Vande Mataram Controversy: ‘वंदे मातरम’ या दोन शब्दांनी देशातील नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुलिंग जागे केले, त्याच गीतावरुन आता देशात राजकीय वादाला तोंड फुटले आहे. वंदे मातरमबद्दल गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार आता या गीतातील सर्व सहा कडव्यांचे गायन करावे लागणार आहे. सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळा, समारंभ आणि औपचारिक कार्यक्रमात राष्ट्रीय गीत वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे. यावर देशातील मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेतला आहे. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? यावरुन वाद का होतोय? मुस्लिम संघटनांचे मत काय आहे? हे या लेखातून समजून घेऊयात.

गृहमंत्रालाने जाहीर केलेली नियमावली काय आहे?

गृहमंत्रालयाच्या नव्या नियमावलीनुसार वंदे मातरम या राष्ट्रीय गीतामधील आता सर्व सहा कडव्यांचे ३ मिनिट १० सेकंद गायन करावे लागणार आहे. यापूर्वी ६५ सेकंदात फक्त दोनच कडवी गायली जात होती. सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळा, समारंभ आणि औपचारिक कार्यक्रमात राष्ट्रीय गीत वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे. झेंडा वंदन, राष्ट्रपती आणि राज्यपालांचे कार्यक्रम, त्यांचे भाषण आणि राष्ट्राला संबोधित करण्यापूर्वी राष्ट्रीय गीत वाजवले जाणार आहे. 

‘वंदे मातरम’ला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण झाली.  डिसेंबर २०२५ ला या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत चर्चा सुरु केली होती. राज्यसभेतही यावर चर्चा झाली. दोन्ही सभागृहात यावरुन सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

‘वंदे मातरमचा जन्म

‘वंदे मातरम’ हे गीत बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी रचले होते. सहा वर्षानंतर चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीतून ते प्रसिद्ध करण्यात आले. आनंदमठमध्ये मीर जाफर आणि ईस्ट इंडीया कंपनीविरोधातील उठावाचे चित्रण करण्यात आले आहे. स्वदेशी चळवळीत वंदे मातरम घोषणेचा उदय झाला, त्यानंतर ही घोषणा स्वातंत्र्य चळवळीसोबत जोडली गेली ती कायमची. 

जवाहरलाल नेहरूंनी ऑक्टोबर १९३७ मध्ये सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या पत्रात आनंदमठाच्या पार्श्वभूमीमुळे हे गीत मुस्लिम समाजाच्या भावना भडकावू शकते, अशी भीती व्यक्त केली होती. दरम्यान, ऑक्टोबर १९३७ मध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या ठरावात गीतामधील सुरुवातीची दोन कडवी गाण्यास काही हरकत नसल्याचा ठराव घेण्यात आला. पहिल्या दोन कडव्या अपवादात्मक काही नसल्याचा निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आला.

‘वंदे मातरम’बद्दल आक्षेप काय आहेत?

वंदे मातरममध्ये ‘भारत मातेचा’ देवी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. मुस्लिम विद्वानांकडून याच गोष्टीला विरोध केला जात आहे. देवी म्हणून उल्लेख इस्लामच्या एकेश्वरवादाच्या मूलभूत सिद्धांताचे उल्लंघन आहे. मुस्लिम अल्लाहशिवाय इतर कोणाचीही पूजा करत नाहीत. 

तसेच, तिसऱ्या कडव्यात मातृभूमीच्या रक्षणासाठी कोट्यवधी हात तलवारी हातात घेण्यास सज्ज आहेत. चौथ्या कडव्यात प्रत्येक मंदिरात मातृभूमीची प्रतिमा कोरलेली आहे, असे म्हटले आहे. तर, पाचव्या कडव्यात मातृभूमीची तुलना दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या देवींशी करण्यात आली आहे. हिंदू देवतांच्या उल्लेखामुळे मुस्लिम विद्वानांकडून विरोध केला जात आहे. 

इतिहासकार तनिका सरकार यांच्या मते, वंदे मातरम गीतामधील शेवटचे भाग “आनंदमठात मुस्लिम शत्रू दर्शवतात तर, येथील मातृभूमी मुस्लिमांना दूर करणाऱ्या हिंदू देवीचे रूप धारण करते.”

मुस्लिम संघटनांची भूमिका काय?

जमियत उलेमा-ए-हिंद आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) यांनी गृह मंत्रालयाच्या निर्देशाचा निषेध केला आहे. गृहमंत्रालयाचे निर्देश संविधानाने हमी दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला आहे, असे जमियतने म्हटले आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने देखील हे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, धर्मनिरपेक्ष मूल्य आणि धार्मिक मान्यतांच्या विरोधात असल्याचे मत व्यक्त केलं आहे. 

“वंदे मातरम हे गीत म्हणायला आमचा काही आक्षेप नाही. मात्र या गीतामध्ये देशाला देवी मानून, दुर्गा देवीशी देशाची तुलना करण्यात आली आहे. चार श्लोकांवर आधारीत हे गाणं आहे या गाण्यामध्ये पूजा करण्यासंबंधीच्या शब्दांचा अंतर्भाव आहे. मां मै तेरी पूजा करता हूँ. असा वंदे मातरमचा अर्थ आहे. ही बाब धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधातली आहे. मुसलमान माणूस अल्लाहला मानतो आणि त्याचीच प्रार्थना करतो. त्यामुळे हे अनुच्छेद २५ म्हणजेच धार्मिक स्वातंत्र्य आणि अनुच्छेद १९ म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावरचा हल्ला आहे.” असं अर्षद मदानी यांनी म्हटलं आहे.

तर, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस मौलाना मोहम्मद फजलूर रहीम मुजाद्दीदी यांनी, “धर्मनिरपेक्ष सरकार एका धर्माच्या श्रद्धा किंवा शिकवणी दुसऱ्या धर्माच्या अनुयायांवर जबरदस्तीने लादू शकत नाही,” असे म्हटले आहे.

लोकसभेत वादळी चर्चा

वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लोकसभेत चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरूंवर मुस्लिम लीगच्या दबावाखाली गीतामधील कडवी कमी केल्याचा आरोप केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी नेहरुंनी सुभाषचंद्र बोस यांना लिहलेल्या पत्राचा संदर्भ दिला. 

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर देताना त्याच पत्राचा संदर्भ देत, नेहरूंनी पत्रात मुस्लिम लीगच्या नीच सांप्रदायिकतेवर टीका केल्याचे प्रियांका गांधींनी सांगितले.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत बोलताना, वंदे मातरम जबरदस्तीने लादणे हे संविधानाच्या विरुद्ध असल्याचे मत नोंदवले होते.