मुंबई : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील भाजपचे बंडखोर गोकूळ गीते यांनी अखेर माघार घेत असल्याचे जाहीर केले असले तरी मतपत्रिकेवर त्यांचे नाव कायम राहणार आहे. १९७२च्या विधानसभा निवडणुकीत असाच एक प्रकार घडला होता. माघार घेतल्याचे जाहीर केलेला उमेदवार निवडून आला होता. यामुळे नाशिकमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होणार तर नाही ना, याची शंका घेतली जाते.
विधान परिषदेच्या नाशिक प्राधिकारी संस्था मतदारसंघात उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच होती. शेवटी ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली. शिवसेनेने माजी आमदार नरेंद्र दराडे यांची उमेदवारी जाहीर केली. त्याच वेळी गोकुळ गीते, प्रशांत हिरे, गणेश गीते या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी धावपळ केल्यावर दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत माघार घेतली. गोकुळे गीते यांची मनधरणी करताना महायुतीच्या नेत्यांची दमछाक झाली. गिरीश महाजन व उदय सामंत या दोन मंत्र्यांना नाशिकमध्ये तळ ठोकून बसावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. ते बधत नसल्यानेच शेवटी त्यांच्या जुन्या खटल्याचा विषय उकरून काढण्यात आल्याचीही चर्चा आहे. एकूणच साम, दाम, दंड सर्व आयुधांचा वापर करण्यात आला. गीते यांनी माघार घेतली तरी त्यांचे नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. त्यामुळे कदाचित एक गठ्ठा मते त्यांना मिळू शकतात.
माघार घेतलेला उमेदवार विजयी
महाराष्ट्रात माघार घेतलेला उमेदवार निवडून आल्याचा एक मजेशीर प्रसंग १९७२च्या विधानसभा निवडणुकीत घडला होता. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा राखीव मतदारसंघातून काँग्रेसने तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री बाबुराव भारस्कर यांच्याऐवजी प्रभाकर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या भारस्कर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. शेवटी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी भारस्कर यांची समजूत काढली. त्यांना मुंबईत पाचारण करण्यात आले. चर्चेअंती भारस्कर यांनी माघार घेण्याची धोषणा केली. त्यांनी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली.
आताप्रमाणे तेव्हा सहजपणे हेलिकाॅप्टर उपलब्ध होत नसत. तसेच रस्ते प्रवासही खडतर असे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत भारस्कर हे मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पोहचू शकले नाहीत. परिणामी त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला. आता मोठा पेचप्रसंग उभा राहिला. त्यावर मार्ग काढण्यात आला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराबरोबर भारस्कर यांनी प्रचार करून त्यांना मते देण्याचे आवाहन करण्याचे ठरले. त्यानुसार अधिकृत उमेदवाराबरोबर भारस्कर हे प्रचार करीत असत. शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन भारस्कर करीत होते, अशी आठवण काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार यांनी सांगितली.
काँग्रेसला तेव्हा फारसे आव्हानही नव्हते. मतदारांच्या मनात वेगळेच होते. मतदारांनी माघार घेतलेल्या भारस्कर यांनाच मते दिली. मतमोजणीत अपक्ष बाबुराव भारस्कर यांना १९,८५३ तर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रभाकर शिंदे यांना १५,१९२ मते मिळाली. अशा रितीने माघार घेतलेले पण मतदान पत्रिकेवर नाव कायम राहिलेले भारस्कर हे ४,६६१ मतांनी विजय झाले.
भारस्कर यांनी माघार घेतली तरी त्यांचे नाव मतपत्रिकेवर होते. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ ते सर्वत्र फिरले होते. मतदारांनी भारस्कर हेच उमेदवार असल्याचे समजून त्यांना मते दिली. या गोंधळात भारस्कर हे विजयी झाल्याची आठवण माजी आमदार उल्हास पवार यांनी सांगितली.
