पंजाबच्या राजकारणात गेल्या दोन महिन्यात काँग्रेसमध्ये काही अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले. अमृतसर पूर्वच्या माजी आमदार नवज्योत कौर सिद्धू यांचे डिसेंबरमध्ये काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी त्यांनी स्वतःच पक्षाचा राजीनामा दिला. मात्र, या राजीनाम्यानंतर काही दिवसांतच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा एआयसीसी (AICC) सरचिटणीस भूपेश बघेल यांनी शुक्रवारी केली.

मात्र नवज्योत कौर सिद्धू यांचे पती माजी क्रिकेटर आणि राजकारणी नवज्योत सिंग सिद्धू हे अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. या पार्श्वभूमीवर बघेल यांनी केलेल्या घोषणनेनंतर कौर यांनी अत्यंत तीव्र अशी प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. नवज्योत कौर सिद्धू यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा ‘पप्पू’ असा उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार टीका केली.

नवज्योत कौर यांनी डिसेंबर महिन्यात एक आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. “जो कोणी ५०० कोटींची सूटकेस देईल” तो काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनतो असा आरोप त्यांनी केला होता. तसेच जर मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली तरच त्यांचे पती सक्रिय राजकारणात परततील असेही त्या म्हणाल्या होत्या.

“इतक्या मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह (काँग्रेसमध्ये) पाहता, मला वाटत नाही की ते नवज्योत सिद्धू यांना बढती देऊ देतील, कारण आधीच तेथे पाच मुख्यमंत्रि‍पदाचे चेहरे आहेत आणि ते काँग्रेसला पराभूत करण्याबाबत ठाम आहेत. जर त्यांना (पक्षश्रेष्ठींना) हे समजले असेल, तर ती वेगळी गोष्ट आहे,” असे त्या तेव्हा म्हणाल्या होत्या.

पक्षातून हकालपट्टी व्हावी इतक्या मोठ्या प्रमाणात वाद वाढलेला असताना देखील नवज्योत सिंग सिद्धू यांनी या प्रकरणात गूढ मौन बाळगले आहे. मात्र असे असले तरी नवज्योत कौर यांनी व्यक्त केलेल्या संतापामध्ये त्यांचे पती भविष्यात काय निर्णय घेऊ शकतात याच्या संकेत दिसत असल्याची चर्चा पंजाबच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सिद्धू दाम्पत्य हे पंजाब काँग्रेसच्या नेतृत्वावर गेल्या काही महिन्यांपासून उघडपणे टीका करत आले आहे, विशेषतः पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांच्यावर दोघांनी उघडपणे टीका केली आहे.

गेल्या महिन्याच्या शेवटी सोशल मीडियावर नवज्योत कौर यांनी वारिंग यांच्यावर कथित भ्रष्टाचार आणि अंतर्गत घातपाता केल्याचे गंभीर आरोप केले होते. इतकेच नाही तर त्यांनी असे करतेवेळी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले होते. यामुळे सिद्धू दाम्पत्य कदाचित पुन्हा भाजपामध्ये परतणार असल्याची चर्चा रंगली आहे. भारतीय जनता पक्षातूनच त्यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

सिद्धू दाम्पत्य आणि वादाचे जुने नाते

सिद्धू दाम्पत्य पक्षांतर्गत कलहामध्ये अडकल्याचे ही काही पहिली वेळ नाही. २०१२ पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवज्योत कौर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि अमृतसर पूर्व येथून त्या पहिल्याच निवडणुकीत विजयी देखील झाल्या. राजकारणात नवख्या असून देखील त्यांना शिरोमणी अकाली दल-भाजपा सरकारच्या अंतर्गत चीफ पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून नियुक्त करण्यात आले. तोपर्यंत त्यांचे पती हे तीन वेळा भाजपाच्या तिकीटावर अमृतसर येथून लोकसभा निवडणूक जिंकले होते.

पण त्यानंतर लगेच कौर यांनी त्यांच्याच एनडीए सरकारवर त्यांच्या मतदारसंघातील विकासासाठी अन्यायकारकपणे निधी वाटपाचे आरोप करण्यास सुरूवात केली. नंतर त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तसेच अंमली पदार्थांना आळा घालण्यात अपयशी ठरल्याबद्दलही सरकारवर टीका केली.

