अलिबाग- रायगड जिल्ह्यात महायुतीत जागावाटपावरून वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. तसे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीच दिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक जाहीर होण्या पूर्वीच जिल्ह्यात महायुतीतील धुसफूस समोर येण्यास सुरूवात झाली आह

महेंद्र थोरवे यांच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा डोळा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. महायुतीच्या नेत्यांकडे या मतदारसंघाची पक्षाने मागणी केली असल्याचेही तटकरे यांनी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस असा वाद उफाळून येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

हेही वाचा >>>Jammu And Kashmir Assembly Polls : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा रांगा लागतील!

महाविकास आघाडी सरकारच्या पाडावाला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वादाची किनार होती. रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या तिन्ही आमदारांचा आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदावर आक्षेप होता. शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात त्या ढवळ ढवळ करतात, पुरेसा विकास निधी मिळत नाही. यासारखे आक्षेप शिवसेनेच्या आमदारांकडून घेतले जात होते. याबाबत तक्रारीं करूनही त्यांच्यी दखल उध्दव ठाकरे यांच्याकडून घेतली जात नसल्याचे लक्षात आल्याने, रायगड मधील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी बंडखोरी करत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा >>>राहुल गांधींविरोधात भाजपचे राज्यभर आंदोलन; आरक्षण संपवण्याची काँग्रेसची सुप्त इच्छा बावनकुळे

वर्षभर सर्व सुरळीत सुरू असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचा गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महायुतीत दाखल झाला. पुन्हा एकदा आदिती तटकरे यांची केंद्रीय मंत्रीपदावर वर्णी लागली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये रायगड जिल्ह्यात अस्वस्थता पसरली. महाड आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेना आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले. पण कर्जत मतदारसंघातील वाद काही थांबले नाहीत. रायगड जिल्ह्यात श्रीवर्धनचा अपवाद सोडला तर कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे चांगले संघटन आहे. याच मतदारसंघातून तीन वेळा पक्षाचे आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ सहजासहजी शिवसेनेला द्यायचा नाही अशी भुमिका पक्षाने घेतली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची ही भूमिका महेंद्र थोरवे यांच्यासाठी अडचणीची ठरणार आहे. कर्जत मतदारसंघातील राष्ट्रावादी काँग्रेसच्या वाढत्या महत्वाकांक्षा शिवसेना शिंदेगटासाठी कोंडी करणाऱ्या ठरणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुतीचे काम केले नाही असा आरोप खासदार श्रींरंग बारणे यांनी केला होता. निवडणूक निकालानंतर कर्जत मतदारसंघात ते पिछाडीवर राहिले. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद प्रकर्षाने समोर आली होती. आता शिवसेनेच्या ताब्यातील या मतदारसंघावर राष्ट्रवादीने हक्क सांगण्यास सुरूवात केल्याने हा वाद विकोपाला जाण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. याच वादातून कर्जत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने युतीचा धर्म पाळला नाही तर श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेना आदिती तटकरे यांच्या विरोधात उमेदवार देईल असा थेट इशारा आमदार थोरवे यांनी दिला आहे.