scorecardresearch

Premium

भगवंत मान यांना नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामुळेच मुख्यमंत्रीपद मिळाले; सिद्धू यांच्या पत्नीचा दावा

काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी असा दावा केला की, सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री व्हावे, अशी अरविंद केजरीवाल यांची इच्छा होती. पण सिद्धू यांनी त्याला नकार देऊन भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाची खूर्ची बहाल केली.

Navjot Singh Sidhu and Navjot Kaur
नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर टीका केली. (Photo – PTI)

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी केलेल्या एका विधानामुळे पंजाबमध्ये राजकीय वाद सुरू झाला आहे. नवज्योत कौर म्हणाल्या की, भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची नवज्योत सिंग सिद्धू यांनी भेट दिली. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबचे नेतृत्व करावे, अशी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची इच्छा होती. पण नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतला. नवज्योत कौर यांच्या वक्तव्यामुळे आता भगवंत मान आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

नवज्योत कौर यांनी ट्विटरवर अनेक ट्विट केले आहेत. एका ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री भगवंत मान आज मी तुमचे लपवले गेलेल रहस्य उलगडत आहे. तुम्ही ज्या खुर्चीवर आज बसला आहात, ती तुम्हाला तुमचे मोठे भाऊ श्री. नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिली आहे. तुमच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती की, नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबचे नेतृत्व करावे.”

नवजोत कौर यांनी असा दावा केला की, अरविंद केजरीवाल यांनी विविध माध्यमातून नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी सिद्धू यांनी वेगळा निर्णय घेतला नाही. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबच्या कल्याणासाठी काय योगदान दिले, याची जाणीव अरविंद केजरीवाल यांना आहे. राज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिद्धू यांनी खूप प्रयत्न केले आहेत.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये नवज्योत कौर यांनी सिद्धू यांचे कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या, “तुम्ही जर सत्याच्या मार्गावर चाललात तर ते तुम्हाला सहकार्य करतील. ज्यावेळी तुम्ही विचलित होता, त्यावेळी ते तुम्हाला जागे करतात. पंजाबला पुन्हा सोनेरी दिवस प्राप्त करून देणे हे त्यांचे स्वप्न आहे आणि ते दिवसाचे २४ तास हे स्वप्न जगत असतात.”

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे रविवारी जालंधरच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका पंजाबी दैनिकाच्या संपादकाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री मान यांनी याबाबत विरोधकांवर टीका केली. या विषयावर प्रतिक्रिया देत असताना नवजोत सिंग सिद्धू म्हणाले की, दिल्लीच्या रिमोट कंट्रोलवर पंजाबचे प्यादे चालतात आणि आता ते नैतिक व्याख्यान देत आहेत.

आपचे प्रवक्ते मालविंदर सिंग कांग यांनी नवज्योत कौर सिद्धू यांच्या वक्तव्यावर उपरोधिक टीका केली. यासाठी त्यांनी गालिबचा एक शेअर वापरला. ते म्हणाले, “मनाला आधार देण्यासाठी हा विचार चांगला आहे. पण पंजाबच्या लोकांनी याआधीच सिद्धूला नाकारले आहे. मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून भगवंत मान हे पंजाबमध्ये लोकप्रिय होते. मुख्यमंत्रीपदाच्या आधी त्यांनी दोनदा खासदारपद भूषविले आहे. भगवंत मान हे वादग्रस्त नसणारे व्यक्ती असून पंजाबच्या जनतेने त्यांना मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 18:42 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×