अमरावती: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खचून न जाता विधानसभा निवडणुकीच्या वेळी आक्रमकपणे पक्षाचा प्रचार करणाऱ्या, ‘हिंदू शेरनी’ असे नामाभिधान मिळवणाऱ्या भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना राज्यसभेची उमेदवारी का नाकारण्यात आली, हा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला आहे.

नवनीत राणा २०१९ मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. पण, लगेच त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा देत, काँग्रेसला ‘हात’ दाखवला. काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का होता. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. जिल्ह्यातील भाजप नेते, कार्यकर्ते यांच्यासह महायुतीच्या नेत्यांचा विरोध असतानाही त्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यांना उमेदवारी दिली गेली. पण काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी त्यांचा पराभव केला. हा राणा समर्थकांसाठी फार मोठा धक्का होता. यानंतर नवनीत राणा यांना राज्यसभेची संधी नक्कीच मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती. पण, नेहमी ‘धक्कातंत्रा’चा वापर करणाऱ्या भाजपने नवनीत राणा यांना यावेळी संधी नाकारली आणि राणा समर्थकांना दुसरा धक्का बसला.

पक्षांतर्गत संघर्षाची किनार

नवनीत राणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपचा आक्रमकपणे प्रचार करताना दिसल्या. जिल्ह्यातून भाजपचे पाच आमदार निवडून आले. या यशाचे श्रेय नवनीत राणांना मिळाले. एव्हाना त्या भाजपच्या ‘स्टार प्रचारक’ बनल्या होत्या. त्यांच्या लोकप्रियतेच्या वलयाचा फायदा भाजपला होईल, ही अपेक्षा भाजपचे नेते बाळगून होते. मात्र, स्थानिक पातळीवर त्यांच्या विरोधकांची संख्या वाढत गेली. त्याची तमा न बाळगता लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी त्यांनी महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजपमधील आपल्या विरोधकांना जेरीस आणण्याची खेळी केली. तेथूनच गणित बिघडण्यास सुरूवात झाली. नवनीत राणांचे पती आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान हा स्वतंत्र पक्ष. त्यांनी स्वत:च्या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करणे, हे चुकीचे नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटच्या वर्तुळातील मानले जातात. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना भाजपने पाठिंबा दिलेला. पण, आपली रेष मोठी करण्याच्या नादात आपण भाजपची रेष पुसण्याचा प्रयत्न करीत आहोत, हे राणा विसरले.

राणांनी भाजपसोबत युतीची बोलणी सुरू असतानाच उमेदवारांची यादीही जाहीर करून टाकल्याने पेच निर्माण झाला. अखेरीस युती तुटली आणि अनेक ठिकाणी भाजपच्याच उमेदवारांच्या विरोधात युवा स्वाभिमानचे उमेदवार उभे ठाकले. हिंदुत्ववादी मतांचे विभाजन हा भाजपसाठी धक्का होता.

नवनीत राणा या भाजपच्या नेत्या आहेत. त्यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांचा प्रचार करावा, ही सामान्य अपेक्षाही पूर्ण होताना दिसली नाही. साईनगर प्रभागात तर नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘रोड शो’च्या दिवशीच युवा स्वाभिमानच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडला. हे भाजपच्या ‘शिस्तबद्धते’लाच आव्हान होते. नवनीत राणांच्या या भूमिकेमुळे भाजपचे सुमारे १२ ते १३ जागांचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला. राणांची खेळी ही त्यांच्यावरच उलटली. राणा यांच्या या भूमिकेमुळे पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा होती. महापालिकेत महापौरपद, सभागृह नेतेपदाच्या निवडीतून भाजपने राणांना सूचक संदेश दिला. आता राज्यसभेची संधी नाकारून भाजपने त्यावर शिक्कामोर्तब केले.