अमरावती: भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर नव्या चर्चेला तोंड फुटले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आपली वर्णी लागावी, यासाठी नवनीत राणा यांची धडपड सुरू असताना त्यांना यावेळी तरी संधी मिळेल का, याची उत्सुकता ताणली गेली आहे.
नवनीत राणा यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. पण, काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी त्यांचा पराभव केला. हा राणा समर्थकांसाठी फार मोठा धक्का होता. हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे नंतरच्या घडामोडींमधून दिसून आले.
राज्यसभेची संधी नाकारली
गेल्या मार्च मध्ये राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ७ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीच्या वेळी नवनीत राणा यांना संधी मिळेल, अशी भक्कम अपेक्षा राणा समर्थकांना होती. पण, त्यांचा भ्रमनिरास झाला. नवनीत राणा यांनी त्याविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली नाही, पण समाज माध्यमांवरील लघू-चित्रफितींच्या माध्यमातून त्यांनी आपली अस्वस्थता प्रकट केल्याचे दिसले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी त्यांनी महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजपमधील आपल्या विरोधकांना जेरीस आणण्याची खेळी केली. तेथूनच गणित बिघडण्यास सुरूवात झाली. नवनीत राणांचे पती आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान हा स्वतंत्र पक्ष. त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करणे, हे चुकीचे नाही. पण, नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या यशासाठी लावलेला हातभार आणि भाजपचे महापालिका निवडणुकीत झालेले नुकसान यातून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत चुकीचा संदेश पोहचला. त्याचे परिणाम दिसून आले.
नव्याने धडपड सुरू
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त झाली. या जागेसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील जागेवर कोणाची निवड होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यातच नवनीत राणा यांचे नाव अचानक चर्चेत आले. राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी नवनीत राणा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी नुकतीच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. या सलग भेटींमुळे राजकीय चर्चांना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून नवनीत राणा यांना राज्यसभेची संधी मिळू शकते का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले.
अटी आणि शर्ती लागू?
राज्यसभेच्या या जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत असताना नवनीत राणा यांच्या हालचालींवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून विरोधाची प्रतिक्रिया उमटल्याचे सांगितले जात आहे. नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा, अशी अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आल्याचेही बोलले गेले. पण, ही जागा भाजपच्या वाट्याला यावी आणि भाजपच्या कोट्यातून उमेदवारी मिळावी, यासाठी राणा दाम्पत्य मोर्चेबांधणी करीत असल्याची चर्चा सुरू झाली.
