांना १० हजार ३७ तर,मोरे यांना ७ हजार ३७३ मते मिळाली. भाजपच्या बंडखोर उमेदवार रुपाली कोठावदे यांना ५ हजार ७४१ मते मिळाली. नगराध्यक्ष पदाने हुलकावणी दिलेल्या भाजपला नगरसेवक पदाच्या २४ पैकी सर्वाधिक १५ जागा मिळाल्या आहेत. शिंदे गटाला चार तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. अपक्षांच्या वाटेला चार जागा आल्या.
कोठावदे यांच्याप्रमाणे नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या आणखी काही निष्ठावंतांना सटाण्यात भाजपकडून उमेदवारी नाकारली गेली. त्यातील तीन इच्छुकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली. तर, दोघांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी करणे पसंद केले. विशेष म्हणजे या पाचही जणांनी भाजपला पराभूत करून विजयश्री खेचून आणला. याच पक्षांतर्गत असंतोषामुळे खुद्द माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनाही पराभवाचे धनी व्हावे लागले.
सटाणा नगरपालिका निवडणुकीत उमेदवार निश्चित करताना स्थानिक आमदार म्हणून बोरसे यांच्या शब्दाला किंमत होती. अशावेळी उमेदवारांची शिफारस करताना बोरसे यांनी मनमानी केली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरुन मोरे की कोठावदे असा तिढा निर्माण झाला तेव्हा कोठावदे यांना नगरसेवक पदाची उमेदवारी आणि निवडून आल्यावर उपनगराध्यक्ष पद देऊ करण्याचा तोडगा एका वरिष्ठ नेत्याने सुचवला होता. मात्र, बोरसे त्यालाही राजी झाले नाहीत. ‘माझ्या पद्धतीने उमेदवारी द्या, मी तुम्हाला संपूर्ण सत्ता देतो’ अशी ग्वाही बोरसे यांनी दिली. पक्षश्रेष्ठींनी त्यास मान्यता दिली आणि भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली,असा सूर आता लावला जात आहे.