२०१४ मध्ये त्या पंजाब भाजपामधील अशा एका गटाचा चेहरा बनल्या ज्यांना शिरोमणी अकाली दलाशी असलेले संबंध तोडायचे होते, आणि यासाठी त्यांनी थेट राज्यातील भाजपा नेतृत्वावर टीका देखील केली. त्या वर्षी, अरुण जेटली यांच्या उमेदवारीसाठी भाजपाने नवज्योत सिंग सिद्धू यांचे अमृतसर लोकसभेचे तिकीट कापले.

२०१५ मध्ये नवज्योत कौर यांनी त्यांच्या पतीला पक्षात घेण्यासाठी आम आदमी पक्षाने केलेल्या प्रयत्नांचे स्वागत केले होते. मात्र काही महिन्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये भाजपाने नवज्योत सिंग यांना राज्यसभेवर नियुक्त करून सिद्धू दाम्पत्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ज्यावर नवज्योत कौर यांनी दावा केला की, त्यांच्या पतीने आपमध्ये प्रवेशाची ऑफर नाकारली, कारण त्यांच्या पतीने सुचवलेल्या उमेदवारांना तिकिटे देण्यास नकार दिला.

त्यानंतर २०१७ त्या विधानसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी काळ उरलेला असताना, नवज्योत कौर यांनी शिरोमणी अकाली दलाबरोबर कायम असलेल्या युतीच्या मुद्द्यावरून पती-पत्नी दोघेही पंजाबमध्ये भाजपाचा प्रचार करणार नाही.

काँग्रेसमध्ये प्रवेशावेळीही वाद

जुलै २०१६ मध्ये नवज्योत कौर यांनीच स्वत: पहिल्यांदा नवज्योत सिंग हे भाजपा सोडतील आणि खासदारकीचा राजीनामा देतील याची घोषणा केली. त्यानंतर त्याच वर्षी ऑगस्टमध्ये त्या म्हणाल्या की त्यांच्या पतीसाठी “सर्व पर्याय खुले आहेत” यावळी नवज्योत सिंह हे काँग्रेस किंवा आप मध्ये प्रवेश करू शकतात अशा चर्चा जोरात सुरू होत्या. पण त्याच वेळी त्यांनी उघडपणे काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना २०१७ च्या निवडणुकीत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा म्हणून निवडल्याबाबत प्रश्न उपस्थित केले.

सिद्धू दाम्पत्याच्या कांग्रेसमध्ये प्रवेशाबाबत अमरिंदर सिंग हे काहीसे अनिच्छुक होते. त्यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये एक निवेदन देखील जारी केले होते ज्यामध्ये त्यांनी नवज्योत कौर यांनी इतर पक्षांच्या कामात हस्तक्षेप करण्यापेक्षा स्वतःच्या कामाशी काम ठेवावे असे बजावले होते. मात्र निवडणुकीच्या फक्त एक महिना आधी सिद्धू दाम्पत्याने फेब्रुवारी २०१७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात नवज्योत सिंग सिद्धू यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, लवकरच या दोघांमध्ये खटके उडू लागले. २०१५ च्या गुरु ग्रंथ साहिब विटंबना प्रकरणाची चौकशी ज्या पद्धतीने सरकारने हाताळली, त्यावरून सिद्धू यांनी आपल्याच सरकारवर टीका केली. पुढे त्यांनी २०१९ मध्ये मंत्री पदाचा राजीनामा देखील दिला.

मात्र अमरिंदर सिंग यांच्याशी काँग्रेसमध्ये वाढत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नवज्योत सिंग यांना २०२१ पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले, आणि काही महिन्यानंतर अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणे भाग पडले. पुढे त्यांनी यासाठी नवज्योत सिंह यांना दोष दिला.

काँग्रेसने अमरिंदर सिंग यांच्या जागी चरणजित सिंग चन्नी यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाने चन्नी यांनाच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून कायम ठेवले. या निर्णयावर नवज्योत कौर यांनी टीका केली आणि त्यांचे पती हे मुख्यमंत्रिपदासाठी अधिक योग्य उमेदवार होते, असा दावा केला. मात्र, त्या निवडणुकीत नवज्योत सिंग सिद्धू यांना अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला.

दरम्यान सध्या नवज्योत कौर यांचा काँग्रेसचे नेतृत्व विशेषतः राहुल गांधी यांच्याबरोबरच्या वादवरून असे सुचित होते की, नवज्योत सिंग यांनी कदाचित काँग्रेसच्या बाहेर वेगळे पर्याय शोधण्यास सुरूवात केली असावी, कारण नवज्योत सिंग हे गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेसमध्ये फारसे सक्रिय नाहीत.