scorecardresearch

Premium

दि.बांच्या आंदोलनाची भाजपला धग; ठाणे, रायगड जिल्ह्यात पुन्हा आंदोलनाचा इशारा

महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात पुकारलेल्या या आंदोलनाची धग भाजपलाच बसू लागल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

Navi Mumbai airport, name controversy, D B Patil, BJP
दि.बांच्या आंदोलनाची भाजपला धग; ठाणे, रायगड जिल्ह्यात पुन्हा आंदोलनाचा इशारा ( संग्रहित छायाचित्र )

जगदिश तांडेल

उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना आंदोलनाची राळ उडवून देणाऱ्या भाजपची अवस्था या प्रश्नावर गेल्या काही दिवसांपासून मात्र खिंडीत सापडल्यासारखी झाली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारकडून अजूनही दि.बा यांच्या नावाची अंतिम अधिसूचना निघालेली नाही. त्यामुळे या प्रश्नावर संघर्षाची वेळ आणू नका असा इशारा देत गेल्या आठवड्यात ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आगरी-कोळी समाजाचे नेते संघर्ष समितीच्या माध्यमातून एकवटले होते. यावेळी नामकरणाचे फलकही या नेत्यांनी विमानतळाच्या वेशीवर उभारले. या आंदोलनात भाजपच्या नेत्यांचा पुढाकार दिसत असला तरी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात पुकारलेल्या या आंदोलनाची धग भाजपलाच बसू लागल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

ajit pawar in baramati politics
अजित पवारांची बारामतीमध्ये कसोटी
court hammer
मविआच्या काळातील विकासकामांची स्थगिती उठवली ; उच्च न्यायालयाकडून सर्व याचिका निकाली
pankaja munde (5)
पंकजा मुंडे यांची चहूबाजूने कोंडी, कारखान्यावर कारवाई; पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी डावलल्याने खदखद
Vanchit Aghadi march sangli
सांगली : कंत्राटी नोकरभरतीच्या विरोधात वंचित आघाडीचा मोर्चा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार व प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी येथील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. त्यासाठी मुंबई, रायगड,ठाणे पालघर या जिल्ह्यातील हा समाज एकवटलेला पहायला मिळाला. या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम केली. त्यानंतर यासंबंधीचा ठरावही विधानसभेत मांडण्यात आला. त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी बेलापूर येथे मोठे आंदोलन केले होते. या प्रश्नावर प्रकल्पग्रस्तांच्या भावना तीव्र असल्या तरी त्यावेळी झालेल्या आंदोलनाला भाजपने पडद्याआडून मोठी रसद पुरविल्याचे पुढे स्पष्ट झाले. महाविकास आघाडी विरोधाचा लाभ मिळावा या करीता भाजपने हवी ती रसद या आंदोलनामागे उभी केली. यामध्ये उरण पनवेल मधील आमदार आघाडीवर होते. या आंदोलनाचा राजकीय फायदा भाजपला होण्याची शक्यता अधिक वाढली होती. पुढे भिवंडी परिसरातील खासदार कपील पाटील यांना थेट केंद्रीय राज्यमंत्री करत भाजपने आगरी समाजाला खूष करण्याचा प्रयत्नही केला. या प्रश्नावर आगरी-कोळी समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदावरुन पायउतार होण्यापुर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव विधान सभेत आणला व त्याला मंजुरी मिळवून दिली. यानंतर ठाकरे यांचे सरकार पडले आणि राज्यात नवी राजकीय समिकरणे उदयास आली. असे असताना मागील दीड वर्षात महाराष्ट्र सरकारच्या या ठरावाला केंद्र सरकार मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे दि.बा.पाटील यांच्या नावासाठी सुरु झालेले हे आंदोलन पुन्हा एकदा पेटू लागले असून याची सर्वाधिक धग आता भाजपच्या नेत्यांनाच जाणवू लागली आहे.

हेही वाचा… चांद्रयान मोहीमेची कामगिरी भाजप दोन गीतांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचविणार

हेही वाचा… माजी मंत्री नितीन राऊत यांचे काँग्रेसमधील राजकीय वजन घटले?

प्रकल्पग्रस्तांच्या भावना तीव्र

राज्य सरकारने मंजुर केलेला ठराव अजूनही केंद्राने का मंजुर केला नाही असा सवाल उपस्थित करत गेल्या आठवड्यात संघर्ष समितीचे नेते विमानतळ प्रकल्प परिसरात एकवटल्याचे पहायला मिळाले. केंद्रात भाजप सत्तेवर आहे. येथील समाजाचे केंद्रात कपिल पाटील हे नेतृत्व करीत असतानाही ठरावाला मंजुरी का दिली जात नाही, असा सवाल आता प्रकल्पग्रस्तांच्या एका मोठ्या समूहामार्फत केला जाऊ लागला आहे. नामांतर समितीच्या बैठकीत ही आवाज उठल्याने अखेरीस समितीच्या वतीने विमानतळ प्रवेशद्वारावर कोणतीही परवानगी नसताना दिबांच्या नावाचे फलक झळकविण्यात आले आहेत. यावेळी रायगड जिल्ह्यातील भाजपचे आमदार, नेते उपस्थित होते. मात्र संघर्ष समितीच्या आक्रमक भूमीकेपुढे या नेत्यांचीही कोंडी होत असल्याचे चित्र आता पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकांपुर्वी कोणत्याही परिस्थितीत नामकरणाचा हा तिढा सोडविला जावा यासाठी भाजपचे स्थानिक नेते प्रयत्नशील असल्याची आता चर्चा आहे. दरम्यान, नामांतर समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी या प्रश्नावर थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. केंद्र सरकार विरोधात आंदोलन होणार असेल तर या समितीचे नेतृत्व करणाऱ्या भाजपच्या नेत्यांची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने ही या भाजपा विरोधी असंतोषाचा फायदा घेत नामांतर समितीच्या मागणीला पाठिंबा जाहीर केला आहे. दिबांच्या नावासाठीची प्रस्ताव प्रक्रिया केंद्राकडे सुरू असून पाठपुरावा करीत आहोत. लवकरच नवी मुंबई विमानतळाला भूमिपुत्राचे नेते दि. बा. पाटील यांच्या नावाला मंजुरी मिळेल अशी माहिती उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navi mumbai airport name controversy likely to fire up again the demand to give name of d b patil print politics news asj

First published on: 22-08-2023 at 14:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×