Allegations on Congress पंजाबच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक विधान समोर आले आहे. काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीने एक खळबळजनक आरोप केला आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी ‘५०० कोटी रुपयांनी भरलेली सुटकेस’ द्यावी लागते, असे विधान त्यांनी केले आहे. शनिवारी चंदीगडमध्ये राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, जर सिद्धू यांना पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा केले, तरच ते काँग्रेसमध्ये सक्रिय राजकारणात परततील. सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी केलेल्या आरोपांमुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा समोर आला आहे. यावरून काँग्रेस भाजपामध्येही वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेमके प्रकरण काय? हा वाद कशावरून निर्माण झाला? जाणून घेऊयात…
नवज्योत कौर यांच्या विधानाने राजकीय वादळ
नवज्योत कौर यांनी पक्षात प्रचंड अंतर्गत कलह असल्याचे सांगत खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “पक्षात आधीच मुख्यमंत्रिपदासाठी पाच चेहरे आहेत, ते काँग्रेस पक्षाला पराभवाच्या दिशेने नेत आहेत.” पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार त्या म्हणाल्या, “आम्ही नेहमीच पंजाब आणि पंजाबियांबद्दल बोलतो, पण मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्याकरिता आमच्याकडे ५०० कोटी रुपये नाहीत.” त्या पुढे म्हणाल्या, “जर कोणताही पक्ष त्यांना पंजाबची सुधारणा करण्यासाठी ती शक्ती देत असेल तर आम्ही तयार आहोत. कोणत्याही पक्षाला देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत, पण आम्ही निकाल देऊ आणि पंजाबला सुवर्ण राज्य करून दाखवू.”
जर भाजपाने त्यांना ही जबाबदारी दिली, तर सिद्धू भाजप३मध्ये पुन्हा प्रवेश करतील का? असे विचारले असता त्या म्हणाल्या, “मी त्यांच्या वतीने भाष्य करू शकत नाही.” नवज्योत सिंग सिद्धू गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय नाहीत आणि त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारही केला नव्हता. आयपीएल २०२४ मध्ये त्यांनी समालोचक म्हणून पुनरागमन केले आणि क्रिकेट व जीवनशैलीवर आपले विचार मांडण्यासाठी एप्रिलमध्ये स्वतःचे यूट्यूब चॅनेलही सुरू केले. त्यावेळी जेव्हा सिद्धू यांना राजकारणात परतण्याबाबत विचारण्यात आले होते, तेव्हा ते म्हणाले होते की, काय होईल ते वेळच सांगेल. राजकारण हे त्यांच्यासाठी लोकांच्या कल्याणाचे साधन आहे, व्यवसाय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
भाजपाची काँग्रेसवर टीका
नवज्योत कौर सिद्धू यांनी केलेल्या दाव्यानंतर भाजपाने रविवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. सुटकेसमध्ये ५०० कोटी रुपये असल्याशिवाय कोणीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही, या विधानाने काँग्रेसमधील भ्रष्टाचार उघड झाला असल्याचे भाजपाने म्हटले आहे. भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, काँग्रेस पक्ष पूर्णपणे भ्रष्टाचारात अडकला आहे हे आता स्पष्ट झाले आहे. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार त्रिवेदी म्हणाले, “आज पंजाबमधील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीने सांगितले की, काँग्रेसमध्ये कोणाकडे ५०० कोटींची सुटकेस असेल तरच तो मुख्यमंत्रिपदाचा विचार करू शकतो.”
त्या पुढे म्हणाल्या की, भ्रष्टाचाराची पातळी इतकी वाढली आहे की नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत आणि सरकारपासून पक्षापर्यंत काँग्रेस पूर्णपणे भ्रष्टाचारात बुडाली आहे. पंजाब भाजपाचे अध्यक्ष सुनील जाखड़ यांनी दावा केला की, जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांनाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. “मला थेट सूत्रांकडून सांगण्यात आले होते की मुख्यमंत्रिपद चांगल्या कामामुळे नाही, तर ३५० कोटी रुपयांमुळे मिळते, माझ्याकडे त्या संभाषणाचे रेकॉर्डिंग नाही, पण कदाचित श्रीमती सिद्धू यांच्याकडे असेल,” असे ते म्हणाले.
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ म्हणाले की, नवज्योत कौर यांनी काँग्रेसचे ‘मनी-बॅग पॉलिटिक्स’ (पैशाचे राजकारण) उघडे पाडले आहे. जेव्हा काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याची पत्नीच मान्य करते की मुख्यमंत्रिपद आर्थिक व्यवहारातून खरेदी केले जाऊ शकते, तेव्हा हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे पतन दर्शवते.
या वादावर काँग्रेसची प्रतिक्रिया
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी या वादावर भाष्य करण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, यावर पक्षश्रेष्ठीच प्रतिक्रिया देतील. मात्र, माजी उपमुख्यमंत्री आणि गुरुदासपूरचे खासदार सुखजिंदर सिंग रंधावा यांनी सिद्धू कुटुंबाला पक्षाबाहेर काढण्याची मागणी केली. ते म्हणाले, “असे वाटते की ज्या मिशनसाठी सिद्धू कुटुंब काँग्रेसमध्ये आले होते ते आता पूर्ण झाले आहे. जेव्हा ते पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष झाले (जे मुख्यमंत्रिपदाच्या तोडीचे पद होते), तेव्हा त्यांनी किती पैसे दिले आणि कोणाला दिले हे ते सांगतील का?”
ते पुढे म्हणाले, “त्यांची जुनी वागणूक पाहता हे स्पष्ट आहे की ते विरोधकांनी लिहून दिलेल्या पटकथेनुसार बोलत आहेत आणि त्यामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. आता ते पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत.” आम आदमी पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि अजनाळाचे आमदार कुलदीप धालीवाल यांनी काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीसाठी त्यांचा अंतर्गत संघर्ष आणि अहंकार जबाबदार असल्याचे म्हटले. नवज्योत कौर यांच्या विधानाने पक्षाचे अंतर्गत वास्तव समोर आले आहे, असे ते म्हणाले.
