तुकाराम झाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भारत जोडो’ ही पदयात्रा काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या उत्साही सहभागाचे दर्शन हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे झाले. या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात ‘ पन्नास खोके एकदम ओके’ म्हणत जोरदार घोषणाबाजी करत डांगर यांना डिवचले. औरंगाबादच्या एका दिव्यांग तरुणानेही पदयात्रेत सहभाग नोंदवला.

हेही वाचा… पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भाजपचा संघटनात्मक प्रभाव वाढवण्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचा भर

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी हिंगोली शहराच्या वेशीवर पोहोचताच तिचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. बंजारा समाजाच्या महिला आपल्या वाद्यांसह पारंपरिक वेशभूषेत,तर नरसी नामदेव येथील युवा भजनी मंडळ टाळ- मृदंगांसह स्वागताला उपस्थित होते. पुणे येथील महिला व पुरुष गटाचे ढोल पथक यात्रेचे आकर्षण ठरले. पदयात्रेत खुद्द राहुल गांधी यांनी ढोल वाजवत यात्रेकरूंचा उत्साह वाढवला. सकाळी दहाच्या सुमारास शहरात प्रवेश केलेली ही यात्रा दुपारी चार वाजता वडदपाटी येथील मुक्काम स्थळाकडे मार्गस्थ झाली.

हेही वाचा… भाजपच्या पत्रकार परिषदेत प्रश्न न आवडे नेत्यांना!; चित्रा वाघ व पत्रकारांच्या वादानंतर पक्षातच संमिश्र प्रतिक्रिया

पदयात्रेत सांगली येथून माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १५ हजार कार्यकर्ते, तसेच सातारा व पुणे येथील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. ही पदयात्रा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या फार्म हाऊससमोर येताच यात्रेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘५० खोके एकदम ओके, माजले बोके’ अशी जोरदार घोषणाबाजी करून पदयात्रा दणाणून सोडली. या पदयात्रेत औरंगाबादचा अब्दुल अन्सारी हा दिव्यांग तरुण आठ दिवसांपासून यात्रेत सहभागी झाला असून तो बुलढाण्यापर्यंत यात्रेत चालणार आहे.

हेही वाचा… विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुण्यात आघाडीत बिघाडी

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा ६८ वा, तर मराठवाड्यातील आजचा आठवा दिवस आहे. कळमनुरी तालुक्यातील वसपांग्रा येथून सकाळी सहा वाजता ही यात्रा हिंगोलीकडे मार्गस्थ झाली. राहुल गांधी यांच्या समवेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विश्वजित कदम, माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, आमदार प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनीष आखरे यांच्यासह अनेक पदाधिकारी यात्रेत सहभागी होते. यात्रेत ईश्वर काकडे नावाच्या व्यक्तीने मराठा आरक्षण प्रकरणनिकाली काढावे, तसेच राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन करावे या मागणीचे निवेदन राहुल गांधी यांना दिले. यात्रेत राहुल गांधी ढोल वाजवत चालत असल्याने यात्रेकरूंचा उत्साह द्विगुणित होत असल्याचे चित्र होते. नरसी नामदेव येथील वारकरी संप्रदायाच्या युवकांनी टाळमृदंगाच्या आवाजात अभंगात आपला सहभाग नोंदवला. बंजारा समाजाच्या महिला आपल्या पारंपरिक वेशभूषेत वाद्यांसह यात्रेत सहभागी होत्या, सांगली येथील पथकाने सुमारे१२ टन रांगोळी आणि विविध रंगांचा वापर करून राहुल गांधी यांचे एक हजार चौरस फुटाचे चित्र रेखाटले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nationalist congress party workers who participated in bharat jodo yatra in hingoli criticized mla santosh bangar print politics news asj
First published on: 14-11-2022 at 18:20 IST