Sunetra Pawar strategy for NCP Pune candidates: विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या नऊ जागांपैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची असून, त्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पुणे जिल्ह्यातील पुणे शहर किंवा पिंपरी-चिंचवड शहरातील एकाची निवड करून बालेकिल्ला मजबूत करणार की, नेत्यांचे पुत्र किंवा निकटवर्तीयांना संधी देऊन घराणेशाही जपणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.
विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांवर वर्णी लागण्यासाठी सर्वपक्षीय इच्छुकांच्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपणार असून, या एका जागेसाठी ‘राष्ट्र्वादी’मध्ये इच्छुकांंची संख्या जास्त आहे. माजी केंंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन, सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे, बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी; तसेच उमेश पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्याचबरोबर पुण्यातून माजी आमदार सुनील टिंगरे यांनी मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवडमधून माजी आमदार विलास लांडे आणि शहराध्यक्ष योगेश बहल यांचीही नावे चर्चेत आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल आहे. दोन मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी आणि तीन मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. १२ मे रोेजी मतदान होऊन निवड होणार आहे. उमेदवारी अर्जासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना ‘राष्ट्रवादी’त एका जागेसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
पुणे जिल्हा हा ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी एका जागेवर पुणे शहर किंवा पिंपरी-चिंचवडमधील एकाची निवड करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बालेकिल्ला भक्कम करणार की, नेत्यांच्या पुत्र किंवा निकटवर्तीयांना संधी देऊन घराणेशाही जपणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.
वडगाव शेरी मतदार संघ चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पुण्यात चेतन तुपे हे एकच आमदार आहेत. माजी आमदार सुनील टिंगरे यांचा गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार बापू पठारे यांनी पराभव केला. पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून सुनील टिंगरे यांच्या नावाची चर्चा आहे. टिंगरे हे ‘राष्ट्रवादी’चे पूर्व भागाचे शहराध्यक्ष आहेत. या भागात पक्षाला ताकद मिळण्यासाठी त्यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ हा चर्चेत आला आहे.
वडगाव शेरी हा मतदार संघ २००९ मध्ये निर्माण झाल्यांनतर पहिल्यांदा आमदार बापू पठारे निवडून आले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. भाजपचे जगदीश मुळीक हे निवडून आले. २०१९ मध्ये त्यांच्याऐवजी टिंगरे यांना तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. त्यामुळे दहा वर्षांच्या राजकीय विजनवासानंतर पठारे हे २०२४ च्या निवडणुकीत निवडून आले. तत्पूर्वी ते भाजपमध्येच होते. ऐनवेळी ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे गेले. मात्र, भाजपशी त्यांचा संपर्क कायम राहिला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र सुरेंद्र आणि स्नुषा ऐश्वर्या पठारे यांना भाजपने उमेदवारी दिली. दोघेही निवडून आले आहेत. आमदार पठारे यांना रोखण्यासाठी टिंगरे यांना संधी दिली जाणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.
पिंपरी-चिंचवडमधील इच्छुक
पिंपरी-चिंचवड महाापालिका ही यापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात होती. मात्र, मागील दोन निवडणुकांमध्ये ही महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. या ठिकाणी भाजपचे वर्चस्व कमी करण्याची खेळी ‘राष्ट्रवादी’कडून खेळली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या ठिकाणी माजी आमदार विलास लांडे आणि शहराध्यक्ष योगेश बहल यांच्याही नावाची चर्चा आहे.
