मुंबई : पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) बुजुर्ग नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सोमवारी सकाळी दिल्लीत भेट घेतली. आश्चर्य म्हणजे या भेटीदरम्यान पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची अनुपस्थिती होती. पवार कुटुंबियांना वगळून झालेल्या या भेटीमुळे राष्ट्रवादीत चाललंय तरी काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
अमित शहा यांना भेटीस गेलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, समीर भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांचा समावेश होता. या भेटीसंदर्भात पक्षाकडून काही माहिती दिलेली नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा जोरात आहेत. पंतप्रधान मोदी यांचा बारामती दौरा होत आहे. त्याच्या आगेमागे विलीनीकरण होईल, असे बोलले जाते. या विलीनीकरणास भाजपची संमती आवश्यक आहे. विलीनीकरण झाल्यास संयुक्त राष्ट्रवादीचे सुकाणू राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या हाती जाऊ शकतो. भाजपकडे असलेले अर्थ खाते पुन्हा पक्षाला मिळावे, मंत्रीमंडळ विस्तार आणि भाजपबरोबरच्या सबंधात सुधारणा यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न होत आहेत.
२० ऑक्टोबर रोजी पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. ती भेट प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वगळून झाली होती. त्या भेटीमुळे पक्ष नेतृत्व आणि पहिल्या फळीतील नेत्यांच्या संबंधाविषयी चर्चा सुरू झाल्या होत्या. पार्थ पवार यांचे पक्षात सध्या प्रस्थ वाढले आहे. पक्षातील बुजुर्गांची त्याविषयी नाराजी आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्रामुळे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्षनेतृत्वावर नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बुजुर्गांनी अमित शहा यांची भेट घेतल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. आज मुंबईत पक्षाच्या गाभा समितीच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भेटीची पक्षनेतृत्वाला कल्पना होती
राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ अमित शहा यांना आज सकाळी भेटले, त्याची पक्षाध्यक्षांना कल्पना होती. सत्ताधारी महायुती आघाडीतील घटक पक्ष म्हणून पक्षाचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासंदर्भात ही भेट होती. पक्षाध्यक्षांना वगळून ही भेट झाली असे बिलकुल नाही. पक्षाध्यक्षांनी या भेटीची वेळ घेतली होती. पक्षामध्ये बुजुर्ग आणि तरुण असा विसंवाद नाही. – उमेश पाटील, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार</strong>
