मुंबई : अजित पवार यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात फक्त पवार कुटुंबियांचीच मक्तेदारी असल्याचे समोर आले आहे. पार्थ पवार हे राज्यसभेवर निवडून येणार असल्याने पवार कुटुंबातील पाच जण आता संसद अथवा विधिमंंडळाचे सदस्य होणार आहेत.
राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची राज्यसभेची मुदत संपत असली तरी पवार पुन्हा निवडून येतील, अशी शक्यता वर्तविली जाते. पवारांची कन्या सुप्रिया सुळे या लोकसभेत बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. पवारांचे नातू रोहित पवार हे विधानसभेत आमदार आहेत. अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली असली तरी त्यांनी अजून राज्यसभा खासदारकीची राजीनामा दिलेला नाही. लवकरच सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे राज्यसभेवर निवडून येतील. यामुळे शरद पवार यांच्या कुटुंबातील पाच जण संसद अथवा विधिमंडळाचे सदस्य असतील.
या नेत्यांच्या पंक्तीत शरद पवारही
पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, देवीलाल, करुणानिधी, प्रकाशसिंग बांदल, देवेगौडा, एन. टी. रामाराव, शेख अब्दुल्ला, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान, चंद्रशेखर राव, अशा विविध दिग्गज नेतेमंडळींच्या घराण्यातील अनेकांनी घटनात्मक पदे उपभोगली किंवा अजूनही पदांवर आहेत. या नेत्यांच्या यादीत शरद पवारांचाही समावेश होणार आहे. देशात विशेषत: प्रादेशिक पक्षात धराणेशाही मोठ्या प्रमाणावर असल्याचे अनुभवास येते. पक्षाची सूत्रे आपल्या घरातच राहतील, असा प्रादेशिक पक्षांच्या नेतेमंडळींचा कटाक्ष असतो.
अजित पवारांच्या पक्षातही तेच
अजित पवारांनी बंड करून राष्ट्रवादीत स्वत:ची चूल मांडली. काकांच्या राष्ट्रवादीपेक्षा आपला पक्ष वेगळा असेल, असे सुरुवातीला संकेत अजित पवारांनी दिले होते. पण लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. तेव्हा भाजपच्या गोटातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊ नये, असे अजितदादांच्या कानी घालण्यात आले होते, असे सांगण्यात येते, बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्या नंतर झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा यांना मागील दाराने खासदारकी मिळवून दिली.
एकत्रित राष्ट्रवादी असताना २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पक्षात विरोध असतानाही अजित पवारांनी मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यात पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक जागा मिळणार असल्याने पक्षातील अन्य कोणाचा विचार न करता पार्थ पवार यांनाच उमेदवारी देण्यात आली. सुनेत्रा पवार यांची बारामतीमध्ये पोटनिवडणुकीत विधानसभेवर निवड झाल्यावर त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होईल. तेव्हा पक्षातील अन्य कोणत्या नेत्याचा विचार करणार की दुसरे पुत्र जय पवार यांना संधी मिळणार याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
